सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते.
विचार करणे, शिकणे व स्मृती संचय ह्या तीन एकत्रित गोष्टीने मुलांची बुद्धिमत्ता ठरते. ‘घोका व ओका’ उत्तम तर्हेने करतो, म्हणजेच ज्याचं पाठांतर चांगलं आहे, पूर्वी त्याला हुशार म्हटलं जायचं! पण आज हा समज खोटा मानला जातो आहे. मेंदू व त्याचे कार्य, मानसशास्त्र, सामाजिकशास्त्र, विज्ञान अश्या अनेक क्षेत्रात प्रचंड संशोधन होत आहे, व जुन्या गोष्टींना फाटा देत नव्याने नवीन गोष्टी समोर येत आहेत. उदा. शरीर हे एक यंत्र आहे व त्याचं नियंत्रण मेंदू करतो. मेंदूचं कार्य न्यूरॉन्सकरवी घडत असतं. न्यूरॉन्सची जोडणी घट्ट व मजबूत पाच वर्षापर्यंत होते म्हणजेच पाच वर्षापर्यंत मेंदूचा विकास पूर्ण होतो, असा समज होता, पण आज हे मिथक आहे. मेंदूचा विकास अगदी चाळीस वर्षापर्यंत होत असतो. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की, आज मुलगा शिकला नाहीतर कधीच शिकणार नाही, व आयुष्य वाया गेलं, असं नाही; पण आज त्याचं बालपण नक्कीच कोमेजतंय! कोणीही, कधीही, कुठल्याही वयात, कोणतीही गोष्ट शिकू शकतो. ह्याला 'न्युरो प्लॅस्टीसिटी' म्हणतात.
मानवी मेंदू तीन भागांत विभागला आहे. प्रत्येक मनुष्य व प्राण्यांमध्ये आढळणारा छोटा मेंदू आहे - त्याला थायलमस म्हणतात. ह्याचं कार्य बेसिक इंस्टीक्टस आहे. केव्हा पळायचं, केव्हा खायचं... इ. सांगणं. त्याच्यावर तीन मिमी जाडीचा सुरकुतलेला भाग आहे, हा खरा मेंदूचा भाग आहे - जो विचार करतो. पण त्याला खाद्य पुरवतो छोटा मेंदूच. एक उदाहरण पाहू : मुलं चालायला शिकतं. एकेक पाऊल टाकत, तोल सावरत असतो. त्या वेळेला तो ही क्रिया विचार करत, करत असतो, लक्ष केंद्रित करतो चालणं ह्या क्रियेवर. प्रयत्न, चुका, दुरुस्ती ह्या पद्धतीने शिकत असतो. पण नंतर सरावाने ही क्रिया जमू लागली की, त्याला उजवा पाय टाकू की डावा, असा विचार करावा लागत नाही. सुप्त/बोध मेंदूने त्याची कायमस्वरूपी नोंद ठेवलेली असते. छोट्या मेंदूने चालायचं आहे, हे थायलमसने हायपोथायलमसला सांगितलं, व तो विचार करून क्रिया करू लागला. जेव्हा आपण नवीन गोष्ट पहिल्यांदा शिकत असतो, तेव्हा आपलं पूर्ण लक्ष त्या क्रियेवर केंद्रित असतं. त्या वेळेला मेंदूतले न्यूरॉन्स जोडणी करत असतात. प्रत्येक न्यूरॉन दहा हजार इतर न्यूरॉन्सची जोडणी करत अथवा संवाद साधत असतो. ज्या क्रियेत किंवा शिकण्यात यशस्वी होतो त्यावेळी काही न्यूरॉन्सची जोडणी पक्की होत जाते व काही गळून पडतात.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्मृती (मेमरी) म्हणजे काही पुस्तक नाही. आपल्याला हवे ते, त्यात शोधलं. मेंदू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींची नोंद ठेवतो. ज्या आपल्या भावनेशी (हर्ष, दु:ख, आश्चर्य, भय इ.) निगडित आहे. संशोधन असं सांगतं की, आपली स्मृती शंभर टक्के अचूक वा पक्की नसते. एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर, ती खरोखर घडलेली असावी असं वाटायला लागते व मेंदू तिची नोंद ठेवतो जी घडलेली अथवा पाहिलेलीच नाही.
मेमरीचे अनेक प्रकार आहेत.
- सेन्सरी मेमरी - जी पंचेंद्रियाने अनुभवलेली असते.
- शॉर्ट टर्म मेमरी - वीस सेकंदापर्यंत मेंदू लक्षात ठेवतो व जर त्याची उजळणी केली नाही तर नाहीशी होते. मेंदू खूप हुशार आहे त्याला माहिती असतं की, पुढे ह्याची गरज पडणार नाही म्हणून तो त्याची नोंद ठेवत नाही.
- लॉंग टर्म मेमरी - ज्या गोष्टी शिकल्या आहेत व ज्या जीवनोपयोगी आहेत त्याच्या नोंदी दीर्घ स्मृतीत साठवल्या जातात. उदा. चालणे, जेवणे, विचार करणे किंवा दैनंदिन जीवनोपयोगी क्रिया.
- एपिसोडीक मेमरी - जीवनातील महत्त्वपूर्ण व ठळक गोष्टींची नोंद व त्याचे जतन मेंदू करत असतो. उदा. शाळेत असताना काही द्वाडपणा केला असेल तर अनेक वर्षानंतर तो बारीक सारीक तपशिलांसह आठवत असतो, पण त्या दिवशी काय शिकवले ते मात्र आठवत नसतं.
- प्रोसिजरीयल मेमरी - ज्या क्रिया आपण दररोज करत असतो त्या परत परत शिकाव्या लागत नाही.
- सिमँटीक मेमरी - ही अतिशय महत्त्वाची मेमरी आहे. नवीन कन्सेप्ट्स जाणून घेणे, समजणे, शिकणे ...इ. व त्याचा थेट संबंध परीक्षा, मार्क्सशी असतो. उदा. क्रिकेटच्या खेळाचे नियम माहीत असणे, ही सिमँटीक मेमरी व सचिनची शंभरावी सेंच्युरी, कधी, कुठे इ माहिती असणे ही एपिसोडिक मेमरी.
- डीक्लरेटीव मेमरी - काही लहान मुलं राज्यांच्या, देशांच्या राजधान्या, त्यांचे चलन धडाधड म्हणून दाखवतात. ही मुख्य म्हणजे माहिती आहे जी उजळणी करून करून मेंदूत साठवता येते. पण प्रत्यक्ष जीवनात त्याचा फार कमी उपयोग असतो.
- फ्लॅश बल्ब मेमरी : मेंदू ही खूप सु:खद वा दुःखद घटकांची नोंद कायमस्वरूपी ठेवतो. अशा घटना व्यक्तीच्या जीवनात कमी असतात.
शिकण्याच्या दोन पद्धती आहे - एक पाठांतर व दुसरी समजून घेऊन शिकणे. उदा. एखाद्या नवीन भाषा शिकताना तिचं व्याकरण शिकतो. भाषा वापरली (बोलली/ऐकली) गेली नाही तर विस्मरणात जाते, पण मातृभाषेचं व्याकरण शिकावं लागत नाही पण ती अचूक वापरत असतो, ती विस्मरणात जात नाही. जे जीवनोपयोगी, जे दैनंदिन आयुष्याशी निगडित व जे अनुभवातून मिळालेलं ज्ञान आहे, हे कायमस्वरूपी लक्षात राहते.
आपली शिक्षण पद्धती अशी आहे की, मुलाची पहिली पाच वर्षे रट्टा मारण्यात वाया जातात. शिकण्यातली पहिली पायरी आहे समजून घेणे त्यासाठी समजलं की नाही हे तपासून पाहायला हवे. शाळेत/घरी आपण विचारतो, 'समजलं का?' लगेच पुढचा प्रश्न 'काय समजलं?' असायला हवा, पण असं बहुतेक वेळा होत नाही. जी संकल्पना शिकवली आहे, त्याचा संबंध इतर गोष्टींशी जोडायला शिकवलं जात नाही, किंवा कार्यकारणभावच समजवलेलाच नसतो, किंवा मूळ संकल्पनाच समजवलेली नसते इ. इ.
एक नेह्मीचं उदा. कॉनकेव्ह व कॉनवेक्स मिरर. खूप मुलांचा गोंधळ असतो. केव्ह म्हणजे 'गुहा' ज्यात गुहा आहे तो कॉनकेव्ह व ज्यात नाही तो कॉनवेक्स. अश्या पद्धतीने संबंध जोडून गोंधळ/शंका दूर करायला पालक/शिक्षकाने मदत करायला हवी.
सगळ्या मुलांना शिकायला आवडतं पण पाठ्यपुस्तकातलं सोडून. त्यांच्यात जिज्ञासू वृत्तीही असते पण ती जोपासली जात नाही किंवा त्याला खतपाणी देऊन वृद्धिंगत केली जात नाही. बळजबरीने, जबरदस्तीने अनेक गोष्टी त्यांच्यावर थोपवून आपण त्यांची नैसर्गिक जिज्ञासा दडपून टाकत असतो. उदा. कळत नकळत आपण त्यांना परीक्षार्थी, मार्कार्थी बनवतोय - ज्ञानार्थी बनवण्या ऐवजी. जी संकल्पना शिकलो आहोत ती इतरत्र कुठे वापरू शकतो, त्याचा इतर कशाशी संबंध जोडून नवीन संकल्पना तयार होऊ शकते का? असे चौकट मोडून विचार करायला, सृजनशीलतेला वाव देतो का? रेसच्या ह्या युगात टिकण्यासाठी अश्या वेगळ्या वाटेने विचार करणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता आहे. ही 'नयी सोच' कुठून आणणार? त्याकरिता हवी मेमरी! मेमरीला वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या ठिकाणी किंवा तिचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडता यायला हवा. शाळेत/घरी शिकवणं हे एकतर्फी असतं, ज्यात प्रश्न, शंका विचारायला अवसरच दिला जात नाही. खरं सांगायचं तर अभ्यास न करता कोणताही मुलगा पन्नास टक्क्याने पास होऊ शकतो, त्यांच्याजवळ असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर पण गंमत अशी आहे ना की, पालकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत त्यात 'शिकणे' हरवून गेलंय व पाठांतर बळावलंय.
पालक म्हणून आपल्या संवादातून कळत-नकळत चुकीचे संदेश जात असतात : उदा. बघू चूक/*बरोबर
- साधं वाक्य पहा. आता खेळणं बास, अभ्यासाला बसा. अभ्यास म्हणजे रटाळ,कंटाळवाणे!
- काढ अमुक अमुक विषयाचा अमुक अमुक धडा! धडा वाचतानाच उत्तरे शोधून खूण करूनठेव.
- बहुतांश वेळा आपण मुलांना घाबरवत असतो. अमुक अमुक मार्क्स नाही मिळाले तर रिक्षा चालव/शांताबाई बन. ही नकारात्मक प्रेरणा झाली.
- बहुतेक वेळेला आपण एकतर्फी उपदेशात्मकच बोलतो जे मुलांना ऐकायला अजिबात आवडत नाही.
तू सांग कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा.
एखादी धड्याशी संबंधित गोष्ट सांगून पुस्तकात/धड्यात ती आहे का विचारणे.
तू जे काय करशील ते उत्तमच करशील. नकारात्मकता व मेमरीचं नातं वैऱ्याचं असतं तर सकारात्मकतेशी सख्ख्याचं!
संभाषणात्मक, संवादात्मक, चर्चात्मक बोलणं, गुड टॉक व्हायला हवा.
विचार करणे, शिकणे व स्मृती संचय करणे हे जर का व्हायला हवे असेल तर अभ्यास करणे ही सुखकारक, आनंददायक घटना व्हायला हवी व ती स्वयं प्रेरणेतून व्हायला हवी. ‘अब्दुल कलाम’ हे स्वयं प्रेरणेचं उत्तम उदाहरण आहे, जे आपण नेहमी मुलांना देत असतो. पण ही स्वयं प्रेरणा इंजेक्शनसारखी टोचून शरीरात घुसवता येत नाही. पालक म्हणून पोषक वातावरण देऊन आपण त्यांच्या बरोबर राहून फक्त प्रोत्साहित करू शकतो. जास्तीत जास्त सकारात्मक प्रेरणा द्यायचा प्रयत्न करायला हवा.
मेंदूच्या विकासाकरिता व कार्यक्षमता वाढण्यासाठी रात्रीची पुरेशी शांत व गाढ झोप आवश्यक आहे.
सध्याचं संशोधन असं सांगतंय की, ॲस्ट्रोजन हे स्त्रियांच्या शरीरातले हार्मोन मेमरीच्यादृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पुरुषांमध्ये टेस्टोरॉन हे एस्ट्रोजनमध्ये रूपांतरित होतं. त्यासाठी मुलांनी कसरत व व्यायाम करायला पाहिजे, किंवा खेळलं पाहिजे.
इन्सुलिन हा ही महत्त्वाचा घटक आहे मेमरी वाढीकरिता, व त्यासाठी सकस पौष्टिक आहार व व्यायाम हवा.
स्मरण व विस्मरण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
पण अजून एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती अशी की विस्मरण हे वरदान आहे. मेमरी आपण बनवत असतो. ती चांगली व पक्की बनविण्यासाठी तिची आधारशीला ज्ञानाराधारित, संबंधारित, विचाराधित व तर्काधारित असावी. मेंदूला प्रश्न, कोडं सोडवायला आवडतं ते सुटत नाही तोपर्यंत चैन पडत नाही आणि ते सुटले की आनंद होतो, म्हणून असे प्रश्न विचारावे की, ज्याची उत्सुकता वाटून उत्तराचा शोध घेतील. खूप परिश्रमानंतर साध्य केलेली गोष्ट जास्त आनंददायी असते आणि त्याच्याशी निगडित असलेली मेमरी खूप सशक्त व चिरायू असते. जर मुलाला एखादी गोष्ट जमत नसेल, विषय आवडत नसेल तर त्यापाठीमागचे कारण शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे . मेमरी, स्वयं प्रेरणा शिकवू शकत नाही पण लहान मुलाला लक्ष केंद्रित करणे थोड्याफार प्रमाणात शिकवू शकतो. आपण मल्टीटास्किंग करतो पण मेंदूला ते झेपत नाही.
एकाच वेळी, एकाच गोष्टीवर योग्य तऱ्हेने लक्ष केंद्रित करणे, महत्त्वाचं आहे. त्यासाठी ब्रेनव्हीटा सारखे काही खेळ चांगले उपयुक्त आहेत. मुलाला खेळायला न देता पालकांनी स्वत: खेळावे. खेळताना तुम्ही विचार करता त्याच वेळेला बाजूला बसलेली मुलेही विचार करत असतात पुढची चाल कोणती असावी…. आणखी एक उपयुक्त खेळ आहे जो पूर्वी खूप मुलांना आवडायचा ह्या गॅझेट्सच्या युगात मागे पडलाय तो म्हणजे शाळा - शाळा खेळणे : जो एकत्र पालक -बालक खेळू शकतात. क्रिया - फोकस - विजय असं सातत्याने घडलं तर फोकस करणं आपआपल्या कुवतीनुसार होत राहतं. ‘प्रयत्न- चुका- प्रयत्न - दुरुस्ती-विजय’ ही साखळी खूप महत्त्वाची आहे 'शिकणे' ह्या प्रक्रियेतील.. विचार करणे, शिकणे आणि स्मृती संचय ह्यांचं संमिश्रण म्हणजे बुद्धिमत्ता!
मेंदूबद्दलच्या काही रंजक गोष्टी:
- मेंदूत साठ टक्के चरबी असते.
- मेंदूत भरपूर ऊर्जा आहे, ज्यामुळे एक बल्ब पेटवता येऊ शकतो.
- मेंदू मऊ व लिबलिबीत आहे लोण्यासारखा!
- एका दिवसात जवळपास सत्तर हजार विचार डोक्यात येतात. ताशी दोनशे साठ प्रतिकिमीच्या गतीने विचार येतात व जातात.