माझ्या आठवणीतील रिमा

सिनेमा पाहून तो समजायला लागल्यावर रिमांना पहिल्यांदा पाहिले ते सलमान खानची आई म्हणून. नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्वत:चे कंगन काढून लेकाच्या हातात देणारी आई हिंदी चित्रपटात तेव्हा फारच वेगळी पण खूप छान वाटली होती. आईने कसे कायम दु:खी आणि सोशिकच असले पाहिजे ह्या परंपरागत प्रतिमेला छेद दिला तो रिमांनी. त्यांच्यामुळेच तर स्वतंत्र विचारांच्या, आधुनिक आणि आनंदी आया प्रेक्षकांनी स्वीकारल्या. एक वर्षानुवर्षांची परंपरा मोडून काढणे हे कर्तृत्व मोठेच पण तेवढीच त्यांची ओळख नाही. त्या एक अतिशय ताकदीची अभिनेत्री होत्या हे मला खूप नंतर त्यांचे इतर सिनेमे / मालिका पाहिल्यावर कळले. अशा अभिनेत्रीला रंगमंचावर अभिनय करताना पाहणे मात्र राहून गेले ही रुखरुख मात्र सदैव राहील.

त्यांच्या आभिनयाबद्दल मी काही बोलावे एवढा माझा अनुभव नाही पण त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याचा योग्य दोन वेळा आला तेव्हाचे अनुभव लिहावेसे वाटत आहेत. आम्ही युरोपिय मराठी स्नेहसंमेलन करायचे ठरविले तेव्हा कार्यकारी समितीने एकमताने अध्यक्ष म्हणून दिलीप प्रभावळकर आणि प्रमुख पाहुण्या म्हणून रिमा ह्यांची निवड केली. दोघेही अतिशय ताकदीचे अभिनेते आणि विशेष म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके. त्यांनी कार्यक्रमास येण्यासाठी होकार दिला तेव्हा खूप आनंद झाला. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप उत्सुकता होती.

संमेलनाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी मी पुण्यात होते तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले. रिमा चित्रपटात जेवढ्या सुंदर दिसतात त्याहीपेक्षा अधिक सुंदर त्या प्रत्यक्षात दिसत होत्या. कोणाताही बडेजाव न करता अतिशय साध्या वेषात त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आल्या होत्या. माझी त्यांच्याशी ओळख करून दिली गेली आणि त्यांनी एक हलकेसे स्मितहास्य केले. मितभाषी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत हे मला आधीच माहित होते त्यामुळे माझ्याशी त्यांनी बोलण्याचा प्रश्नच नव्हता पण त्यांच्या ऑरापुढे मलासुद्धा त्यांच्याशी धड बोलता आले नाही. प्रेस कॉन्फरन्स पार पडली त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले. त्यानंतर मला फार रुखरुख लागून राहिली की आपण एवढ्या कशा बावळटासारखा वागलो. पण इलाज नव्हता. मला माझी चूक सुधारायला अजून एक मोका मिळणार होता.

प्रेस कॉन्फरन्सनंतर तीन महिन्यांनी संमेलनाचा दिवस उजाडला. मी मस्त पैठणी घालून नटून थटून तयार होते. प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी मी अतिशय साध्या वेषात बिनामेकप गेले होते. त्यातच रिमांशी प्रत्यक्षात पाचच मिनिटे बोलणे झाले असेल नसेल. त्या मला ओळखतील ह्याची मला खात्री नव्हती. पण त्या आल्यावर मला पाहून एक क्षण थांबल्या आणि म्हटल्या "तूच होतीस ना प्रेस कॉन्फरन्सला!!". मला फारच आनंद झाला. मी हो म्हटले आणि त्यांचे स्वागत केले. आमच्या स्मरणिकेचे उदघाटन त्यांच्याच हस्ते झाले. त्यानंतर संमेलनात आयोजनाच्या अनुषंगाने ह्या ना त्या कारणाने त्यांच्याशी बोलणे होत गेले. मितभाषी असल्या तरीही त्यांचे उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्व मला पदोपदी जाणवत होते.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही "व्हाईट लिली अँड नाईट रायडर" नाटकाचा प्रयोग ठेवला होता तेव्हा सकाळी उठून सोनाली कुलकर्णीला मेकप करण्यासाठी मदत म्हणून त्या बेकस्टेज हजर होत्या. नाटकाची माहिती मला प्रेक्षकांना सांगायची होती म्हणून ती माहिती बरोबर आहे ना कोणते मुद्दे राहिले नाहीत ना ह्याची पडताळणी करायला मी सोनाली कुलकर्णीकडे गेले होते. जेवढ्या उत्साहाने सोनाली त्या नाटकाबद्दल बोलत होती तेवढ्याच उत्साहाने त्यांनी पण मला एक-दोन महत्वाचे मुद्दे सांगितले. आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचा त्यांचा हा गुण मला प्रकर्षाने जाणवला. खरेतर त्यांचा त्या नाटकाशी काहीच संबंध नव्हता पण तरीही त्या केवळ सोनालीला मदत म्हणून तेथे आल्या होत्या.

तिसऱ्या दिवशी संमेलनाचा समारोप होणार होता. सकाळी "सेलिब्रिटी गप्पा" हा कार्यक्रम ठेवला होता. त्यांचा मितभाषी स्वभाव ह्या कार्यक्रमात अगदी प्रकर्षाने जाणवला. त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप असले तरीही त्यांना बोलते करण्याइतका वेळ दुर्दैवाने कार्यक्रमामध्ये नव्हता. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची फारशी संधी मिळालीच नाही ही रुखरुख कार्यक्रम संपल्यावरही माझ्या मनात राहिली. असो. काही व्यक्ती गूढ असतात आणि कदाचित त्या तशाच रहाव्यात अशी योजना असते.

आज सकाळी रिमांच्या निधनाची बातमी ऐकली आणि प्रचंड मोठा धक्का बसला; त्यांच्या भेटीचे हे सर्व प्रसंग मनामध्ये तरळून गेले. कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर मी त्यांना एक फोटो काढू द्या म्हणून विनंती केली. तो एक फोटो ह्या तीन दिवसाची सुरेख आठवण म्हणून माझ्या संग्रही आहे.

आज त्या आपल्यात नसल्या तरीही आपल्या अभिनयाने त्या पुढच्या पिढीस सदैव प्रेरित करत रहातील. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो!!

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle