P.F. Changs हे प्रसिद्ध चायनीज चेन रेस्टॉरंट त्यांच्या लेट्युस रॅप्स करीता प्रसिद्ध आहेत. अतिशय टेस्टी व हेल्थी प्रकरण...कार्ब जवळपास नाहीतच त्यामुळे कार्ब कंट्रोल करणार्यांना उपयुक्त! त्यांची रेसिपी कॉपी करण्याचा हा प्रयत्न!
पटकन होत असल्याने माझ्या सारखा आळश्यांना पण उपयुक्त. बच्चे खाते है, बच्चों का बाप खाता है, बच्चोंकी माँ तो वैसे भी, काहीही खातीही रहती है!!
तर...
साहित्यः
१.चिकन खिमा - १ पाउंड/०.५ किलो. (चिकन खात नसल्यास हार्ड तोफु, सोया चंक्स असे पर्याय वापरू शकता.)
२. हव्या/ मिळतील त्या भाज्या - कोबी, गाजर, ब्रोकोली, मशरूम्स, चायनीज दुकानात मिळतात ते मोठे कोंब, बांबू शूटस ई.- थोड्या-थोड्या
३. वॉटर चेस्टनट - मुख्यतः चायना, जपान अश्या देशांत होणारं व वापरलं जाणारं हे कंदमूळ. मस्त क्रंची असतं. या रेसिपीत हे मस्ट. दाताखाली येणारा त्याचा क्रंचीनेस मस्त लागतो या पदार्थात. मी कॅन्ड (canned) वापरते. तर एक छोटा कॅन वॉटर चेस्टनट - बारीक चिरून.
भारतात आपण वापरतो तो शिंगाडा म्हणजेच हे का ते मला नक्की माहिती नाही.
४. पातीचा हिरवा कांदा - एक जुडी
५. आईसबर्ग लेट्युस - Iceberg lettuce - १ डोकं (head)
६. बारीक चिरलेलं (वाटलेलं नको) आलं-लसूण (१ टी-स्पून)
७. मीठ, मीरेपूड, तेल (हवं असल्यास तीळाचं तेल), हॉट सॉस (कोंबडा छाप किंवा कोणताही), सॉय सॉस, अजून हवा तो सॉस घालनेका, डगमगनेका नही.
कृती:
१. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. फूड प्रोसेसर किंवा मॅन्युअल चॉपर असल्यास हे काम सोप्पे होते.
मी हल्ली हा चॉपर वापरते. भयंकर आवडलाय. २-३ दा दोरी ओढली की बारीक चिरलेली भाजी! झटपट!! हल्ली किचनमध्ये मी सतत दोर्या ओढताना आढळून येते.
२. मोठ्या वोक मध्ये तेल घालून थोडे गरम झाले की त्यात बारीक चिरलेले आलं-लसूण घालून थोडे परतून घ्या. कापलेल्या पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घाला.
३. मग त्यात चिकन खीमामिनीटे, परतून ४-५ मिनीटे शिजवून घ्या. चिकन खीमा लगेच शिजतो. मग त्यात कापलेल्या सर्व भाज्या, कापलेलं वॉटर चेस्टनट घाला व परता. ३-४ मिनीटात भाज्या शिजतील. खूप शिजवायच्या नाहीयेत. थोड्या अल-देंतेच शिजवायच्यात.
४. मीठ, मीरपूड व हॉट सॉस-सॉय सॉस घाला.
५. गॅस बंद करून वरून चिरलेला पातीचा कांदा (हिरवा भाग) घाला.
६. लेट्युस चे प्रत्येक पान वेगळे करून धुवून घेऊन त्यात हे वरील मिश्रण घालून रॅप करून खा.
लेट्युस ची पानं, धुवून थोडा वेळ फ्रीजर मध्ये ठेवा अशी एक टीप नेटवर असते - for adding crispiness to the leaves. छान होतात त्याने पण मी दरवेळीच ते करते असं नाही.
alt="20170218_183923.jpg" />