आमच्या ऑफिसमध्ये HR तर्फे फिटनेस करता त्रैमासिक उपक्रम राबवले जातात. प्रत्येक फिटनेस चॅलेंजला काही पॉइंट्स आहेत, आणि तीन महिन्यात काही पॉइंट्स जमवले की अॅमेझॉनचं गिफ्ट कार्ड बक्षिस म्हणून मिळतं. :) कर्मचार्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता हा उपक्रम आहे. काही काही थोडे चॅलेंजिंग तर काही काही, अगदी सोपे प्रकार यात आहेत. उदाहरणार्थ ५-७-१०के स्टेप्स, दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी पिणे (इथे सोडा आणि कॉफी पिणार्यांकरता हे फार अवघड चॅलेंज आहे), फाईड-फास्ट फूड सोडणे (घरुन डबा आणणे), अॅन्युअल डॉक्टर व्हिजिट, फ्लु शॉट घेणे वगैरे आणि अजुनही बरेच ... तर पॉइंट्स मिळवण्याकरता पूर्ण कराव्या लागणार्या सक्तीच्या पर्यायांबरोबरच, इतर अनेक ऐच्छिक पर्याय आहे, आणि त्यातले काही मला फार आवडतात. बरेच पर्याय हे साधे, सोपे, आरामात करता येण्यासारखे आणि बहुतांशी मानसिक स्वास्थ्य उंचावण्याकरता आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच कर्मचार्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कित्येकदा मानसिक आरोग्याकडे लोक दुर्लक्ष करतात. अमेरिकेत मानसिक रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. मानसिक अस्वस्थामुळे होणार्या हिंसेचे प्रमाणही जास्त आहे. काही अगदी सोप्या उपायांनी आपण मानसिक स्वास्थ उंचावू शकतो, सकारात्मकता वाढवून तणाव कमी करु शकतो. त्यातल्या काही अॅक्टिव्हीटिज मी खाली देतेय. येथील मासिक फिटनेस उपक्रमाप्रमाणे, आपण हा मानसिक स्वास्थाचा उपक्रमही कधी तरी राबवू शकतो.
१. You Rock Challenge - महिन्याभरात ३० लोकांना सिन्सियर काँप्लिमेंट्स द्या. अगदी अनोळखी व्यक्तीला सुद्धा चालेल (गैरसमज करुन घेणार नाहीत हे पाहून द्या :P), आणि साधीशी कॉम्प्लिमेंटही. त्यांच्या आनंदातून तुम्हालाही आनंद मिळेल.
२. Write It Challenge - महिनाभर एक जर्नल ठेवून त्यात तुमचे विचार लिहा. तुम्हाला आनंद देणारं काहीही लिहा, अगदी २-३ वाक्य लिहिली तरी चालतील. हे जर्नल वही स्वरुपात किंवा ऑनलाईन, कसंही चालेल.
३. Walkie Talkie Challenge - महिनाभर (५०० मिनिटं तरी) तुम्हाला आनंद देणार्या व्यक्तिबरोबर (मित्र, को-वर्कर, फॅमिली) चालायला जा.
४. Top Chef Challenge - महिन्याभरात नव्या १० हेल्दी रेसिपी शिका आणि बनवा. या रेसिपीज बनवताना तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींना किंवा मित्रमंडळींनाही सामील करुन घेऊ शकता. निवांत वेळ असताना या रेसिपीज बनवा.
५. Table Time Challenge - महिनाभर सगळ्या कुटुंबाने टिव्ही आणि बाकी गॅजेट्स दूर ठेवून एक तरी एकत्र जेवण करा (घरी, हॉटेलमध्ये कुठेही). तुमच्या दिवसाबद्दल बोला, आवडणार्या विषयावर चर्चा करा.
६. Sweet Dreams Challenge - महिनाभर दररोज ७ ते ९ तास झोपा. झोपण्याच्या आधी फोन, आयपॅड, टिव्ही इत्यादी पासून ३० मिनिटं तरी दूर रहा, पार पडलेल्या दिवसाचा, येणार्या दिवसाचा विचार करा, मनन, चिंतन, प्रार्थना करा आणि बघा तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं सुधारतं ते!
७. Stop Think Challenge - महिनाभर दररोज १० मिनिटं चिंतन करा (reflect - Meditate, pray, ponder, plan, journal, write letters, walk, or spend time in nature). दिवसातली एक वेळ ठरवा आणि १० मिनिटं रोज चिंतन करा. हे करताना तुम्ही फिरु शकता, लिहू शकता, किंवा नुसते शांत बसून विचार करु शकता.
८. Smile Big challenge - या महिन्याभरात ३० वेगवेगळ्या लोकांना तुमच्या वागण्यामुळे आनंदी करा, स्माईल (हसणेच हवे असे नाही) करण्यास भाग पाडा. जमल्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करा, त्यांना फोन करा, गप्पा मारा, काँप्लिमेंट्स द्या, किंवा त्यांना आवडतील अशी कोणतीही छोटीशी गोष्ट करा.
९. Shut Down Challenge - महिनाभर झोपण्यापूर्वी १ तास सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मिडियापासून दूर राहा. तो वेळ इतर गोष्टींकरता वापरा, जसे की गप्पा मारणे, पुस्तक वाचणे, मुलांबरोबर वेळ घालवणे वगैरे.
१०. Play Time Challenge - लहानपणी तुम्ही कसे रोज खेळायचा, तसंच पुढचा महिनाभर दिवसातली फक्त १० मिनिटं कुठलाही खेळ खेळ्ण्यात घालवा. मुलांबरोबर, एकटे, किंवा घरातल्या इतर लोकांबरोबर. अगदीच जमलं नाही तर दोरीवरच्या उड्या मारा, संगीत लावून नाच करा.
११. Be Grateful Challenge - तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात अशा ३ गोष्टी रोज लिहून काढा.अगदी छोट्याश्या शकणार्याही या गोष्टी असू शकतात. पण त्यांच्याबद्दल विचार करुन, कृतज्ञता व्यक्त करुन, त्या लिहून तुमच्या मनाला एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते.
१२. Be Positive Challenge - महिनाभर कशाचीही तक्रार करण्यापासून दूर रहा. नकारात्मक विचार, तसेच सतत तक्रार याचा फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक स्वास्थ्यावरही परिणार होतो. त्यामुळे हा महिना नकारात्मक विचारांपासून जास्तीच जास्त दूर रहा.
१३. Book Worm Challenge - महिन्याभरात १००० मिनिटे काहीतरी वाचन करा. रोज वाचनाकरता थोडा तरी वेळ काढून ठेवा. वाचनामुळे मेंदू सतर्क राहतो तसेच , स्ट्रेस कमी होण्यास मदत होते आणि सकारात्मकता वाढीस लागते.
१४. Brain Teaser Challenge - महिनाभर दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या मेंदुला चालना देणार्या गोष्टी करा, जसे की कोडी, सुडोकू, मेमरी गेम्स सोडवा, मेंदुला कामाला लावा.
१५. Breathe Deep Challenge - दिवसभारातून दोनदा वेळ काढून लांब, संथ श्वास घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. लांब, संथ श्वासामुळे मनातील चलबिचल कमी होते, स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, मानसिक स्वास्थ्य सुधारते.
१६. Colorful Life Challenge - दिवसभरात १० मिनिटे वेळ काढून रंगकाम करा. तुम्ही चित्र काढून रंगवा, कलरींग बूक वापरा, वेगवेगळ्या पॉटरीवर रंगवा इत्यादी...रंगवण्याकरता काहीही माध्यम वापरा. रंगकाम केल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढते, स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.
१७. Create It Challenge - महिन्याभरात ५०० मिनिटं काढून काहीतरी नवनवीन बनवा. पेंटींग, कविता, कथा, बागकाम, ज्वेलरी, नाच, गाणे किंवा तुम्हाला आवडणारे काहीही नवे क्रिएशन.
१८. Express Thanks Challenge - आठवड्याला साधारण ५ किंवा महिन्याभरात २० हस्तलिखीत थँक्यू नोट्स बनवा. खर तर हा ओल्ड-फॅशन्ड प्रकार आहे, पण स्वतःच्या हस्ताक्षरात एखाद्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्यातून तुम्हाला आणि ज्याच्याकरता नोट लिहिली आहे त्या व्यक्तीला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळेल.
१९. Kind Words Challenge - महिनाभर इतरांकरता फक्त आणि फक्त चांगले/काइंड/दयाळू शब्द वापरा. तुम्हाला इतरांची कोणती गोष्ट आवडली नाही तर ती व्यक्त करण्याची गरज नाही. कोणीही परफेक्ट नसतं हे विसरु नका, आणि कोणालाही तोडून, फटकळपणे बोलू नका. अशी वागणूक इतरांसाठीच काय, तर स्वत:करताही चांगली नसते. चांगल्या वागणूकीतून स्वतःलाही एक सकारात्मक उर्जा मिळते.
२०. New Habit Challenge - तुम्हाला एखादी नवी चांगली सवय लावायची आहे का? मग उशीर कशाचा! या महिन्यात तुम्हाला कधीपासून जी चांगली सवय लावायची आहे तिचा या महिन्यात शुभमुहुर्त करा. महिन्यानंतरही ती चालू ठेवा.
२१. Nice Job Challenge - इतरांमधल्या कित्येक गोष्टी तुम्हाला मोटीव्हेट करत असतात. विविध लोकांमधल्या तुम्हाला आवडणार्या, मोटिव्हेट करणार्या ३ गोष्टी महिनाभर रोज लिहीत चला. यामुळे लोकांमधील पॉझिटिव्ह गोष्टी पाहण्याची तुम्हाला सवय लागेल, तुम्हालाही तुमच्या आसपासच्या चांगल्या गोष्टी दिसू लागतील. तुम्ही त्यातील काही गोष्टी स्वतःकरता घेऊ शकता. महिन्याखेरी तुमच्याकडे ९० पॉसिटिव्ह गोष्टी जमलेल्या असतील!
२२. Quote Me Challenge - रोज तुम्हाला आवडणारा एक सुविचार लिहून काढा, जमल्यास लक्षातही ठेवा. सुविचाराऐवजी कविता, श्लोक, शेर किंवा आवडते वाक्यही असू शकते.
तर असे काही, यापेक्षा जास्त चॅलेंजेसही आहेत, पण वरचे काही मला आवडलेले आणि तुमच्याबरोबर शेअर करावे वाटलेले असे! :)