ऐक ना ...

हाय, कसा आहेस?
मनमौजी तू, त्यामुळे हा प्रश्न तुझ्याबाबतीत इन-व्हॅलीड ठरतो म्हणा... सरळ मुद्द्यावरच येते.

तुझे परतायचे दिवस जवळ येऊ लागलेत, म्हणून म्हटलं आधीच तुला सांगून टाकावं... एकदा आलास की तू कुठचा ऐकतो आहेस मला...
तुला आठवत का रे, कधी सुरू झालं आपलं हे सगळं?... सगळं म्हणजे... हो बाबा, बोलते स्पष्टच... अफेयर!
मला तर आठवतच नाही, किती मागे गेले तरी तू आहेसच सोबत.
तुझ्याशिवाय जगले तरी आहे का कधी, असं वाटू लागलं आहे आता... असं काय आहे आपल्यात जे अजून कायम आहे? तेच शोधून काढायचा प्रयत्न करतेय... म्हणजे समूळ नष्ट करता येईल सगळं.

का म्हणजे काय? त्रास होतो, तुझ्या स्वतःचं ते खरं करायच्या तुझ्या स्वभावाचा... हल्ली तर तू येऊच नये असं वाटू लागलंय, पण ते खूप स्वार्थी होईल, म्हणून दुसरे पर्याय शोधत असते आपलं नात संपवायचे.

किती त्रास देतोस तू मला... काहीही नाही हं, खरं तेच सांगतेय. एकतर तुला काळवेळेचं कधीच भान नसतं, कधीही येतोस आणि तू आलास की मी फक्त नि फक्त तुझं होऊन जायच, हा कुठला कायदा?

आधी ठीक होतं, पण आता गोष्टी बदलल्यात की... गोष्टींचं काय घेऊन बसलास, मीच बदललेय किती... पण तुला हे मान्यच नाही.
संसार आहे माझा, मूल आहे मला... पूर्वीसारखी अल्लड तरुणी राहिले नाही रे मी...
काही म्हणजे काहीच कसं रे कळत नाही तुला?

वर्षभर पांघरलेली गृहस्थ आयुष्याची झूल तू येताच उधळून लावतोस.
आज नको रे, उशीर झालाय...
स्वयंपाक व्हायचाय माझा...
नवरा पोहचतच असेल घरी...
लेकीला आणायला जायचंय...
ऐकूच येत नाही का तुला?
का छळतोस असा?
काय घालमेल होते माझी अशावेळी, ते माझं मलाच ठाऊक!

तरी हल्ली मी पहिल्यासारखी तुझी वाट पाहत नाही की तुझी चाहूल लागताच तुझ्यासोबत निघायच्या तयारीत रहात नाही.
उलट दारंखिडक्या बंद करून तुझी हाक माझ्यापर्यंत पोहचणार नाही याचा पुरता बंदोबस्त करते... तरी तू हट्टी, आपलं तेच खरं करणारा... बाहेरूनच आर्त साद देत राहतोस, मी बाहेर येईपर्यंत.

एक तूच आहेस माझ्या आयुष्यात, जो असं राज्य करू शकतो माझ्यावर... माझ्या मनाविरुद्ध मला खेचून घेतोस स्वतःकडे.

आताशा भेटतोस तेव्हा चिडलेलीच असते मी.
"बास झालं हां आता हे... मी नाही येणार पुन्हा बोलवशील तेंव्हा... तुला नसली तरी मला लोकलाज आहे हो!"

"बरं," म्हणत तू मला घट्ट मिठीत घेतोस... रोमारोमात भिनतोस... उधळून टाकतोस तुझं प्रेम माझ्यावर सहस्र बाहूंनी...
तुझ्या अलवार स्पर्शाने विरघळत जाते मी तुझ्यात.

धुवून पुसून लख्ख करतोस माझी पाटी...
कुणाची बायको ,कुणाची आई...
काही काही उरत नाही मी...
असते ती फक्त नि फक्त तुझी प्रेयसी.
तू एक शीळ घालताच तुझ्यामागे धावत येणारी...

आता खरंच बास झालं की रे, कंटाळला नाहीस का मला? माझ्या तक्रारींना? दुसरी शोध की एखादी, तू चल म्हणताच धावत येणारी... मला राहू दे ह्या रटाळ दुनियेत, सभ्य गृहिणीचा मुखवटा लावून. अरे खरंच, जमायाला लागलं आहे हे नाटक मला, पण फक्त तू नसतोस तोपर्यंतच!

मग, नाही ना येणार ह्या वर्षी तू... माझ्या खिडकीत, मला हाक मारायला?
यापुढे कोसळायला तू दुसरी खिडकी बघाशील का रे, पावसा?

किती नाकारलं तरीही तुझीच,

वेडी :-)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle