प्रवास पावसाचा

सुट्टीतला पाऊस खासच असायचा. कारण सुट्टीतल्या पावसाकडे सगळं लक्ष एकवटून शांतपणे बघता यायचं. त्यात गारांची भर असायचीच.
झोपाळ्याचा पाट खाली काढून ठेवला जायचा त्यामुळे लोखंडी साखळ्या मोकळ्या व्हायच्या. मग पावसाच्या पाण्यात साबणचुरा ओतून घरातली पोरं साखळ्यांना धरून फरशीवरून घसरायची. एकेका साखळीला एकेक पोर. आजूबाजूला आमच्या या खेळाची बरीच प्रसिद्धी झाली होती त्यामुळे शेजारची पाजारची पोरंसुद्धा साखळ्या खेळायला यायची. मग कधी कधी रांग करावी लागायची आणि वेळपण मोजावी लागायची. वेळ संपली की कधी कधी साखळीला चिकटलेलं पोर ऐकायचं नाही. म्हणून त्याच्यामागून पर्यवेक्षकाच्या भूमिकेत असलेल्या कुणालातरी जावे लागे. आणि अशातुन कधी कधी सगळ्यांचाच साबण चुऱ्यावरून तोल जाऊन भिंतीजवळ मुलांचा हाऽऽ ढीग लागायचा. टेंगुळ तर ठरलेलंच. मग मुलांच्या आया येऊन दोन धपाटे घालून त्यांना घेऊन जायच्या. संध्याकाळी पावसाच्या थंडाव्यात गरम चहा आणि खारी खाता खाता आम्ही भावंडं एकमेकांच्या कपाळावरच्या टेंगुळांची पाहणी करायचो. काय अभिमान वाटायचा अशा गोष्टींचा तेव्हा!
सुट्टीतला पाऊस हवाहवासा असायचा. संपूर्ण मे महिना उंडारून काढल्यामुळे सगळ्यांची तोंडं आणि हात पाय रापलेले असायचे. तसेच आमच्या खेळांच्या मध्ये मध्ये सारख्या धूळ आणि गुलमोहराच्या पानांच्या रंगीत वावटळी यायच्या. पाऊस येऊन गेल्यावर आमच्या भर रस्त्यातील खेळांमध्ये अनवाणी खेळायची मुभा मिळायची. त्यामुळे सगळ्यांचेच पळायचे वेग वाढायचे. एक वळवाचा पाऊस झोडपून गेला की रस्त्याच्या दुतर्फा बुचाच्या आणि गुलमोहराच्या सड्यांचे गालिचे पडायचे. आणि रस्तेसुद्धा स्वच्छ काळे कुळकुळीत दिसू लागायचे.

शाळेतल्या पावसाचीपण वेगळी मजा असायची. सुट्टी संपवून शाळेला परत जाण्यातली पाऊस ही एकमेव जमेची बाजू असायची. रेनकोट खरेदी हा शाळेच्या सुरुवातीचा अगदी आवडता कार्यक्रम असायचा. कारण रेनकोट ही गणवेशापासून दूर घेऊन जाणारी ओळख असायची. आई बाबा नेहमी, "पुढची पाच वर्षं चालेल असा रेनकोट द्या", असे दुकानदाराला सांगून मला चीड आणायचे. पण दुकानदार मात्र चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून गठ्ठे खाली काढायला लागायचा. रेनकोटचे, मला कोरडे ठेवण्यापेक्षाही महत्वाचे कार्य माझ्या दप्तराला कोरडे ठेवणे हे असायचे; दप्तर वॉटरप्रूफ असले तरी. त्यामुळे रेनकोट खरेदीच्या आधी दप्तर खरेदी अपरिहार्य असायची. दप्तर पाठीला लावून त्यावरून रेनकोट घातला तरी त्याची बटणं फट न पडता लागली पाहिजेत ही रेनकोटची खरी परीक्षा असायची. त्यामुळे बऱ्याचदा हवेहवेसे असे कितीतरी रेनकोट सुरुवातीलाच नापास व्हायचे. आणि पास होणाऱ्या कुठल्याच रेनकोटवर मला हवे असलेले इंद्रधनुष्य, नाहीतर छोट्या छोट्या छत्र्यांचे छाप नसायचे. माझा हिरमुसला चेहरा बघून एकदा मला आईनी या सगळ्या पेहरावावर धरायला एक थोडीशी पारदर्शक पण रंगीत ठिपक्यांची मोठी छत्री घेऊन दिली होती. अशा कडेकोट बंदोबस्तात चालत शाळेला जाताना, मधेच कडेला थांबून, त्या छत्रीतून पाऊस बघायची मजा काही वेगळीच होती.

शाळेत कधी कधी इतिहासाच्या तासाला सगळे पेंगत असताना पावसाची एक झंझावाती सर यायची आणि सगळ्यांना ताठ बसवून जायची. खिडकीच्या दिशेने माना वळलेल्या पाहून बाईंनाही काही क्षण धडा थांबवावा लागायचा. शाळा सुटायच्या वेळी शाळेबाहेर हिरवेहिरवे गार पेरू मिळायचे. मग एका हातात छत्रीचा दांडा आणि कापलेला तिखटमिठाचा पेरू धरून चालत चालत वरात पुन्हा घराकडे निघायची.

कॉलेजमधला पाऊस स्कुटीवर बसून आला. कॉलेजमधल्या पावसात अचानक रेनकोट नकोसे वाटू लागले. आणि पावसाच्या दिवसांमध्ये आम्हीदेखील कॉलेजमधून गायब होऊ लागलो. मग आई बाबांनी दिलेल्या आयत्या गाडीत, आयते पेट्रोल घालून आम्ही अगदी पानशेतपर्यंतसुद्धा भटकत जाऊ लागलो; तेही त्यांनी भरलेल्या आयत्या फीचे तास बुडवून. पावसाळ्यातली कॉलेजमधली आमची उपस्थिती ही श्रोडिंजरच्या मांजरासारखी असायची. कुठल्याही वेळी आम्ही कॉलेजात असायचोही आणि नसायचोही. कारण संपूर्ण गटाच्या हितासाठी मागे राहिलेले काही मैत्री भक्त वर्गात आमची चुपचाप हजेरी लावत असायचे. त्या दिवसांमध्ये कुडकुडत प्यायलेल्या, रस्त्याकडेच्या चहामध्ये सुद्धा मनात तरल भावना तयार करायची ताकद होती. आणि कदाचित, शाळा आणि नोकरीच्या मधले ते दुसऱ्याच्या जीवावर स्वतंत्र असायचे दिवस होते त्यामुळे पाऊससुद्धा थोडा जास्तच रम्य वाटायचा.

नोकरदार पाऊस मात्र जरा ढिम्मच वाटला. सकाळी सकाळी आवरायचा घाईत, स्वयंपाकघराच्या खिडकीतून सारखी नजर बाहेर पडायची. पाऊस म्हणजे रहदारी. आणि दुचाकीवरून प्रवास करून स्वच्छ कपड्यात ऑफिसपर्यंत पोचायची मारामार. त्यामुळे पाऊस नकोच वाटायचा. पावसामुळे मिळालेल्या लेट मार्कांनी, मध्ये मध्ये झालेल्या सर्दी पडश्यानी, आणि त्यामुळे झालेल्या खड्यांनी पावसाची गंमत घालवूनच टाकली.

त्यात मग आई झाल्यानंतरचा पाऊस आणखीनच दगदगीचा झाला. पावसाच्या चिकचिकीतून घरी येताना, पाळणाघराचा आणखी एक नवीन थांबा आला. शाळेतून परत येताना पेरू आणि छत्री धरायची जशी तारांबळ व्हायची, तशीच आताही होऊ लागली. खांद्यावर दोन-तीन पिशव्या, आणि हातात पर्स. दुसऱ्या हातात घट्ट पकडलेला एक छोटुकला हात! छोट्या रेनकोट मधून येणाऱ्या असंख्य प्रश्नांची शांतपणे उत्तरं देत, आणि मनातल्या मनात मात्र आजचे जेवण, उद्याचा नाश्ता असे विचार करत घरी येताना, पाऊस चालू आहे याचाही कधी कधी विसर पडतो.

पण अशातच समोर आलेल्या चिखलाच्या डबक्यात हात झटकून पिल्लू थपकन् उडी मारतं, आणि सुट्टीतल्या पावसाची पुन्हा एकदा आठवण येते!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle