आय थिंक,देअर फोर आय अॅम
हे,देकार्ट कधीच गेला सांगून
पण हे मला कळल्यापासून
हे अस्तित्व माझं मलाच
मिरवावं, मिरवावं वाटू लागलं
कधी संथ,शांत,निवांत वरून
कधी प्रचंड खळबळ आतून
कधी वादळापूर्वीचं गडदभरून
कधी उचंबळणारं खदखदून
अन मग वादळं, अनेक एकामागून
कधी लोकांचं एेकणारं मन
कधी तावातावाने केलेलं भांडण
कधी रुढीतले उपटलेलं तण
कधी स्वत:शीच केलेलं रण
अन कधी अगदी, अगदी नवं सृजन
उमटेल, न उमटेल, पण असेल
जाणवेल, न जाणवेल पण असेल
एक नक्की, नक्की राहिल निनादत
मनाच्या खोल खोल गाभाऱ्यात
विचारांची एक संतत, अविरत गाज!