काल एका मोठ्या ब्रँड च्या दुकानात गेले होते.लहान मुलांचे कपडे छान होते.जीन्स पाहिल्या, तर 3 ते 4, 5 ते 6, 7 ते 8, 9 ते 10 अश्या वयाच्या रेंज मध्ये मुलींच्या जीन्स, फक्त उंची वाढते.पायांची रुंदी सर्वांची अतिशय बारीक.9 ते 10 वाल्या जीन्स च्या पायांची रुंदी 2.5 इंच होती(म्हणजे टोटल 5, आणि स्ट्रेच ने अगदी कमाल स्ट्रेच करून 6 इंच.)जीन्स ला प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतोय.एकतर अगदी कुपोषित बारीक लेग्स असलेली मुलगी असा, नाहीतर होजियरी लेगिंग विकत घ्या.हे लेगिंग स्टॅयलिश अंकल लेंग्थ फार कमी ब्रँड चे मिळतात.बाकी सगळे 'पंजाबी ड्रेस सुरवार टाईप चुण्या'.टीशर्ट च्या खाली घातल्यास अत्यंत विचित्र दिसतात.म्हणजे आता या लेगिंग ला साजेसा थोडा लॉंग,बिना कट चा,फ्रॉक स्टाइल टॉप शोधणं आलं.लहान मुलींच्या साध्या पॅन्ट घ्याव्या तर ट्रॅक पॅन्ट (च) घ्याव्या लागतात.त्याला दोन्ही बाजूला वेगळ्या रंगाच्या पायपीन (का पायपिंग) चे अत्यंत कुरूप दिसणारे पट्टे असतात.हे पट्टे नसलेली प्लेन पॅन्ट होजियरी ची हा उंबर फुलाप्रमाणेच दुर्मिळ प्रकार.लेगिंग लहान मुलांना उन्हाळ्यात आवडत नाहीत.जीन्स मापात मिळत नाही.जी मिळते ती फक्त उंचीला मोठी असते.थिन लेग्ज नसले तर श्वास रोखून पायावर चढवावी आणि काढताना 3 जण मदतीला येऊन गुंडाळत गुंडाळत काढावी अशी.
यावर आम्ही शोधलेला मधला उपाय:जीन्स ची किंवा होजियरी ची 4 वर्षं मोठ्या साईझ ची कप्रि घेऊन ती फुल पॅन्ट म्हणून वापरणे. बारीकपणाचे स्टॅंडर्ड कुठल्यातरी चप्पट नितंबीय लॉंग लेगिय देशातून उचलल्याने ती कप्रिही कंबरेला मोठी वगैरे अजिबात होत नाही.ही कथा डॉक्टर च्या मते नॉर्मल वेट हाईट असलेल्या 6 वर्षाच्या मुलीची.थोडी मोठी हाड पेरं किंवा गुटगुटीत कडे झुकणार्या मुलींचं तर विचारायलाच नको.जेव्हा बाजारात मिळणाऱ्या 10 ब्रँड पैकी 8 ब्रँड अशी मापं ठेवून पॅन्ट विकतायत, आणि प्रत्यक्षात 10 पैकी 7 मुली त्या पॅन्ट मध्ये फिट न होणाऱ्या स्ट्रक्चर च्या आहेत.या मुलांना बेबी फॅट आहेत.कुठेतरी चुकतंय.गर्ल्स वेअर चे सायझिंग चे मापदंड बदलायला हवेत.सगळ्या बॉडी टाईप च्या लहान मुलींना सगळ्या टाईप चे कपडे मापात मिळण्याचा अधिकार हवा.त्या ब्रँड ला मेल लिहिलं.(दुकानाचं नाव काढून मेल इथे देतेय.त्यातल्या व्याकरण विषयक चुका दुर्लक्षित करा.घाईत लिहिलंय.)
मुळात हे वर लिहिलंय ते सर्व फक्त 'मार्केट मध्ये असे कपडे मिळत नाहीत' हे गाऱ्हाणं नसून एका स्पेसिफिक बॉडी टाईप ला आदर्श मानून इतकी उंची, इतकी रुंदी हवीच या क्रायटेरियाने जास्तीत जास्त कपडे एका मापात बनण्या बद्दल आहे.'जीन्स साईझ ला येत नाहीत तर मुलींनी बारीक व्हा/लेगिंग वापरा' म्हणून 'भाकरी नाही तर केक खा' म्हणून सोडवण्याचा सोपा प्रश्न नाहीय तो.
हीच कथा मध्ये एका काळी लो वेस्ट आणि मिड वेस्ट जीन्स ची.बायकांच्या हाय वेस्ट जीन्स मिळणं बंद झालं होतं.हाय वेस्ट जीन्स मागितल्यास तुच्छ कटाक्ष मिळणे, 'मिड वेस्ट लो.अच्छा होता है' किंवा 'हाय वेस्ट चाहीये तो जेंटस जीन्स खरीदो' असे सल्ले मिळणं हे प्रकार.सध्या जेगिंग ची फॅशन गेली 5 वर्षे आल्यापासून दणकट हाय वेस्ट जेगिंग वापरून हा प्रश्न सोडवता येतो.प्रसिद्ध ट्राउजर्स ब्रँड मध्ये कंबर किंवा मॉमी टमी असल्यास आपल्या उंचीच्या किमान 3 इंच उंच पॅन्ट घेऊन आलटर ची अनिश्चितता स्वीकारावी लागते.बहुतेक भारतात फॅशन लोकांवर लादली जाते.बाजारात ठराविक एक प्रकार चे कपडे मिळतात म्हणून ते घालावे लागतात.(साधं उदाहरण:पतियाळा नसलेली, आणि पायाला हगिंग चुणीदार सुरवार नसलेली साधी नॉर्मल घेराची सलवार सुटी मागून बघा:अनेक दुकानं शोधल्यावर एकांत मिळेल.बाकी दुकानदार 'लेगिंग घ्या/पतियाळा घ्या/पूर्ण ड्रेस विकत घ्या त्यात मिळेल' या सुचवण्या देतील.)
टेलर म्हणून,कपडे विक्रेता म्हणून अठरापगड बॉडी टाईप च्या माणसांसाठी कलेक्शन बनवणे महाग आहे.कधीकधी तोट्याचे आहे.मान्य.पण ज्या देशात आपण कपडे विकतो तिथल्या 80% पुरुष किंवा बायांच्या बॉडी टाईप चे विचार करून इंटरनॅशनल कलेक्शन अडॉप्ट केले तर विक्री जास्त नक्की होईल.सगळया बाया,लहान लहान मुली तुमचे कपडे विकत घ्यावे यासाठी अति सुंदर सडपातळ फ्लॅट हिप लॉंग लेग एम टी व्ही होस्टेस कश्या बनू शकतील?
निरोगी राहण्याची,शरीर बांधेसूद प्रमाणबद्ध असण्याची गरज आहेच.पण ते ज्यांचं नाही त्यांना एकाच ठराविक प्रकारचे कपडे मार्केट मध्ये मिळू शकतात म्हणून अनेक वर्षे वापरावं लागणं, कधीच ड्रेसिंग स्टाइल बदलता न येणं, धिस इज नॉट डन.जिथे शक्य असेल तिथे अशी संकुचित स्टॅंडर्ड बदलण्याचा प्रयत्न करा.स्वतः एक बॉडी टाईप आहोत म्हणून अमुक कपडे आयुष्यभर साठी बॅन न करता प्रयोग करत राहा.हॅप्पी ड्रेसिंग!!!
(हा लेख एका निगेटिव्ह भासणाऱ्या सुरात लिहिला आहे.मला दुकानं, व्हेअर टु बाय च्या टीप अपेक्षित नाहीत.कारण ते सर्व यशस्वी पणे शोधून झालं आहेच.यात पॉझिटिव्ह गोष्ट अशी की ऑनलाइन शॉपिंग मुळे आपल्या बॉडी टाईप मध्ये आपल्याला साजेशे कपडे सेल्सपर्सन चे तुच्छ कटाक्ष न घेता, 'वो आपके साईझ मे नही है, आपको लॉंग कुर्ता दिखाऊ क्या?' न ऐकता कपडे घेणं सहज शक्य झालं आहे.)