दुसरा भाग लिहायला वेळ घेतला खूप.. आणि भरपूर मोठा झालाय. काय ठेवावं आणि काय काढावं ह्याचा गोंधळ होऊ लागला मग आहे तसचं ठेवलं
तर आता प्रवास. ठाणे ते लेह. आम्ही बाय रोड जाणार होतो म्हणून २ दिवस आधी निघालो. आता आमच्या ग्रुप मध्ये प्रवासाची बरीच कॉम्बीनेशन्स होती. आम्ही पूर्ण बाय रोड. एक मोठा ग्रुप बाय एअर चंडीगढ , तिथुन पुढे बाईक्स. मात्र परततांना लेह हूनच बाय एअर. ह्या ग्रुपमधल्या दोघी जणी लेह ला पोहोचल्यावर पँगाँग लेक बघुन परत जाणार होत्या. आणि ५ जण डायरेक्ट लेह्ला येणार होते. थोडक्यात परत येतांना सगळे फ्लाईटनी पण आम्ही अर्थात बाय रोड.
लेह पर्यंत चा प्रवास ६ दिवसांचा होता. ( जो आम्ही येतांना ४ दिवसातच केला ).
ट्रेक आधीच्या मिटींग्ज मध्ये आमच्या असं लक्षात आलं की लोक आमच्या गाडीवर अवलंबून आहेत. बाईकर्स साठी सपोर्ट व्हेईकल असणारच होती पण , ' बाईक पर नही जमा तो तुम्हारी गाडी मे आ जाएंगे' असं ऐकायला येऊ लागलं. शेवटी, 'कोणाला मेडीकली काही त्रास झाला तरच गाडीत घेणार, बाईकची सीट, सीटला टोचतीये अशी कारणं असतील तर सॉरी', असं नवर्यानी स्पष्टच सांगीतलं ( जे अर्थात कोणालाच आवडलं नाही)., शिवाय, 'मेरा बॅग/ जॅकेट तुम्हारी गाडी मे रखेंगे' ह्याला सुद्धा आम्ही 'नाही जमणार' हे क्लीअर केलं. कारण गाडीची डिकी आमच्याच सामानाने भरणार होती. काही वेळा वाईटपणा आला तरी आपल्या निर्णयांवर ठाम रहायला लागतच.
अश्या मोठ्या प्रवासात आम्ही काही गोष्टी कटाक्षानी पाळतो. केदार, त्याचा अभ्यास, करीयर ऑप्शन्स, मनी मॅटर्स, इन्व्हेस्ट्मेंट, आणि सगळ्यात मुख्य, नातेवाईक.... हे विषय पूर्णपणे वर्ज्य.. पहाटे शक्य तितक्या लवकर निघायच आणि सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास प्रवास थांबवायचा. चहा, जेवण हे ब्रेक्स लांबवायचे नाहीत. जो ड्रायव्हींग करत असेल, त्याच्या आवडीची गाणी.. ( आणि मी करत नसेन तर माझ्या.....). :ड ड्रायव्हींग करणार्यानी फोनवर बोलायचं नाही, ब्ल्यू टुथ असलं तरी. मोबाईल्स सतत चार्ज्ड ठेवायचे. टॉयलेट दिसलं की जाऊन यायचच. आणि सगळ्यात मुख्य, भूक लागायला लागली की वाट न बघता जे बर्यापैकी स्वच्छ हॉटेल दिसेल तिथे जेऊन घ्यायचं.. नवरा २०० आणि मी १५० अश्या टप्प्यांनी ड्राईव्ह करायच अस ठरलं होतं जे अजिबात फॉलो केलं गेलं नाही. सलग ४००/४०० किमी पण ड्राईव्ह केलं आणि हायवे वर १२०-१४० च्या स्पीडनी.
आम्ही प्रवासात नवर्याची एस क्रॉस नेणार होतो. माझी ब्रिओ लहान असली तरी चालली असती कारण तिचे सस्पेंशन्स स्टीफ आहेत., लेहला खड्ड्यांच्या रस्तात त्याचा फायदा झाला असता पण ब्रिओ सामान ठेवण्याच्या द्रुष्टीने लहान शिवाय पेट्रोल. ( एस क्रॉस डिझेल ) असा विचार केला. हे आमचं १० दिवसातल घर .....
पहीला टप्पा नाशिकला बहीणीकडे. प्रवासाला सुरुवात केली आणि कसारा गाठत नाही तोच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ४.३० ला अंधारुन आलं आणि २०० मीटर वरचं वाहनही दिसेना.. ईगतपुरीला पोहोचलो आणि पाऊस गायब झाला.संध्याकाळी आम्हाला सरप्राईज म्हणून भेटायला आई बाबा आले. आमच्यासाठी बहिणीने नेहमीप्रमाणे जेवणाचा जंगी बेत केला होता. दुसर्या दिवशी पहाटे ४ ला निघायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ३ ला ऊठलो., आणि आटोपून बरोबर ४ ला निघालो. बरोबर मोठ्ठा थर्मास भरुन चहा, पराठे, कचोर्या असा नाश्ता मिळाला होता.
धुळ्याला रस्त्याच्या कडेला थांबून पराठे, चहा असा नाश्ता केला. आणि पुढचा टप्पा एकदम चितोडगढला जेवायला. मध्ये फक्त एकदा बायो ब्रेक. ११.३० पासूनच हॉटेल शोधायला सुरुवात केली, पण आम्ही हायवे वरुन गावांच्या बाहेरुन जात असल्याने शिवाय राजस्थानात पोहोचल्याने आजुबाजुला फक्त ओसाड मैदाने होती, दुकानं दिसली तरी ती रिपेअर्स वाल्यांची. शेवटी चितोडगड क्रॉस केल्यावर एक चांगल्यापैकी वाटणारं हॉटेल दिसलं आणि हुश्श झालं. तिथे अप्रतीम चुरमा लाडू आणि दाल बाटी खाल्ली. पुढचा टप्पा जयपूर. आमच्या ओरीजनल प्लॅन प्रमाणे आम्ही चितोडगढला मुक्काम करणार होतो पण तिथे आम्ही १ च्या दरम्यान पोहोचणार हे लक्षात आल्यावर अजुन पुढे जयपुर गाठायचे ठरले. त्याप्रमाणे एच व्ही के ला बुकींग करायला सांगीतलं. दुसर्या दिवशी जयपुर ते चंदीगढ आणि मग तिथे एक दिवस आराम. चंदीगढ पर्यंतचा रस्ता ( एन एच ७१, ८ आणि १ ) खूपच छान आहे. ६ लेन्स चा. फक्त काही भागात लोडेड ट्रक्स मुळे तो विचित्र खचलेला आहे. हे ट्रक्स सरळ पहील्या लेन मधुन रांगत रांगत जातात. ह्याच रस्त्यांवर आम्हाला आमच्याशी रेस लावणारे तीन चार जण वेगवेगळ्या भागात भेटले. आणि जर मी गाडी चालवत असेन तर लोकांना चांगलाच चेव चढायचा. उघड उघड रेसींग चालू आहे हे कळायचं मग आम्हीच स्लो होऊन अंतर पडू द्यायचो. प्रवासात अश्या काही एक्सेप्शन गोष्टी ही पहायला मिळाल्या.
ट्रेकच्या २ महीने आधीपासून ड्रिंक्स पूर्ण बंद करायला सांगीतली होती. ही सुचना काही लोकांनी ( जे न पिणारे होते ) मनापासून पाळली. मी माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ही बंदी धुडकाऊन घसा ओला करुन घेतला. :P
चंदीगढला आमचा ग्रुप भेटला आणि ७ ला आमचा पुढचा प्रवास सुरु झाला ते पावसातच. गाडीत जी पी एस आहे, शिवाय फोनवरच गुगल मॅप्स होतचं पण दोन्हीनी आम्हाला संपूर्ण प्रवासात ४ वेळा गंडवलं. :nottalking: सुरुवात मनालीच्या रस्त्यावरच झाली. मनालीला जातांना आम्ही चक्क 'ठाण्याहून' गेलो.
दुसर्या दिवशी जिस्पा. ह्या रस्त्यावर आम्हाला रोहतांग क्रॉस करायचा होता, त्याच्या आधी गुलाबा चेकपोस्ट, तेव्हा गाडी असेल तर पहाटे ४ लाच निघा असं हॉटेल मालकानी सांगीतलं कारण टुरीस्ट गाड्या येऊ लागल्या की मोठी रांग लागते. पण बाकी सगळे ९ ला निघणार आणि आम्ही पुढे जाऊन करणार काय, ह्या विचारानी आम्ही ८ ला निघालो आणि ४.५ तास लाईन मध्ये अडकलो आणि मी ट्रॅफीक जॅमचा असा उपयोग करुन घेतला.
रोहतांग सतत जाणार्या प्रवाशांमुळे अगदी अस्व्च्छ झालाय. बर्फ तर मळकट काळ्या रंगाचं आणि लोक अक्षरशः वाट्टेल तश्या गाड्या लावतात रस्त्यावर.. आमचा ग्रुप बाईक्स वर असल्याने पुढे निघुन गेला होता., आणि २ वाजायला आले होते, जिस्पा गाठायचं होतं म्हणून आम्ही रोहतांगला थांबलो नाही. पास क्रॉस केला आणि उताराचा रस्ता पाहून चक्रावलो. घाटाच्या त्या बाजुचा रस्ता जेवढा गुळगुळीत होता तेवढा ईकडे रस्ताच नव्हता.. फक्त अवशेष. कसेबसे उतरलो, प्रचंड भुक लागली होती आणि अचानक नचिकेत दिसला आणि मग सगळेजण. एका रोडसाईड हॉटेलमध्ये जेवलो. मी ऑम्लेट ब्रेड खाल्लं आणि एकदम लक्षात आलं, आज वटपोर्णिमा !! उपासाचा तर प्रश्नच नव्हता पण ऑम्लेट... पण हा गिल्ट थोडावेळच टिकला कारण पोटात काहीतरी विचित्र जाणवायला लागलं पण फार विचार न करता पुढे निघालो. पुढचा जिस्पा पर्यंतचा रस्ता अप्रतिम सुंदर आहे. लोक मनालीला गर्दीत जातात पण पुढे केलाँग जिस्पा त्याही पेक्षा सुंदर भाग आहे. पण मी ते एंजॉय नाही करु शकले कारण मी ड्राईव्ह करत होते आणि माझं लक्ष पोटात काय चाललय ईकडे होतं. ह्याच रस्त्यात तंडीला ईंडीयन ऑईलचा पेट्रोल पंप आहे. ह्या पंप नंतर लेह पर्यंत ३५० किमी दुसरा पंप नाही. हा एक मस्ट स्टॉप आहे.
जिस्पाला पोहोचलो. चहा घेतला आणि मी खोलीत जाऊन पडले. नवरा खाली रस्त्यावरच थांबला बाकी सगळे येइपर्यंत. हळू हळू मला पोटात ढवळतयं, थंडी वाजतीये अस वाटायला लागलं. आम्ही हॉट वॉटर बॅग्ज नेल्या होत्या, त्यात गरम पाणी भरुन शेकत, मी पडून राहीले, जेवायला गेलेच नाही. रात्री पण अस्वस्थ वाटत होतं, शेवटी पहाटे उलटी झाल्यावर जरा डुलकी लागली, पुन्हा एकदा तो एपिसोड पार पडला आणि मग पुढचे २ तास झोप लागली. सकाळी परत अस्वस्थ वाटायला लागलं आणि अॅ सीडीटी झाली आहे हे लक्षात आलं. आम्हाला आजपर्यंत कधीही अॅ.सीडीटीचा त्रास झालेला नाही म्हणून अॅॅन्टासीड्स नेल्या नव्ह्त्या, त्या सत्या कडून घेतल्या. ब्रेकफास्ट करावा असही वाटेना, ते वासही नको वाटू लागले म्हणून मी डायनिंग हॉलच्या एका कोपर्यात बसून राहीले. गोळ्या घ्यायच्या म्हणून एक टोस्ट कसाबसा खाल्ला.
आता पुढचा टप्पा सरचु. १४००० फुट ऊंचावर. ( लेह ११००० फुट आहे ). 'ईथे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे' 'ईथे तरलात तर पुढे सोपं जाईल' असा ईशारा आधीच मिळाला असल्याने मनात धाकधुक होती.
आज मी ड्राईव्ह करुच शकणार नाही हे उघड होतं. मी गाडीत बसुन जे डोळे मिटुन घेतले ते 'बार ला चा '( १६,००० फुट ) ला पोहोचल्यावर , ' अग, जरा बघ बर्फाच्या भिंती' असं म्हणत नवर्यानी हलवल्यावर उघडले. बाहेर तापमान शुन्य डिग्री होतं. सगळीकडे फक्त आणि फक्त आणि फक्त बर्फ. :surprise:
मध्यभागी असलेल्या पॅनेल वर ऊजवीकडे झिरो डिग्रीज दिसतयं
त्या भागात आम्ही आणि आमच्या पुढे मागे असणार्या २ बाईक्सवरचे तिघे ( आमचे नव्हे ) आणि एक १० सीटर बस एवढेच होतो. काच खाली केली. बर्फ भुरभुर पडत होता. बाजुनी असलेल्या बर्फाच्या भिंतीवरुन हात मनसोक्त बधीर होईपर्यंत फिरवुन घेतला. पुढे एका वळणावर एक बाईकर उभा होता आणि दुसर्या बाईक वरचे दोघे त्याची विचारपुस करत होते. आम्ही थांबलो. तर एकटा असणारा बाईकस्वार मुलगी होती. त्या बस नी तिला कट मारला आणि तिचा तोल गेला., म्हणून ती घाबरली होती. त्यांना मदत हवी का विचारलं आणि सगळं ओके आहे हे पाहून निघालो. मी पुन्हा डोळे मिटुन घेतले. ह्या पूर्ण प्रवासात, बार ला चा सोडल्यास, नवर्याला पाणी हवं असेल तेव्हा ते देण्यापुरतेच डोळे उघडले. पोटात काहीतरी वेगळच चाललयं हे जाणवत होतं. १.३० च्या दरम्यान सरचु गाठलं. आमचा ग्रुप जिस्पा सोडल्यानंतर दिसलाच नव्हता. रोहतांग नंतर फोनला रेंजच नव्हती. बी एस एन एल च कार्ड घेतलं होतं पण त्यालाही रेंज नव्हती. सरचु ला मुक्काम टेंट मध्ये होता. आम्हाला आमच्या कँपच नाव माहीत होतं, 'अॅ डव्हेंचर कॅम्प'. त्या नावाचा कॅम्प दिसल्यावर गाडी वळवली, तर तिथे अजुन सगळे टेंट उभे राहीले नव्हते ( जे मला दुसर्या दिवशी कळलं). 'ईथे असं काही बुकींग नाहीये, पुढे अजुन एक अॅ डव्हेंचर कॅंप आहे तिथे विचारा ' पुढचा अॅलडव्हेंचर कँप म्हणजे फक्त पाटी होती. 'पुढे आर्मीचं पोस्ट आहे, त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन असतो, तिकडून फोन कडून नक्की कुठे आहे ते विचारा' असं सांगीतलं, आम्ही पुढे निघालो. आता मला बसवेना. अचानक 'आपण आधीच्याच कँप मध्ये जाऊ. आणि तिथेच राहू. एकाच रात्रीचा प्रश्न आहे.' असं म्हणून नवर्यानी गाडी उलट वळवली. आधीच्या कँप मध्ये गेलो आणि त्याच्याशी बोलून एक टेंट मिळवला. , आणि आत जाऊन मी जी आडवी झाले, ते ग्लानीत गेल्यासारखी झोपून गेले.. मधुन मधुन जाग यायची तेव्हा महेश आत बाहेर करत असतांना दिसायचा. शेवटी त्यानी कार रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि ती बघुनच बाकीच्यांना कळलं की आम्ही ईथे आहोत.
४.३० च्या दरम्यान सगळे पोहोचले. थोड्या फार फरकाने सगळ्यांची अवस्था माझ्यासारखीच होती, त्यात ते सगळे बाईक वरुन बर्फात प्रवास करुन आलेले. आम्ही निदान गाडीत बंदीस्त जागेत हीटर लाऊन प्रवास केला होता. संध्याकाळी जरा जाग आली तेव्हा कळलं की श्रीरंग आणि इश्वर दोघे बाईक वरुन पडले. श्रीरंगचा हात चांगलाच दुखावला होता आणि स्वयंघोषीत डॉक्टर राम नी क्रेप बँडेज बांधुन दिलय. श्रीरंगची अवस्था वाईट होती. महेशनी निर्णय घेतला की दुसर्या दिवशी तो आमच्या बरोबर गाडीतुन लेह ला येइल., आणि आम्ही डायरेक्ट लेहच्या सरकारी हॉस्पीटल मध्ये त्याला घेऊन जाऊ.
मी काल रोहतांग ला जो ऑम्लेट ब्रेड खाल्ला होता त्यानंतर सकाळचा टोस्ट सोडल्यास दिड दिवसात काहीही खाल्लं नव्हतं. खावसं वाटतचं नव्हतं. मला प्रचंड झोप येत होती आणि उठुन बसलं की पोटात ओढल्यासारखं व्हायचं. ही अॅहसीडीटी नक्कीच नव्हती. I was hit by AMS.... महेशच्या अती आग्रहामुळे मी श्रीरंग नी आणलेला पौष्टीक लाडू खाल्ला आणि पुन्हा झोपेच्या विहीरीत गुडुप झाले.
मध्येच कधीतरी कँप मध्ये काम करणारा एक जण ब्लँकेट्स घेऊन आला. माझी अवस्था बघुन ब्लँकेट घालूनही दिलं. जाग आली. पहाटेचे ४.३० वाजले होते. मला मस्त फ्रेश वाटत होतं. हळू हळू उठुन बसले. चक्क बरं वाटत होतं. सगळीकडे काळोख होता., कारण टेंट मध्ये लाईट नव्हता. मोबाईलच्या उजेडात वॉशरुम (!!!!) ला जाऊन आले.वॉशरुम म्हणजे एक डुगडुगणारा कमोड आणि वॉश बेसीन. झोप येइना. मग बसून राहीले.कालचं पोटात ओढल्यासारख फिलींग गेलेलं होतं.मध्येच आतल्या आत अंधारात फेर्या मारल्या. महेश उठला., आणि त्याचा मोबाईल सापडेना. माझ्या मोबाईलच्या उजेडात गादी खाली, उशी खाली, ब्लँकेट्स उचलून सगळी कडे शोध शोध शोधलं पण नाही. शेवटी रात्री बाहेर कुठेतरी पडला ह्या निष्कर्षा पर्यंत आलो.,मोबाईल गेला. ६ वाजले. अचानक कुठुनतरी अलार्म चा आवाज येऊ लागला. शोधाशोध केल्यावर मोबाईल महाराज कॉटखाली असलेल्या ताडपत्रीखाली सापडले.
७ वाजता निघायचं होतं. फ्रेश होऊन ब्रेकफास्टला गेलो. आज मी नॉर्मल होते. सो आय वॉज हॅपी.. पण बाकीच्या बर्याच जणांची अवस्था अजुनही ठिक दिसत नव्हती. आज आमच्या बरोबर ईश्वर पण येणार होता कारण त्याला बाईक चालवण कठीण वाटतं होतं.
निघायच्या आधी महेशनी मला गाडी सुरु करुन ठेवायला सांगीतली., तर सुरुच होईना. सगळे प्रकार केले. शेवटी सपोर्ट व्हेइकल च्या मदतीनी जंप स्टार्ट चा प्रयत्न केला तर ते ही होईना. मॅन्युअल मध्ये पण काहीही दिलं नव्हतं, आम्ही काळजीत पडलो. माझं डॅशबोर्डवर लक्ष गेलं, तर मीटर पॅनेल वर 'आईस पॉसीबल' असे शब्द दिसले. बाईक्सचा मॅकेनीक अंकुश म्हणाला, कुलंट मे पानी है क्या? तर हो. प्रॉब्लेम लक्षात आला. कुलंट मध्ये उकळतं पाणी ओतलं आणि दुसर्या मिनीटाला मॅडम स्टार्ट झाल्या.. आपल्या कडे कुलंट मध्ये ७०:३० मध्ये कुलंट आणि पाणि असतं, थंड हवेच्या प्रदेशात पाणी अजीबात टाकत नाहीत.. हे नविन ज्ञान मिळालं.
आजचा प्रवास मोठा होता., कारण आज रस्त्यात ४ पासेस होते, ज्यात 'टांग लांग ला" हा जगातला दुसर्या क्रमांकाचा मोटरेबल पास होता. ( पहीला खारदुंगला पण भारतातच आहे ). आणि गाटा लुप्स. एका मागे एक २१ हेअरपीन टर्न्स. शिवाय गाडीत २.५ पेशंटस, ज्यात एकाचा हात दुखावला होता. त्याला त्रास होणार नाही ह्या बेतानी आज हळू हळू ड्राईव्ह करायच होतं. प्रवास सुरु केला आणि ५ व्या मिनीटाला जो खड्डेयुक्त रस्ता लागला तो पुढे पँग पर्यंत ६० किमी तसाच होता. आत्ता पर्यंत च्या प्रवासातला सगळ्यात खराब रस्ता. आणि औषधालाही माणुस नाही. अध्ये मध्ये ईंडीयन ऑईल चे टँकर तेवढे दिसायचे आणि जरा बरं वाटायचं ह्या ६० किमी ला आम्हाला तब्बल तीन तास लागले.
हे गाटा लुप्स. ( फोटोंचे पिक्सेल कमी केलेत म्हणुन ते छोटे दिसताहेत).
तांगलांगला
आणि हा तिथला बर्फ.
पँग ला भारतीय आर्मीचा ट्रान्झीट कँप आहे, जो जगातला सगळ्यात ऊंचीवरचा ( १५००० फुट ) ट्रान्झीट कँप आहे. ईथे राहणार्या जवानांना फुल्ल रिस्पेक्ट.
पुढे नकी ला, ला चुंग ला, गाटा लुप्स आणि टांग लांग ला आले. ईथेही तापमान शुन्य वर पोहोचलं. एका ठिकाणी रस्त्यावर बर्फ जमा झालं होतं, तिथे आर्मीचे जवान आणि ट्रक्स जोरदार कामं करत होते.
सगळ्यात कौतुकास्पद कामगीरी आहे, बी आर ओ ( बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ) ची. ह्या ऊंचीवर, ऑक्सीजन कमी असतांना अश्या हवेत रस्ते बांधणे, ते दुरुस्त ठेवणे, बर्फ वगैरे साफ करुन वाहतुक अडणार नाही ह्याची काळजी घेणे हे किती जिकरीचे आहे. हॅट्स ऑफ टु देम.
ऊंचावर गेल्यावर जसं आपल्याला श्वसनाचा त्रास होतो, तसाच गाडीला ही होतो. हवेतला ऑक्सीजन कमी कमी झाल्यावर गाडीची पॉवर जाणवण्याइतकी कमी होते. अश्या वेळी गाडी खालच्या गिअर वरच चालवायची. कितीही मोह झाला तरी शक्यतो वरचे गिअर्स टाकायचे नाहीत. रोहतांग सोडल्यापासून आमच्या पैकी ड्रायव्हींग करणार्याला गाडीच्या पिक अप मध्ये जरा जरी फरक जाणवला तरी लगेच शेअर करत होतो.
ह्या भागात गाडी बंद पडू नये अशीच ईच्छा होती कारण दुर दुर पर्यंत एकही वाहन मदती साठी दिसत नाही. आणि एका चढावर गाडी बंद पडली. सुरु होत होती पण सगळे उपाय करुनही ती पुढे जाईना. ( चढ आणि पिक अप कमी ). शेवटी महेश सोडून आम्ही तिघे खाली उतरलो आणि धक्का दिला, अगदी श्रीरंगनी एका हातानी दिला. आमच्या जस्ट मागे इं. ऑ चे ४ ट्रक्स होते. ते शांतपणे थांबले. आणि आम्ही पुढे जायची वाट बघत बसले. त्यांच्या असण्यानी आधार होता कारण गाडी अगदीच सुरु झाली नसती तर त्यांच्या मदतीने खेचुन पुढे घेता आली असती. पण थँक गॉड, गेली एकदाची पुढे. पुढचा प्रवास व्यवस्थीत पार पडला. जेवायला जिथे थांबलो होतो, तिथे एक चिनी मकाऊ मुलगी आली. एकटीच होती. तिच्याशी गप्पा मारल्या. ती तैवान हून आली होती. गेले ६ महीने षीकेश ला रहात होती आणि आता तिथुन एकटीच लेह ला जात होती. कोणी बरोबर नाही, कुठेही बुकींग केलेले नाही. आणि बाईक साधी बजाज डिस्कव्हरर १२५.. महेशच्या अचानक लक्षात आलं, काल बार ला चा ला बस नी कट मारल्याने धडपडलेली मुलगी ती हिच.. तिला ऑल द बेस्ट देऊन निघालो. आणि दुपारी ४ ला लेहच्या सरकारी दवाखान्यात पोहोचलो. दरम्यान मला पूर्ण बरं वाटायला लागलं होतं आणि काहीतरी हवचं म्हणून नाक गळायला सुरुवात झाली.
दवाखान्यात अगदी आश्चर्यचकीत करणारा अनुभव आला. सरकारी दवाखाना असूनही ५ मिनीटात केस पेपर, पुढच्या १५ मिनीटात डॉक्टर भेटल्या, अजुन १० मिनीटात एक्सरे काढुन, कुठेही फ्रॅक्चर नाही हे क्न्फर्म करुन आम्ही बाहेर. फक्त त्याच्या हाताला बांधलेले, रादर चिकटवलेले बँडेज काढुन सपोर्ट देणारे बॅंडेज बांधुन घ्या अस डॉ नी सांगीतलं. ते बँडेज काढणं हा बिचार्या श्रीरंगसाठी महा वेदनादायी ( कारण ते त्याच्या हात, पोट, पाठ सगळीकडे पसरलं होतं) आणि आमच्यासाठी प्रचंड विनोदी प्रकार होता. आय सी यु च्या डॉ आणि नर्सेस ते काढत होत्या आणि तो, ' राम, साले, मै तुझे छोडुंगा नही' असं ओरडत होता.. विदाऊट वॅक्स वॅक्सींगचा अनुभत घेतला त्यानी.
शेवटी जी पी एस कडून गंडवुन घेऊन हॉटेलला पोहोचलो. सकाळी आलेल्या उर्वशी, संतोष, सुनील, वरुण ला जेमतेम 'हाय' केलं आणि खोलीत जाऊन पडलो. उद्या आराम. बहुतेक सगळ्यांना लोकल मार्केट मध्ये बारीक सारीक खरेदी करायची होती.
ह्यावर्षी जुन आला तरी मागच्या वर्षीपेक्षा चांगलीच थंडी होती. यंदा हिवाळा लांबलाय, वर पहाडात अजुन बर्फ पडतोय हे ऐकून आम्ही उद्या अजुन एक फ्लीज जॅकेट घ्यायचं ठरवलं, शिवाय वॉर्मीज घ्यायचे होते. हे छोटे छोटे सॅशे असतात. जोरात हलवून जिथे हवं तिथे ( पोट, छाती, पाठ ) पण कपड्यांवर ठेवायचे, आपोआप गरम होतात आणि ७/८ तास गरम राहतात. नुसत्या त्वचेवर ठेवले तर भाजू शकतं.
एव्हाना माझं नाक प्रचंड वेगानी वहायला लागलं होतं. आणि डायमॉक्सचा परिणाम असावा, पण पोट बिघडलय असं वाटु लागलं होतं. ह्या दिवसा पासून ट्रेकच्या शेवटच्या दिवसा पर्यंत मी रोज सकाळी, एक सर्दीची, एक डायमॉक्स, एक पिरीएडस साठी, आणि एक पोटासाठी अश्या ४ गोळ्या घेतल्या...जे मला अजिबात आवडत नव्हतं पण काहीही इलाज नव्हता. दुसर्या दिवशी सकाळी, स्टोक ला खूप बर्फ असल्याने फक्त चांग मा पर्यंतच जाऊ देत आहेत, अशी बातमी ऐकली. त्यामुळे आम्ही सोडून सगळ्यांनी खरेदी संध्याकाळ पर्यंत पोस्टपोन केली. दुपारी आमचा मुख्य गाईड दॉरजे आला आणि जायला हरकत नाही हे कळलं. त्यानी काही सुचना दिल्या आणि झेपत नसेल, त्रास होत असेल तर सरळ सांगा, गप्प राहू नका अशी तंबी दिली.
दुसर्या दिवशी निघायचं. मी ऊत्साहाच्या मायनस झोन मध्ये होते कारण वाहणारं नाक. निघायच्या आधी झालेल्या फोटो सेशन मध्ये माझा एकच फोटो आहे. ( सुनील हौशी फोटोग्राफर आहे, त्यानी ट्रायपॉड सकट कॅमेरा आणला होता) :waiting:
फोटो झाले आणि आम्ही निघालो. आमची कार हॉटेलमध्येच राहणार होती. जातांना गाडीत चाललेल्या बडबडीकडे माझ अजिबात लक्ष नव्हतं. मी सर्दी नी बेजार झाले होते. स्टोक व्हिलेज ला पोहोचलो. सामान नेणारे घोडे, खेचरं आधीच आले होते. सगळे गाड्यांमधुन उतरलो आणि पावसाला सुरुवात झाली...
पुढच्या भागात ट्रेक आणि जमल्यास परतीचा प्रवास...