शोध / ओळख

हातापायाला मुंग्या आल्या.. दरदरुन घाम फुटला. मला ’त्याला’ शोधायलाच हवं. सकाळी घरातून निघाले तेव्हा सगळं ठिक होतं. दुपारी लंच मधे? नाही तेव्हाही सगळं आलबेलच होतं. बहुतेक संध्याकाळी बसमधे चढताना...येस तिथेच काही झालं असावं. आता कसं शोधायचं? हृदयाचे ठोके वाढले आणि मी कंट्रोल हातात घ्यायच्या आत, भितीने कंट्रोल तिच्या हातात घेतला. काळोखी पसरली आणि माझी शुद्ध हरपली.

कोणीतरी तोंडावर पाणी मारलं... "चॉकलेट आहे का कुणाकडे?" असा प्रश्न आजुबाजुला फ़िरला. कुठून तरी चॉकलेट आलं. कुठूनतरी पाण्याची बाटली आली.

"डोळे उघड.. एक घोट घे...चॉकलेट ठेव तोंडात.. घरचा नंबर काय?" अशी अगणित वाक्य वेगवेगळ्या कोनातून कानात शिरली.

थोडं बरं वाटल्यावर डोळे उघडून बघीतलं तर पुजा दिसली. हाक मारायची होती तिला पण शब्दच निघत नव्हते घशातून. पुजा समोरच बसलेली. तिने विचारलं, "कसं वाटतय?"

पुजाला पाहून बरं वाटलं. आजच तर मी तिला प्रॉमिस केलेलं लवकर निघेन असं. तिच भेटली हे बरं झालं असा विचार मनात आला तोच तिने पुढचा प्रश्न विचारला , "नाव काय तुझं? कुठे रहातेस? नंबर देतेस का? घरी कळवते तुझ्या."

आय वॉज शॉक्ड. दगडी पुतळा झाला माझा क्षणभर. कोण आहे मी? कुठे आहे? ही पुजाच आहे ना? मग हिने मला का ओळखलं नसावं? सगळ्या प्रश्नांचं भिरभिरं झालं तयार. परत काही प्रश्न आदळले इकडून तिकडून. तोपर्यंत मी थोडी सावरले. प्रश्नांचं भिरभिरं तर माझ्याच हातात होतं. त्याचं कोडं मलाच उलगडायचं होतं. बाकीचे फ़क्तं शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतील. मी मोठ्ठा श्वास घेतला नाक फ़ुगवून. फुफ्फुसात ऑक्सिजन भरुन घेतलेलं चांगलं असतं म्हणे. मी तसच काहीस केलं. मी आश्वस्त केल्यावर सगळे पांगले. पुजाही गेली "टेक के‌अर !" म्हणत.

भिरभिऱ्यातल्या प्रश्नांना दिशा द्यायच्या प्रयत्नात मी माझं आयकार्ड, रेल्वे पास, ड्रायविंग लायसन्स सगळच तपासून पाहिलं. सगळीच ओळखपत्र जागेवर सहीसलामत होती.

मग आतलं पा‌ऊच काढल. त्यातल्या कंगव्याने केस विंचरुन जरा अवतार ठिक केला आणि आरशात डोकावले. दचकलेच मी चेहरा बघून. नो वंडर पुजा अशी वागली.आरशाने अजून एक भिरभिरं सोडून दिलं.

हे सगळं ’त्याच्यामुळेच’ झालय. मला खात्री पटली. ’त्याला’ शोधायलाच हवं हे नक्की झालं. पण कुठे? आणि कसं? हेच तर कोडं होतं. लख्खकन आठवलं, मी बस मधून उतरत होते. तेव्हा रस्त्यातून धावत आलेल्या एका बा‌ईचा धक्का लागून मी पडले. "देखके नही चल सकती क्या?" म्हणायला तोंड उघडलेलं पण ... केस विस्कटलेल्या, तोंडातून लाळ गळणाऱ्या विवस्त्र अवस्थेतल्या त्या वेडसर बा‌ईकडे बघून शब्दच फ़्रिज झाले सगळे. चार वेळा तिचा स्पर्श झालेली जागा मी हातातल्या रुमालाने घासून घासून पुसली होती. "ए पगली! चल हट!" म्हणत एकाने हातातल्या छत्रीने तिला ढोसत हाकलून लावलं.

तोच क्षण...तिच वेळ , तिच जागा... मला ’त्याला’ शोधायलाच हवं. मी ताडकन उठले. प्लॅटफ़ॉर्म वरुन बाहेरच्या रस्त्यावर आले. समोरचा सब वे ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर आले. माझ्या समोर उजव्या हाताला बसस्टॉप होता. ती अजूनही बसस्टॉप जवळच फ़तकल मारुन बसली होती. बघे बघून जात होते. तिच्या बाजूने जाताना बायका नाकाला ओढणी लावत होत्या. पुरुष नुसतेच बघून लांबून जात होते. मी तिच्या आजुबाजूला शोधक नजरेने बघायला लागले. तिच्या पुढ्यात अगदी पाच पावलावर मला ’तो’ दिसला. माझे हार्टबीट्स वाढले. घाम फ़ुटला पण यावेळी मी भितीवर मात करुन ’त्याच्यापर्यंत’ पोहोचले. ’त्याला’ पाहिलं आणि खात्री पटली. तो ’तोच’ होता. माझा शोध संपला. ’त्याला’ उचलून जरा झटकला. साफ़सूफ केला आणि कोणी बघायच्या आत मी माझा तो ’मुखवटा’ चेहऱ्यावर बसवून टाकला. वेडी जोरात हसली. अगम्य शब्दात काहीतरी बोलली. तिने पाहिलं हे कळलं मला. पण तिच्या बघण्याची भिती वाटायला "ती" थोडीच शहाणी होती!

मी परत आल्या वाटेने प्लॅटफ़ॉर्म गाठला. नेहमीची ’ट्रेन आज लेट येतेय’ अशी अना‌ऊंसमेन्ट ऐकली. तितक्यात पुजाने ये‌ऊन "भोऽ" केलं. माझी वाट बघत तिने ३ गाड्या सोडल्या म्हणून मी ही तिला सॉरी म्हंटलं आणि नेहमीच्या गाडीत आम्ही जंप करुन नेहमीची जागा पटकावून मार्गस्थ झालो.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle