हा असा पाऊस कोसळत असताना नीट ऐकावं. असं वाटतं खूप काही सांगायचंय त्याला. जेव्हा आपल्यालाही लिहीण्यासाठी आतून धडका मिळत असतात आणि मग विचार आणि हात यांची स्पर्धा लागल्यावर त्यांना सांधणार्या आपली जी गत होते ना, तीच त्रेधा मला या संततधार कोसळणार्या पावसात दिसते. गेले दहा बारा तास नुसता कोसळतोय. किती साचलं असेल मनात? आणि मग हे बांध फुटले अनावर होऊन. एखादा दिवस असतो ना, मैत्रिणीचं, मित्राचं काहीतरी बिनसलेलं असतं, वाट्टेल ते बोलत असले तरी आपलं काम फक्त ऐकून घ्यायचं असतं, त्यांचं त्यांनाच कळत नसतं त्यांना काय होतंय, आपल्याला स्पष्ट कळत असतं तरी आपण अनभिज्ञ असल्याचं दाखवत फक्त त्यांचा आपल्यावरचा हक्क जपत राहायचं असतं - तसं वाटतंय आज. सांग बाबा, बोल काय मनात आहे ते सगळं सांग.
मग तो सांगतो, तुझ्या माझ्या आठवणी. पाऊस आपल्या दोघांनाही फारसा आवडत नसतानाही आपण त्याला आवडतो. सतत मागे मागे. एकदा तूच म्हणाला होतास, कसा बरोब्बर टपकतो गं आपण भेटल्यावर? मला खरंतर हे 'टपकतो' वगैरे शब्द फारसे आवडत नाहीत, पण पावसाला दुसरं काय म्हणणार! अशीच माझी कोणतीही तक्रार ओठावर यायच्या आधीच तू जिरवून टाकतोस, हे मी पाहून ठेवलंय. म्हणजे मी तिथवर पोचायच्या आधीच तू तिथे जाऊन तळ ठोकलेला असतोस. आपल्याला पाऊस आवडत नाही, पण जीवापाड आवडतं ते पावसाच्या आधीचं आणि नंतरचं वातावरण! हजार वेळा प्रेमात पडायला लावणारा तो निसर्गाचा आधीचा सोसाट्याचा उन्माद आणि नंतरचे गर्द हिरवे नि:श्वास! हरवून जायचो आपण तासन्तास त्या मृद्गंधी मिठीत.
एकदा असंच पावसाळ्याआधी एका वाटेवरुन फिरत जात असताना आपण पावलं मोजत होतो. डोक्यावर जड घमेलं घेऊन झपझप चालणार्या बायकांसारखं आपल्या कर्तव्यांची आभाळं पेलत खाली फुलं शोधत होतो. तेव्हा मी म्ह़णाले होते, या मातीसारखं होता आलं पाहिजे. काहीच न बोलता तुझी फक्त वाट पाहात राहायला आणि तू आल्यावर मृद्गंधाच्या कुप्या सांडत आनंदानं उमलून यायला मला शिकायला पाहिजे! यावर पाऊस डोळ्यात घेऊनच तू उत्तरला होतास, माझ्याबरोबर आणखी किती वाहावत जाणारेस!
पावसाचं पहाटेचं रूप अगदी प्राजक्ताच्या फुलाइतकं नाजूक आणि सुंदर. खिडकीतून असा सुंदर पाऊस झिमझिमताना बघून तुझी बोटं बासरीवर अलगद ठेवावीत तितकी हळूवार व्हायची. श्वासाचाही आवाज होऊन मी उठेन म्हणून किती जपत असायचास. नंतर चहा पिताना मी खूप बडबडत असायचे पण तू मात्र पाऊसच ऐकत असायचास. एकदा भर दुपारी अंधारून आलं होतं आणि धो धो धो कोसळायला सुरवात. मी काही लगेच सिनेमातल्या हीरोईनसारखी घाबरले नव्हते पण हीरोसारखं तू मला जवळ घेऊन उगाचच 'मी आहे' असं गोंजारावंस असं मात्र फार वाटत होतं मनातून. माझी तगमग उमटली बहुतेक चेहर्यावर आणि घेतलसंच जवळ. तेव्हा मला लख्ख जाणवलं होतं की मला वडलांची आठवण येते आहे आणि मी हमसाहमशी रडले होते. क्षणात तू माझा बाप झालास आणि मला त्याच मायेनं थोपटून झोपवलंस. पावसानं सुगंधी केलेल्या कित्येक संध्याकाळी मनाच्या वहीत कविता होऊन उतरल्या आहेत! एकदा तर पावसाने समोरचा रस्ता दिसत नव्हता म्हणून चक्क गाडी बंद करुन बसलो होतो आणि गाडीत एक आयुष्यभराचं सिक्रेट लपवलं गेलं होतं! पाऊस वरुन ठो ठो करत होता पण तू काही त्याला ताकास तूर लागू दिला नाहीस! रात्रीचा पाऊस तर आणखी एक नादमय कोडं. ते सोडवता सोडवता पहाट व्हायची. पाऊस आवडत नाही म्हणता म्हणता पावसावरच विसावलोय आपण.
आता मला तुझी वाट बघायला आवडतं आणि वाहावत जायलाही. अनुभवांचे, आठवणींचे ढग मनाच्या आकाशात कुठेतरी असतात विहरत. कधी त्यांना भरुन येईल आणि कोसळायला लागतील नेम नसतो. पण माझ्या मनात साठवलेल्या या मृद्गंधी कुप्या वाटच पाहात असतात सांडून माझं अंगण सुगंधी करण्यासाठी. तरी तो दारातला मोगरा हार मानत नाही. त्याला तुझा स्पर्श झालाय म्हणून जास्तच धुंदीत असतो. कधी कधी तर तुझा रंगही त्याला लागला असावा अशी शंका येते मला नाहीतर मी जवळ आल्यावर इतकं रंगात यायचं काय कारण!
मी तुला कितीदा तरी सांगितलंय, की हे जे सगळं आपल्याला वाटतं ना तेच तर असतं पावसावरच्या गाण्यांमध्ये. तू हसून म्हणायचास, ते ज्यानं गाणं लिहीलं त्याचं असतं. आपलं नव्हे! आज हे लिहील्यावर मला लक्षात येतंय, आपलं पावसाचं गाणं वेगळंच आहे! हा जो बाहेर कोसळणारा पाऊस आहे त्याचं स्वत:चं गाणं तर असेलच पण अशा कित्येक आयुष्यांची गाणी होताना त्यानं पाहिली असतील! म्हणूनच तर त्याच्या प्रत्येक थेंबाला स्वत:चा नाद आहे! नादावलेल्या पाऊसवेड्यांसाठी!