मी तुझं नाव ठेवलंय, साम्राज्ञी.
तुझ्याहून उंच आहेतच, जास्त उंच.
तुझ्याहून निर्मळ आहेत, अजून निर्मळ.
तुझ्याहून देखण्या आहेत की, खूप देखण्या.
पण तू साम्राज्ञी आहेस.
तू जेंव्हा रस्त्यातून चालत असतेस,
कोणी तुला ओळखत नाही.
कोणी तुझा रत्नजडित मुकूट पहात नाही.
कुणालाही दिसत नाहीत लाल-सोनेरी पायघड्या.
ज्यांना पदांकित करतेस तू जाताना,
त्या अदृष्य पायघड्या.
आणि जेंव्हा तू सामोरी येतेस,
सगळ्या नद्या खळाळतात माझ्या शरीरात.
घंटानादाने आकाश थरारतं.
आणि एक मंत्रोच्चार भरून राहतो सगळ्या जगात.
केवळ तू अन् मी,
केवळ तू-अन्-मीच , माझ्या प्रिये,
ऐकू शकतो हे सगळं.
-पाब्लो नेरूदा
स्पॅनिश थोडं शिकले हे एक कारण आणि या अथांग कवीच्या कवितांशी ओळख झाली हे दुसरं आणि मुख्य.
वादळी आयुष्य आणि त्यातून तरंगत आलेल्या वेगळ्याच अलवारतेच्या पातळीवरच्या कविता. स्पॅनिश मधून वाचत डिक्शनरीचा आधार घेत (स्पॅनिशचा गोडवा अनुभवत)
अनुवाद केलेली.