असामान्य, लोकोत्तर स्त्रियांची चरित्रे आपण सगळ्या नेहमीच वाचतो,अभ्यासतो. मात्र ज्या स्त्रियांना आपण लहानपणापासून आपल्या नजरेसमोर पाहत आलोय, त्यांचं जीवन हे अगदी जवळून न्याहाळत आलोय किंबहुना त्यांच्या जीवनातील आपणही एक भाग आहोत अशा आपल्याच घरातील, अवतीभवती वावरणार्या स्त्रियांचा आपल्या स्वतःच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा असतो, असं माझं मत. आपल्या घरातल्याच म्हणून आपल्याला काही विशेष असे वाटतही नाही त्यांच्याबद्दल, पण कळत नकळतपणे त्यांच्या संस्कारांची जडणघडण आपल्याला लाभत असते आणि त्यानुसार आपलं जीवनही आकार घेत असतं.
आज मी माझ्या आयुष्याला स्पर्श केलेल्या अशाच दोन स्त्रियांबद्दल इथे लिहिणारआहे. पैकी पहिली माझी काकी तर दुसरी माझ्या शाळेतील शिक्षिका आहेत. दोन अगदी भिन्न अशी व्यक्तिमत्व असली तरी दोघींचा प्रभाव आहे माझ्या जीवनावर आणि म्हणून दोघीही माझ्या खास जवळच्या.
पहिली स्त्री आहे माझी काकी. जात्याच हुशार, अभ्यासू. खो खो, कबड्डी इ. खेळातही विशेष प्राविण्य मिळवलेली. वडील एका नामांकीत शाळेचे मुख्याध्यापक. त्यामुळे शिक्षणाचा वारसा घरातुनच मिळाला होता. डॉक्टर होण्याचं स्वप्न उरीपोटी जपलेलं आणि त्यानुसार प्रचंड मेहनत घेऊन, मेडीकलला सरकारी कॉलेजात प्रवेश मिळवला.एम. बी. बी. एस होऊन एम. डी. साठी अॅनेस्थेशियोलॉजी हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षणही पुरे केले. ते होत असतानाच लग्न होऊन आमच्या घरात आली. त्यावेळेच्या म्हणजे सत्तरच्या दशकातील नियमांप्रमाणे सरकारी कॉलेजातून पास आउट होणार्या प्रत्येक डॉक्टरला किमान एक वर्ष ग्रामीण भागात काम करणे अनिवार्य असे. त्या वेळी काकीच्या पदरात २ मुले होती. मोठा ३ वर्षांचा तर धाकटा काही महिन्यांचा. मात्र काकीने न डगमगता स्वतःच्या आई आणि सासूच्या मदतीने एम डीचा अभ्यास आणि हे ग्रामीण भागातील काम लीलया सांभाळले. मोठा मुलगा सा. बांकडे तर धाकटा आईकडे आणि स्वतः पालघर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये अशी तारेवरची कसरत तडीस नेली.
त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी आणि काही मोजक्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टीस हे चक्र सुरु झालं, जे मी माझ्या लहानपणापासून पाहत आलेय. मला आठवतोय तो प्रसंग म्हणजे याच काकाकडे सारे गटगसाठी जमलेत आणि अचानक काकीला हॉस्पिटलमधून कॉल आलाय की एक इमरजंसी आहे लगेच या आणि हातातलं सारं तसंच टाकुन न जेवता ही निघाली. डॉक्टर म्हणजे २४ बाय ७ अव्हेलेबल असायलाच हवं.
हा लिहिलेला गटगचा प्रसंग तिच्यासाठी रुटीनच झाले. रात्री दोन वाजताही ती एकटी गाडी काढुन ड्राईव्ह करत पोचत असे बोलावलेल्या ठिकाणी. हे सारं आता वाचतांना कदाचित यात काय विशेष असे वाटेल. पण हा तो काळ होता जेव्हा बायकांची नोकरी म्हणजे घर- संसाराच्या सार्या जबाबदार्या पार पाडून केलेली नोकरी, शक्यतो, सरकारी, शाळा शिक्षिकेची असं मानलं जायचं. अशी पठडीतली वाट न अवलंबिता वेगळ्या वाटेवरचं दमवून आणि दडपवून टाकणारं असं कार्यक्षेत्र तिनं निवडलं होतं. फक्त निवडलंच नाही तर यशस्वीरित्या सांभाळलं, वयाची सत्तरी येईपर्यंत, जवळजवळ ४५ वर्ष, अगदी व्यवस्थित, आपल्या कुठल्याच कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता. दिवसाचे १२- १४ तास भिंगरीसारखी घरात फिरत एकेक काम जबरदस्त वेगात हातावेगळं करायचा तिचा आवेश अगदी पाहत रहावा असा. बरं जुजबी तेव्हढेच नाही, तर घरातल्या पाच लोकांच्या पाच प्रकारच्या आवडी निवडी जपत, सण, समारंभ, रितीरिवाज आणि नातेवाईकांचे आगत-स्वागत हे ही जोडीला. आमच्या पूर्ण कुटुंबातील, सर्वांना घट्ट धरुन राहिलेली, प्रत्येकाच्या अडी अडचणीत, घरची डॉक्टर म्हणून आणि भक्कम आधार म्हणूनही सर्वात प्रथम जाऊन पोचणारी अशी ही आणि म्हणूनच तिचा आदर्श घ्यावा असाच.
मी जेव्हा माझा एम. बी. ए. चा अभ्यास असाच नोकरी, घर, लहान मुलगा हा व्याप सांभाळत करत होते तेव्हा ही माझी काकीच माझी प्रेरणास्त्रोत होती. कधी नैराश्य आलं की तिचा चेहरा आठवत असे की ती हे सारं आज या वयातही निभावतेय, मग आपण दोन वर्ष नाही का काढू शकत?
अर्थात यासाठी तिला कायम लाभलेली तिच्या जोडीदाराची मोलाची साथ आणि तिच्या कामाचे स्वरुप, वेळ-अवेळ याचा आदर करणारे सामंजस्य याचेही योगदान तितकेच महत्वाचे.
सार्या कुटुंबात कर्तबगार, हुशार, मनमिळावू, नाती जपण्यासाठी स्वतः पड खाऊन, चुक नसतांनाही समोरच्याची माफी मागायलाही न कचरणे, तसंच समोरच्याला झटक्यात माफही करुन टाकणे असे किती पैलू आहेत मला तिच्यात आढळलेले. आज या लेखानिमित्त तिची परवानगी मागतांना सुद्धा "अगं मी काय वेगळं आणि मोठंसं करतेय?" असाच नम्रपणा, केवळ माझ्या इच्छेखातर स्वतःबद्दल हे सारं लिहीण्याची परवानगी देणार्या मात्र स्वतःचे नाव प्रदर्शित होऊ नये अशी इच्छा असणार्या या माझ्या काकीला आणि तिच्यातील या देवीस्वरुपाला माझ्याकडून हा शाब्दिक सलाम !
दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या शिक्षिका आहेत, ज्यांच्यावर मी आधीच एक लेख लिहिला आहे, त्याची लिंक इथे देते.
https://www.maitrin.com/node/1041
मैत्रिणींनो, तुमच्या ओळखीत, अवतीभवती अशाच काही स्त्रिया असतील ज्यांचा तुमच्यावर प्रभाव असेल त्यांच्याबद्दल इथे जरुर लिहा. भले त्या प्रसिधीच्या झोतात कधी नसतीलही आल्या, पण तुमच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं मोलाचं स्थान या निमित्ताने व्यक्त होऊ देत.