अंबेचा उदो बोला
अश्विन शुध्द प्रतिपदा ,येई येई ग शारदे
झाली घट स्थापना , देई देई ग वरदे
दिवा अखंड लाविते,तेज ऐसे उजळू दे
कर जोडूनी नमिते ,कृपा सदैव असू दे
नऊ दिनी नऊ दुर्गा ,नवरात्री रंगे गर्बा
द्वितीयेची चंद्रकोर ,भाळी रेखे एकवीरा
खुले नेसू हिरवेगार ,लेणे शोभे अंगभरा
अंबा नांदे करवीरा ,' फुले साज ' तृतीयेला
नको काळा न पांढरा ,ऐसा शालू हवा तिला
केशरी प्राजक्त देठ ,भंग भरला सिंदुरी
छटा तीच यावी मग , वस्त्र - प्रावरांवरी
शुभ्र पांढरी कमले ,श्वेतांबर धरे देवी
भगवती सरस्वती ,निर्मलता मनी द्यावी ,
लाल चुन्नी, लाल चुडा, पायी महावर लाल
ओठी रंगलाय विडा , रूप मनी हे ठसलं
विशालता निळाईची गुलाबीची कोमलता
तुझ्या पायी लाभायची ,कशा साठी हवी चिंता
उलगडली नौवी घडी ,साडी जरीची जांभळी
आरतीस कपूर वडी ,सुगंध दरवळी
नऊ दिवसांचा सण ,नऊ रंगात रंगला
दशमीस पारणं ,चला सीमोल्लंघनाला
जय जयकार करा ,बोला उदो उदो बोला
अंबेचा उदो उदो बोला .............
विजया केळकर ____