दिनरात कष्टानि पेरीत हाती
भुकेची रुजवण मातीच्या पोटी
शिंपून घामानं तापलेली रानं
उगवून येतील दुधाळ मोती
उद्याच्या दिसाची लावून आस
झरझर लगबग पाऊले चालती
गोंदन हाती त्या सूर्या चंद्राची
स्वप्नात खळ्यात मोत्यांच्या राशी
भुरभुर पिठ की झरे सरसर
प्रसवती ओव्या हों जात्याची पाती
दुरडीत भरून पिठुर चांदणं
वर्तुळ रेखीव रेखिते पराती
भाळी रेखिले एक वर्तुळ
वर्तुळ जाळावर तव्याच्या वरती
अग्नीत चुलीच्या आणि पोटाच्या
शमवण्या दिनरात हात राबती
विसावा रातिला डोईखाली हात
घेऊन चांदणं डोळ्यांच्या पाती
चन्द्र ग आकाशी आणि दुरडीत
दोघेही निववीण्या कष्टांच्या दिंनराती
रश्मी भागवत