बंगलोरच्या शाळांना मुख्य मोठी सुट्टी दसऱ्याचीच.. त्यामुळे 'ही सुट्टी कुठे' यावर खलबतं सुरु झाली.. 'महाग पण pre-planned/टेन्शन फ्री केसरी-वीणा की आपलं-आपण प्लॅन/एक्सप्लोर करत जरा अडव्हेंचरस स्वस्त-मस्त ट्रीप' हा आमचा मुख्य वादाचा मुद्दा असतोच! यंदा बापाला लेकाची पण साथ मिळाल्याने ते जिंकले आणि ठरलं, आपलं-आपणच जायचं - पॉंडेचेरीला! श्रीअरविंद आश्रम/ मातृमंदिरमुळे मला आणि बीचेस आणि खादाडीसाठी लेकाला उत्सुकता होती. तर नवऱ्याला तिथलं जुनं अजूनही टिकून असलेलं फ्रेंच कल्चर खुणावत होतं. काय काय पाहा-करायला आहे ते बघून आणि आराम पण करायचा मूळ उद्देश डोक्यात ठेऊन चांगली २६-३० अशी पाच दिवसांची ट्रिप आखली. आणि बुकिंग करून टाकलं.
बंगलोर-पॉंडेचेरी KSRTC Volvo ची उत्तम बससेवा आहे. एकूण ७ तासांचा प्रवास.
२६ ला पहाटे ६ ला पॉंडेचेरी बस स्टॅण्डवर पोहोचलो.. सगळीकडे पाट्या/ सूचना तमिळ मध्ये! इथल्या जिलब्यांची जरा सवय होतेय तर आता ही वेगळीच कडबोळी दिसायला लागली! :ड
मैत्रिणीने आधीच कल्पना दिली असल्याने रिक्षा कमीतकमी वापरायचं ठरवलं होतंच. शिवाय हॉटेल अगदीच १.२५ कि.मी. अंतरावर होतं. check-in थेट दुपारी १२ला.. मग स्टॅन्डवरच थोडं फ्रेश होऊन पायीच निघालो.. गूगल मॅपच्या साथीने रमत-गमत, जागं होणारं ते टुमदार शहर बघत/शोधत जायला खूप मजा आली. जाता-जाताच सकाळची बंद असलेली वेगवेगळी हॉटेल्स पण हुडकून/हेरून झाली खादाडी साठी! वेळच वेळ असल्याने निवांत तासाभराने हॉटेलवर पोहोचलो.. सामान टाकलं, लवकर रूम available झालीच तर लवकर check -in ची सूचना देऊन निघालो नाश्ता शोधायला.. पुढचे ४/५ दिवस ह्या हॉटेलातच कॉम्प्लिमेंटरी कॉन्टिनेन्टल नाश्ता घ्यायचा असल्याने बाहेर वेगळं काही खाऊ ठरवलं.
जवळच लोकल कॉफी काफे दिसला. तिथे मस्त तमिळ चवीच्या इडली-वडा-डोसा सांबार वर ताव मारला आणि वर कॉफी..
टंगळ मंगळ करत हॉटेलवर ... तास- दीड तासात रूम मिळेल म्हणाले. तेवढ्यात नवरा भटकून आणि अरविंदाश्रमच्या ऑटोकेअर सेंटर मधून बरीचशी माहिती घेऊन आला.
त्यानुसार दुपारी हॉटेलवरच आराम आणि लंच घेतलं .. महागडं हॉटेल - पण अन्न ठिकठिकच होतं - लगेच रोजचं lunch/ dinner बाहेरच घ्यायचं ठरवूनच टाकलं!
बहुतेकांनी सांगितलं होतं की टू-व्हिलर/ सायकल किंवा आपली-आपली कार बुक करून भटका! काही कारणांनी हे दोन्ही ऑप्शन्स नको होते. आणि सगळीच ठिकाणं जास्तीत जास्त २ कि.मी. अंतरावर. म्हणजे हॉटेल अशाच लोकेशनमध्ये बुक केलं होतं. त्यामुळे बहुतेक सगळीकडेच पायीच भटकलो. रोजचं ५ तरी कि.मी. चालणं झालं आणि सपाटून भूक लागल्याने मग ठिकठिकाणी तऱ्हे-तऱ्हेची खादाडी पण! :drooling:
तर २६ संध्याकाळी जवळच असलेला Rock beach आणि Promnade beach ला निघालो. अर्थात पायीच..
वाटेत अरविंदाश्रमच्या त्या typical ग्रे-व्हाईट रंगांच्या बिल्डींग्स.. जुनी फ्रेंच पिवळ्या-पांढऱ्या, मोठ-मोठ्या खिडक्यांची घरं/विलाज.. दोन्ही बाजूंनी डेरेदार झाडं असलेले अवेन्यू - सायकलवर जाणारे ज्येष्ठ नागरिक... थोडा जुन्या पॉण्डेचेरीचा feel इथे या area मधेच येतो.
Goubert Avenue
Goubert Avenue
एव्हाना अंधारून आलं आणि भूकेची जाणीव .. मागच्या गल्ल्यांत अनेक छोटी/मोठी typical french / Italian restaurants/bars आहेत. (दिल्लीदा ढाबा/ बॉंबे थाली आणि इथलं A2B पण दिसलं बाकी पॉंडेचेरी मध्ये) आम्ही आपले आत जायचो.. एकंदर अँबियन्स आणि मेन्यू कार्ड (डावी/उजवी दोन्ही बाजू !!) पाहून ठरवायचो की याला उदार आश्रय द्यायचा की नाही!! शप्पथ! तिथले ऑथेंटिक पिझ्झा खाल्ल्यावर आता डॉमिनिज वगैरे जाणारच नाही घशाखाली! तसंही आता वर्षभराचे बेकारी प्रॉडक्ट्स खाऊन झालेले आहेत बाबा!
साधारणपणे कुठल्याही बऱ्या बेकरीत उत्तम पदार्थ मिळतात! 'फ्रेंच चवीचा ठसा जाणवला तरी बऱ्यापैकी भारतीयीकरण झालेले आहे'. (इति नवरा, मी नाही फ्रान्सला गेलेय अजून)
एक Wood fire Pizza वाली मस्त place दिसली तिथे पिझ्झावर ताव मारून चाली-चाली करत परत. पूर्ण बेकर्स स्ट्रीट/ एम जी रोड मार्केट एरियाची भटकंती झाली यामुळे पहिल्याच दिवशी.
२७ ला उठून heavy break-fast घेऊन परत exploring सुरु.. त्यादिवशीच्या ऑरोविलेच्या बस full असल्याने जरा प्लॅन बदलून अरविंदाश्रमची पेपर मिल, Governors House (सध्या किरण बेदी आहे तिथली गव्हर्नर. केंद्रशासित प्रदेश असल्याने तमिळांचे प्राबल्य असले तरी वेगळे स्वतंत्र गव्हर्नमेंट आहे),पॉंडेचेरी museum असे सगळे पाहिले. म्युझियम छोटेसे पण सुंदर आहे. प्राचीन काळापासून केवढा भरभराटीला आलेला व्यापार होता इथे!! खूप माहिती मिळते जुने नकाशे, भांडी-कुंडी, मूर्ती, पुतळे इ इ पहातांना.
Governor's House
मग लेकाने हेरून ठेवलेल्या एका मस्त हॉटेलात लंच घेतले. आणि मग अरविंदआश्रमला भेट!
सकाळपासून उन्हात पायपीट, तुडुंब पिझ्झा लंच ... यामुळे जरा पेंगुळलोच होतो. आश्रमात शिरताच मात्र एकदम शांत/ गार वाटलं!! स्वच्छ-सुबक-छोटासा आश्रम.. मध्यभागी फुलांची आरास केलेली समाधी.. तिथे शिस्तीत दर्शनाला जाणाऱ्या रांगा, गर्दी असून सगळीकडे फक्त आणि फक्त शांतता! लोकं अगदी मनोभावे त्या समाधीवर डोकं टेकवून कितीतरी वेळ स्तब्ध होत होते.. तिथे बसलो खूप वेळ .. उठावंसंच वाटत नव्हतं. मग लेक चुळबुळायला लागल्यावर निघालो. त्यांचं तिथेच पुस्तक विक्रीकेंद्र आहे. केवढं प्रचंड लिखाण आहे श्री अरविंद आणि मदरचं पण!! मराठी विभागातून २-४ पुस्तकं घेतली मग! अरविंदाश्रमची डिपार्टमेंट्स पाहिली. आश्रमाचे अनेक लघु-उद्योग आहेत.. मेणबत्त्या/ साबण/ अत्तरं/ पावडरी-बाम/ आयुर्वेदिक औषधे/ मध-गुलकंद, कपडे/ कापडी-खादी पिशव्या/ पर्सेस/ अनेकप्रकारची स्टोन ज्वेलरी आणि अर्थात श्री अरविंद आणि मदरचे असंख्य फोटो फ्रेम्स आणि इतर मोमेंटोज... विक्रीसाठी उपलब्ध आहेत या गोष्टी. तिथला स्टाफ अगदी नम्र आणि हसतमुख.. शिस्तीत आणि शांतपणे आपापली कामं सुरू. १२ ते २ मात्र स ग ळं बंद! यामुळे बाकी शहरात पण बरीचशी दुकानं उगाच १२ ते २ बंद करतात! तिथे थोडीफार खरेदी केली.
तसेच रमतगमत परत Goubert Street वर गेलो.. २७च्या 'World Tourism Day' निमित्त तिथे मोठा कार्यक्रम होता. तो रस्ता संध्याकाळी ६ ते दुसऱ्यादिवशी सकाळी ६ पर्यंत सामान्य रहदारीसाठी बंदच ठेवतात. त्यामुळे समुद्राच्या साथीने शांत चांदण्यात night walk करायला छान वाटतं! त्यादिवशी मात्र रस्ता माणसांनी फुलून गेला होता - वेगवेगळ्या ग्रुप्सचे मनोरंजनाचे कायर्क्रम रस्त्यावरच सुरु होते.. तिथेच मागे एका ग्राऊंडवर 'हुन्नर हाट' चे वेगवेगळ्या राज्यांचे वस्तू/खादाडी/खेळण्यांचे स्टॉल - जत्रा असा सगळा माहोल होता! अर्थात, 'दस्तकार' नंतर तिथे आम्ही ढुंकून पाहिलं नाही!
रात्री मागच्या लेनमध्ये नवीन ठिकाण शोधून परत पिझ्झा आणि लसानिया वर ताव!!
२८ - ठरवल्याप्रमाणे Paradise Beach!! रिक्षा ठरवून Chunnambar Boat Club आणि मग तिथे बुकिंग करून अर्धातास छोट्या बोटीतून Paradise Beach...
लांबचलांब पसरलेला स्वच्छ-मोकळा बीच. नेमकं बरंच उन्ह होतं त्यादिवशी पण लेकाचा उत्साह कुठला कमी होतोय. मनसोक्त मस्ती केली समुद्रात!
परतून थोडकं लंच करून हॉटेल आणि लेक-नवरा स्विमिन्ग पुलात!
२९ ला १२.४५ ची बस मिळाली ऑरोविलेची. अरविंदाश्रमचे ऑटोकेअर सेंटर आहे - त्यांच्यातर्फे माफक दरात वेगवेगळ्या टूर्स ठेवल्या आहेत - पॉंडेचेरी दर्शन, Paradise Beach, ऑरोविले, त्यांचे बॉटनिकल गार्डन आणि लेक इत्यादि. त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष बुकिंग करावे लागते. आणि त्यांच्या थोड्याच बसेस असल्याने हवे त्यावेळी हवे ते बुकिंग मिळतेच असे नाही. रोज सगळ्याच टूर्स होतातच असेही नाही. बाकी आपलेआपण रिक्षा ठरवून भटकता येतेच. यात रिक्षावाल्यांची अरेरावी आणि टूरिस्ट म्हणून तिप्पट दर सहन करायची तयारी तेवढी हवी. आम्हाला वेळचवेळ असल्याने तिसऱ्या दिवशी ऑरोविलेची टूर मिळाली तरी चालून गेलं. बाकी सगळं आम्ही भटकून कव्हर केलंच होतं तोपर्यंत.
सकाळी नेहमीप्रमाणे हेवी ब्रेकफास्ट घेऊन आम्ही एक प्रसिद्ध चर्च पाहायला गेलो - तिथे येशूच्या जीवनातले छोटे-मोठे प्रसंग भितींवर मूर्तींच्या आधारे कोरलेले आहेत. ते पाहतांना आणि आवडत्या कवितेतले "देखणे ते स्कन्ध ज्यां ये सूळ वाहता स्वेच्छया..." समोर साकार झालेलं बघतांना लेक अगदी भारावून गेला होता!
The Eglise de Notre Dame des Anges (The Church of Our Lady of Angels)
बरोबर १२.४५ ला निघालो ऑरोविलेकडे -
तिथेच ते प्रसिद्ध मातृमंदीर आहे. अर्थात पहिल्यांदा जाताना फक्त लांबून दर्शन घेता येतं. आधी १० min ची माहितीपर फिल्म दाखवतात. मोठ्या हॉलमध्ये मदारचे अनेक quotes, फोटो, त्या मातृमंदिरचे छोटं मॉडेल इ माहिती आहे. मग पास मिळतो. तिथून एक ते सव्वा कि.मी. चालून गेल्यावर तो नजराणा दिसतो! आम्ही पोहोचलो तेव्हा ऐन दुपारच्या उन्हात नुसता तळपत होता तो सुवर्णगोल!! पारणं फिटलं डोळ्यांचं !!
त्यांच्यामते तो टूरिस्ट स्पॉट नाही. ज्यांना खरंच ध्यानधारणा करायची आहे त्यांना मग दुसऱ्यादिवशी जाता येतं आत पास घेऊन. आत मग एकूण १२ कक्ष आहेत. वेगवेगळे मजले आहेत. तिथे बसून ध्यानधारणा करता येते. आत मध्यभागी मोठा स्फटीक आहे गोलाच्या वरून सूर्यप्रकाश आत थेट त्यावर पडून आतमध्ये वेगळीच प्रकाशाची किमया आणि गूढ वातावरण तयार होतं. आत्मिक उन्नतीचा तो एक विलक्षण अनुभव असणार. आम्ही ह्यावेळी आत जाणार नव्हतोच. तेवढी मनाची मशागत अजून झालेली नाही!
परतलो.. बाकी आजूबाजूला टिपिकल टूरिस्ट स्पॉट develop केलाय. खादाडी/खरेदी इत्यादि. दोन/तीन सुरेख ब्युटिक्स आहेत. मेणबत्त्या/ साबण/ परफ्यूम्स / कपडे वगैरे अप्रतिम क्लासी वस्तू! मात्र प्र चं ड महाग! बहुतेक सगळ्या फॉरिन टूरिस्ट ची तिथे गर्दी.. आपल्यासाठी नाहीतच ते!!
परततांना आजूबाजूचं ते ऑरोविले गाव नीट बघितलं.. दारिद्र्य-निरक्षरता-अस्वच्छता त्यातून येणारी लाचारी... वाईट वाटलं... किती परस्पर विरोधी जगं वसली आहेत शेजारीशेजारी.. १९८८ पर्यंत अरविंद सोसायटीच्या मालकीचे असलेले हे गाव आणि मंदिर आता सरकार आणि अरविंद फाउंडेशनच्या अधिपत्यात येते. मात्र 'मानवी एकात्मकतेचे' प्रतीक असलेले हे ठिकाण आता मानवी विरोधाभासाचेच दर्शन देते.
श्रीअरविंदांच्या पश्चात आता अरविंदाश्रमाचे कार्य वगैरे बद्दल फार काही माहिती नाहीये मला. आता आणलेली पुस्तकं वाचणार.. मुळात ठरवून अभ्यास करून पॉण्डेचेरीला गेलो नव्हतो आम्ही. त्यामुळे जे दिसलं /जाणवलं तेच इथे मांडलं आहे. जवळजवळ निम्मी पॉण्डेचेरीची जागा आश्रमाच्या मालकीची होती. त्यांचे अनेक कारखाने / लघु उद्योग चालतात. अनेकांना काम मिळालेय, शाश्वत विकासाच्या अनेक मॉडेल्स वर काम चालते. मात्र हे सगळे अपुरे असल्याची जाणीव टोचतेच. ती मानवी एकात्मकता, जागतिक खेडं, वैश्विक सामंजस्य, सुसंवाद, आत्मिक उन्नती वगैरे वगैरेंच्या पलीकडे पॉण्डेचेरीचा दुसरा चेहरा दिसतो - तो मात्र गरिबी-अस्वच्छतेने-गर्दी-गोंगाटाने गांजलेला..
टूरिस्ट डेस्टिनेशन असल्याने त्या अनुषंगाने टूरिस्टची लुबाडणूक/अडवणूक, पांढऱ्या कातडीच्या टूरिस्टपुढे लाचारी इ इ गोष्टी उबग आणतात. जाणत्या स्थानिकांची 'असे तर असणारच' ही मनोवृत्ती चीड आणते.
ही आम्हाला दिसली /जाणवली तशी तिथली झलक!
आश्रम आणि तो अनुभव घेण्यासाठी आश्रमच्या गेस्टहाऊस मध्ये राहायला हवं!
बाकी, एक वेगळा कॉलोनियल फ्रेंच फ्लेवर अनुभवण्यासाठी जरूर जा! मात्र लवकर जा!! पॉंडी झपाट्याने बदलत चाललं आहे!!!
(फोटो सौजन्य - अभंग :) )