साहित्य :-
मावा - १/२ किलो
मैदा - अंदाजे ३/४ किलो
बारीक रवा -अंदाजे ३/४ किलो
तांदूळ पिठी अर्धी वाटी
पिठी साखर- २ वाट्या
वेलची पूड २ टी स्पून
२ चमचे खसखस भाजुन पूड
साजुक तूप - पाव किलो
दूध -- अंदाजे अर्धा लिटर
मीठ - चवीनुसार
कृती :. एका मोठ्या बाऊल मध्ये ६ चमचे तूप ,१ चमचा साखर चवीनुसार किंवा अर्धा टी स्पून मीठ घेऊन ते चमच्याने छान फेटुन घ्या .आता ते पांढरे झालेले दिसेल.
त्यात २ वाट्या रवा घालुन एकत्र फेटुन घ्या.
आता मैदा घालुन सर्व मिष्रण कालवुन घ्या. लागेल तसे दूध घालुन सैलसर गोळा तयार करा.त्याला वरुन तूपाचा हात लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवा.
तोपर्यन्त सारण तयार करायचे आहे.
२ वाट्या रवा ४ चमचे तूपात खरपुस रंगावर भाजुन घ्या.
त्यावर अर्धी वाटी दूध शिंपडून ठेवा.
कढईत खवा हाताने मोकळा करुन घाला व छान भाजुन घ्या.
ह्या भाजले ल्या खव्यात ,भाजलेला रवा एकत्र करा.
[जर खवा खूप कोरडा असेल म्हणजे तुपकट नसेल तर भाजल्यावर काही बारीक खडे/कडक झालेले दिसतील अशा वेळी हे मिश्रण मिक्सरमधे फिरवुन घ्या म्हणजे रवाळ मिश्रण तयार होईल.]
आता त्यात पिठीसाखर आणि खसखस - वेलची पूड घालून एकत्र करा. हे मिश्रण कोरडे वाटत असले तर त्यात चमचाभर दूध घालुन घ्या.
भिजवलेले पिठ व सारण ह्यांचे पुरीच्या आकाराचे समान गोळे तयार करा.
ह्या मिश्रणात पुरी इतक्या आकाराच्या एकुण ३५ साटोर्या तयार होतात.
प्रत्येक पुरी लाटुन त्यात सारणाचा गोळा भरुन तांदूळ पिठी वर जाडसर लाटा.
फ्राय पॅन किंवा जाड तव्यावर मध्यम आचेवर दोन्हीकडून किंचित डाग लागेपर्यंत दोन्हीकडून भाजा. भाजता ना त्यावर अगदी थोडे पातळ केलेले तूप चमच्याने घाला.
सर्व साटोर्या ताटात थंड करायला पसरुन ठेवा.
थंड झाल्यावर डब्यात भरुन ठेवा.
जास्त दिवस टिकवायच्या असतील तर फ्रिज मध्ये ठेवा.
खाण्याच्या १५ ते २० मिनिटा पूर्वी फ्रिज बाहेर काढुन ठेवा.
१० ते २० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यास ताज्याची चव येते.