चंदेरी दुनिया
चल चल जाऊया चंदेरी दुनियेत
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना घेऊ ओंजळीत
एखादा लबाड ढग येईल अवचित
चांदोबास लपवेल काळ्या चादरीत
अरे! तो तर बसला हरणांच्या गाडीत
आणि लागलाय हसायला गालात
भाग घेऊया या का लपंडावात
गाडीवान होऊ वा शिरुया ढगात
आता तो पोहू लागलाय आकाश गंगेत
आनंद लहरींवर नक्षत्र लेण्यात
जांभाई सांगते झोप भरलीय डोळ्यात
आईनं थोपटता बाळ रमलाय स्वप्नात
विजया केळकर ___