मला सर्व भाज्या आवडतात आणि त्याहूनही जास्त म्हणजे भाज्या विकत घ्यायला प्रचंड आवडतं.
टोपल्यांतून निगूतीनं रचून ठेवलेल्या ताज्या ताज्या, रंगित भाज्या बघून मला आतून एक छानसा निर्मळ आनंद मिळतो. दादरचा रानडे रोड, माटुंग्याचा सिटीलाईट मार्केटबाहेरचा फूटपाथवरचा लांबलचक भाजीबाजार, प्लाझा सिनेमाच्या मागचं भाज्यांचं होलसेल मार्केट, माटुंगा सेंट्रलचा स्टेशनजवळचा भाजीबाजार ही माझी नित्याची आनंदबेटं! आता हाताशी मोबाईल असल्यामुळे आणि एक व्हॉटसपीय मेंटॅलिटी निर्माण झाल्यामुळे अनेकदा भाजी बाजारात, घरी भाजी आणल्यावर, भाजी शिजवण्यापूर्वी धुऊन टोपलीत ठेवल्यावर, कापल्यावर, शिजवल्यावर अशा अनेक टप्यांत तिचे लाडिक फोटो काढत असते मी.
त्याचबरोबर भटकंती करत असतानाही माझी नजर त्या त्या ठिकाणच्या भाज्यांवर असतेच. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मळ्यांतून दिसणार्या वेलींवरचे दुधी अन पडवळं, चमकदार वांगी, हिरवीगार पालक आणि मेथी ... अहाहा मोमेंट्स! दुसर्या गावात, शहरांत, देशांत फिरतानाही सुंदर हटके दिसणार्या भाज्या बघून हरखून जायला होतं. महाबळेश्वरच्या शेतातून तोडून आणलेली ताजी हिरवी वांगी (आणि त्याचबरोबर टोमॅटो, बटाटे आणि काही इतरही), लवासा/मल्हारमाचीवरून परतताना पिरंगुटच्या जवळच्या एका गावातून ( शिंदेवाडी की कायसं) घेतलेल्या ताज्या रसशीत भाज्या, गोराईहून परतताना रस्त्याशेजारच्या मळ्यातून आणून विकायला ठेवत असतानाच हावरटासारखे विकत घेतलेले बीट, मेथी, वांगी, दार्जिलिंगला जाताना घूमला पाहिलेली केशरी गाजरं आणि जांभळे मुळे, स्वित्झर्लंडचे डिझायनर टोमॅटो, फ्रान्समध्ये गवसलेले विविध आकाराचे भोपळे. आणि शिवाय माझ्या बाल्कनीतल्या भाज्या. स्वतः बी पेरून उगवलेल्या, रोजच्या रोज कौतुकाच्या नजरा झेलणार्या आणि खाताना अपाम तृप्ती देणार्या माझ्या घरच्या ऑरगॅनिक भाज्या. अशा कितीतरी आठवणी!
कालच दादरला गोडगोडुली पांढरी वांगी मिळाली. किती क्यूट असावं एखाद्या भाजीनं! अंड्यांना हिरवा देठ फुटल्यागत दिसणारी ती क्युटुली काल दिवसभर मला आनंद देऊन गेली आणि मग आज हे प्रेमपत्रं लिहावंच लागलं.
घूमची केशरी गाजरं आणि जांभळे मुळे
माटुंगा सेंट्रलची दाक्षिणात्य भाजी
लुसान, स्वित्झर्लंडचे टोमॅटो
सेंट ट्रोपेझ, फ्रान्समधले भोपळे (Squash)
व्हिजेटिआयच्या प्रदर्शनातली भाजी
चायनीज वोक करता धुऊन तयार असलेली भाजी
माझ्या घरची भाजी
गवारीच्या शेंगा
मेथी, टोमॅटो अन पालक
अळू
मेथी, माठ आणि मूग
आलं
पुदिना आणि बेसिल
इतक्या भाज्या बघून भूक लागली असेल तर हे घ्या. घरच्या भाज्या आणि घरी केलेल्या पनीरची बेक्ड डिश :
सॉरी, आवनमधून बाहेर आल्यावर खाऊन टाकली! फोटो काढलाच नाही.
तर एवढं लिहून मी माझा लेख संपवते. जय हिंद!