साहित्य- 3 वाट्या तांदूळ पिठी, 1 वाटी मैदा, 1वाटी ओल्या नारळाचा चव, 1 वाटी लोणी, 1 वाटी कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि मीठ चवीप्रमाणे. तळण्यासाठी तेल. आणि सलग वेळ. हे पीठ भिजवून ठेवलंत तर खूप तेल पितं.
कृती- हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता मीठ घालून बारीक वाटून घ्यावा. मग त्यात ओल्या नारळाचा चव घालून परत बारीक वाटा.
एका कढईत मंद आचेवर तेल तापत ठेवा. झारा आणि पेपर घातलेलं भांडं सज्ज ठेवा. कारण आपल्याला पीठ भिजवून झाल्यावर हातही न धुता कडबोळी वळायची आहेत.
तांदूळ पिठी आणि मैदा एका पसरट भांड्यात घ्या. त्यात लोणी घालून हाताने चोळून सगळ्या पिठाला नीट लावून घ्या.
आता नारळ-मिरची-कढीपत्ता वाटण त्यात नीट मिसळा. चव घेऊन मीठ घाला. आधी वाटणात मीठ घातलय ते ध्यानात ठेवा. गार पाण्याने पीठ भाकरीसाठी भिजवतो तितपत सैल भिजवा. ताबडतोब कडबोळी वळायला घ्या. घरातल्या मेंबरांनाही मदतीला बोलवा या टप्प्यावर.
अशाप्रकारे कडबोळी वळायची आहेत.
गरम, खुसखुशीत, आगळ्या चवीची कडबोळी खायला घ्या!
विशेष टीप- 1. लोणी वाटीभरापेक्षा किंचित कमी घाला.
2. कडबोळी घालताना तेल उकळतं पाहिजे. नंतर आच कमी करा. कमी आचेवर तेलात घातल्यास कडबोळी विरघळतात.
माहितीचा स्रोत- आईला राव आडनावाच्या तिच्या मैत्रिणीने शिकवली ही कडबोळी, म्हणून 'राव आंटींची कडबोळी'