प्रोटीनयुक्त पदार्थांचा विचार करताना खूप पुर्वी खानाखजानामधे पाहिलेली संजीव कपूरची ही रेसिपी आठवली. प्रमाण नीटसं माहिती नव्हतं आणि युट्युबवर शोधायलाही वेळ नव्हता.
जसे आठवले तसे हे कटलेट केले, मस्त जमले.
साहित्यः
सोयाचंक्स - एक पाकिट
आवडीच्या भाज्या - मी एक कांदा बारीक चिरून, एक गाजर आणि लाल भोपळ्याची एक फोड किसून घेतली आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली.
चवीसाठी - मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या वाटून.
एक टेबल स्पून दही
बाईंडिंगसाठी लागले तर ब्रेड क्रंब्स. पण घरात लक्श्मीपूजनाच्या उरलेल्या साळीच्या लाह्या होत्या त्या मी मिक्सरमधे बारीक करून घेतल्या. पोहे किंवा कुरमुरेही बारीक करून घालता येतील.
तव्यावर परतताना वरून लावायला थोडा बारीक रवा किंवा ब्रेडक्रंब्स आणि तेल.
कृती:
१. सोयाचंक्स भरपूर पाण्यात १०-१५ मिनिटं भिजवा. नंतर पहिलं पाणी पूर्ण काढून टाकून दुसरं पाणी घाला आणि ५ मिनिटं ते सोयाचंक्स उकळून घ्या.
२. भाज्या कापून/ किसून घ्या.
३. उकळलेले सोयाचंक्स गार झाले की पाणी पूर्णपणे निथळून टाका. अगदी प्रत्येक चंक पिळून काढत शक्य तेवढं सगळं पाणी काढा.
४. मिक्सरमधे चंक्स आणि दही एकत्र वाटा.
५. आता सगळ्या भाज्या आणि चंक्स-दह्याचं मिश्रण एकत्र कालवा. त्यात चवीचे सगळे पदार्थ घाला.
६. मिश्रण ओलसर वाटत असेल, कटलेट्स वळता येत नसतील तर त्यात ब्रेडक्रंब्स किंवा लाह्या/ पोहे/ कुरमुरे बारीक करून घाला.
७. कटलेट वळा, रव्यात घोळवा, तव्यावर तेल सोडून भाजा.
टिपा:
सोयाचंक्समधलं शक्य तेवढं पाणी काढून टाका.
दही खूप जास्त वापरू नका. पण दह्यामुळे एक छान क्रिमी टेक्स्चर येतं, चंक्सचा ऊग्र वास थोडासा मास्क होतो आणि कटलेट खातानाही कोरडं कोरडं लागत नाही.
** न्युट्रेला सोयाचंक्सच्या १० रुपयाच्या एका पाकिटात १३ कटलेट झाले.