'ती' (भाग-१)

ती ( भाग - १ )

आज ८ डिसेंबर. तिचा वाढदिवस. पण ........
काय काय करावे काही सुचेना असं झालय. ....विचार करता करता आठवतंय आमच्या विवाहाची तारीख२१ नोव्हेंबर.आणि २७ ला आम्ही दोघे ह्यांच्या नोकरीच्या गावी गेलो होतो.सवय नसल्याने कसंबसं काम निभवत होते अन् चमत्कार झाला म्हणायचा -' ती ' आली माझ्या घरी.... आनंदी आनंद गडे.......
कामात हुश्शार असावी हे पहाताच कोणीही जाणावे अशी. देखणी देखील.येताच कामास लागली.
ही ख़ुशी कोणाबरोबर शेयर करावी हे ही उमजेना. गावात नवीन,शेजारी-पाजारी तेवढी ओळख नाही.
आणि हल्ली सारखे फोन पण तेव्हां नव्हते .तिच्याच मदतीने छानसा प्रसादाचा शिरा केला. झालं सेलिब्रेशन.
आता कामं झटपट व्हावयास लागली. तसं तिच्या खेरीज पूर्वीची मदतनीस होतीच कि!तिची रहाणी नीटनेटकी. स्वच्छताप्रिय इतकी कि दिवसातनं किमान दोन वेळा तरी स्नान हवेच.
एक विशेष अन्न म्हणा जेवण म्हणा तिला लागायचे.पिंपभर आणून ठेवले कि दोन दोन महिने पुरायचे. तेही बाहेरून म्हणजे दुसऱ्या जवळच्या मोठ्या शहरातून मागवावे लागे. आमचे हे गाव खरेंच छोटे-गाव होते. तिच्यासाठी एवढे करावेच लागे.ते कष्ट तिच्या कामाकडे पहाता गौणच वाटत असत. पुढे आपल्या प्रगतीशील देशातील आमचे ते गाव प्रगतीत मागे कसं बरं रहाणार? ते तिचे स्पेशल खाद्य तेथे मिळू लागले.मग थोडा आग्रह करून तिला खाऊ घालता येऊ लागले. खुशीस पारावार राहिला नाही.
रोज थंड पाण्याने अंघोळ करणारी कधीतरी फुरगंटून बसायची मग चोजले पुरवून घ्यायची. चांगले कढत-कढत पाण्याने घासून पुसून व तेलपाणी करून उन्हात बसायला आवडायचे.
एकदा ड्रेसची बटणे तुटली.अग बाई...... काय ते नखरे !! ही नकोत.ती नकोत .हुश्श् , पटली होती अखेर .
काम नेहमीच वाघ मागे लागल्यागत. हळूबाई ? अगदी मुळीच केव्हांच नाही. कधी कधी तिला राग यायचा.तेव्हां व्हायची नासधूस. ' आलिया भोगासी असावे सादर ' !!!
आत्ताही बघा असेच झालय. ड्रेसची बटणे पुन्हा तुटली आहेत.तिला तशीच ४६ वर्षांपूर्वी सारखी बटणच हवी आहेत.अडूनच बसलीय.मी शोधून शोधून थकले. हसू येत आहे.माझ्या सारखी आहे झालं. मी नाही का ४६ वर्षांपासून त्याच कानातल्या रिंग्ज घालते.
असो, आज वाढदिवस साजरा करीन आणि तिलाच पाठवीन म्हणते दुकानात बटणे शोधायला.किती दिवस लागतील देव जाणे.गेल्या वर्षी माझ्या १४ मैत्रिणींना बोलाविले होते. मस्त ''दाल-बाटी-चुरमा' असा बेत केलेला.
आज हीचा रुसवा काढायला काहीतरी करावेच लागणार ..... तोवर आणीन दुसरी .....नकचढेल, नखरेल ,जशी भेटेल तशी. एकच काळजी तिचे माझे जमेल कां? दोन पिढ्यातील अंतर !!
आता माझेही वय होत आले की.जोवर हात-पाय चालतायेत तोवर कामही करणे ओघाओघाने आलेच.मदतनीस हवी हेही खरेच. वाढ दिवसासाठी केक करायचा आहे. ही ढम्म.हूं नाही कि चूं नाही.गेले बाहेर.पकडून घेऊन आले एकीला.मज्जा. तिनेही हळुवारपणे केक करायला मदत केली.
या या सारे या. केक खाऊया.

'ती' (भाग-२) : https://www.maitrin.com/node/2363
'ती' (भाग-३) : https://www.maitrin.com/node/3223

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle