हा खास कोकणी पदार्थ. घरच्या तांदळाचा मऊ वाफाळता भात, ही खमंग आमटी आणि वरून साजूक तुपाची धार... अहाहाहा!! सोबत कोकाणातला धुवांधार पाऊस असेल तर आमटीचा महिमा वर्णावा किती!!!!!
तर अशी ही गरम मसाल्याची आमटी चार वाट्या करायची असेल तर साधारण प्रमाण पुढीलप्रमाणे:
तुरीची डाळ - अर्ध्या वाटीपेक्शा थोडी कमी. स्वच्छ धुवून मऊ शिजवून घ्यायची, शिजवलेली डाळ साधारण पाऊण वाटी.
कांदे - दोन मध्यम
सुक्या खोबर्याचा तुकडा - अर्ध्या वाटीतला अर्धा तुकडा.
लसणी - ५-६
काळी मिरी - ७-८ दाणे
लवंगा - ४-५
दालचिनी - इन्चभर तुकडा
बडीशेप - १ टि स्पून
खसखस - अर्धा टिस्पून
तेल, लाल तिखट, मीठ, किंचीतसा गूळ आणि पाणी.
कृती:
१. तुरीची डाळ स्वच्छ धुवून १० मिनिटं भिजत घालून मऊ शिजवून घ्या, चांगली घोटून ठेवा.
२. कांद्यात सुरी खुपसून गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्या. तसंच सुकं खोबरंही गॅसवर भाजून घ्या.
गॅस खराब करायचा नसेल तर कढईत सुक्या खोबर्याचा किस कोरडाच खमंग भाजून घ्या.
किंचीतच तेल गरम करून त्यात उभे चिरलेले कांदे भाजून घ्या.
३. बडीशेप आणि खसखस कोरडी खमंग पण न जाळता भाजून घ्या.
४. चमचाभर तेल गरम करून त्यात मिरी, लवंग, दालचिनी तळून घ्या. ते काढून त्या तेलात लसणी भाजून घ्या.
५. आता आधी तळलेला गरम मसालतेमिक्सरवर बारीक करा. त्यात खसखस, बडीशेप घालून एकदा मिक्सर फिरवा. मग त्यात भाजलेलं सुकं खोबरं, कांदा आणि लसूण घालून सगळा मसाला चांगला बारीक वाटा. लागल्यास थोडंसं(च) पाणी घालता येईल.
६. आता कढईत जरा जास्त तेलाची लाल तिखट घालून फोडणी करा. त्यात वाटलेला मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत खमंग परता. मग त्यात शिजवून घोटवून घेतलेली डाळ घाला. आवश्यक तसं पाणी घाला. किंचीत गूळ घाला. चवीप्रमाणे मीठ आणि अजून आवश्यक वाटल्यास लाल तिखट घालून चांगली खळाखळा उकळा.
फोटो:
१ कांदा भाजणे
कांद्याची वरची सालं काढून टाकून कांदा भाजा, पण देठ आणि शेंडी काढू नका. ते काढून कांदा भाजला तर कांद्याच्या पाकळ्या उमलून येतील.
२ सुकं खोबरं भाजणे
फुलके भाजायच्या चिमट्याने गॅसवर सुकं खोबरं भाजता येईल.
३ खसखस बडिशेप भाजणे, गरम maसाला तळणे, लसूण तळणे
४ मसाला वाटणे आणि लाल तिखटाची फोडणी
५ तयार आमटी
आमटी फोटोमधे पिवळसर दिसत असली तरी तो फोटो फ्लॅशमुळे तसा आला आहे. तयार आमटीचा रंग चॉकलेटीपणा झुकला होता कारण मी सुकं खोबरं चांगलं काळं होईतो भाजलं होतं, त्यामुळे वाटलेला मसाला चॉकलेटीसर झाला होता. फोटोतल्यासारखा रंग यायला हवा असेल तर सुकं खोबरं कढईतच खमंग भाजून घ्या.
टिपा:
१. गूळ ऐच्छिक आहे, पण किंचीत गुळाने मसाल्याची खुमारी वाढते, आमटीवर मस्त तवंग येतो आणि मसाल्याचा, डाळीचा ऊग्रपणा लपतो.
२. बरेच जण लाल तिखटाची फोडणी न करता लवंग दालचिनीबरोबर सुक्या मिरच्याही तळून घेतात. नंतर आमटीत चवीप्रमाणे लाल तिखट घालतात.
३. शॉर्टकट मारायचा असेल तर एव्हरेस्टचा गरम मसाला वापरता येईल. पण तरी कांदा खोबरं लसणीचं वाटण करावं लागेलच.
आता तुमच्या कृती येऊ द्यात.