प्रत्येक संस्था, कार्यालय आपल्या मनुष्य बळ विकासासाठी अनेक प्रकारचे ट्रेनिंग, मीटींग्ज, सेमिनार इ. सारखे कार्यक्रम हाती घेत असते. यामुळे त्या संस्थेचा फायदाच होत असतो. पण निवृत्त होणार्या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे . नुकतीच मी Retirement and Investment Planning ह्या ट्रेनिंगला जाऊन आले आणि त्याने मी अक्षरशः प्रभावित झाले आहे. चांगली विषय निवड , कुशल , विषयात पारंगत व्याख्याते यामूळे ह्याचा फायदा आम्हाला कायम स्वरुपी होणार आहे. त्यापैकीच काही गोष्टी मी इथे शेअर करत आहे.
१) निरोगी शरीर आणि मन ही आपली पहिली संपत्ती आहे. कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे . वाढलेल्या जीवनमानामुळे प्रत्येकाला रिटायरमेंट नंतर सरासरी १५ ते २० वर्ष आयुष्य मिळते, ते जास्तीत जास्त आनंदात घालविता यायला हवे. ह्या वयात काही ना काही आरोग्याच्या समस्या असतातच त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. योग्य आहार विहार आणि नियमित वैद्यकीय सल्ला याच्या सहाय्याने आपले आरोग्य संभाळा. उदा. झोप येण्यासाठी गोळी लागत असेल तर ती डॉक्टरी सल्याने जरुर घ्या. झोप न येण्याचे दुष्परिणाम गोळीच्या दुष्परिणामांपेक्षा नक्कीच अधिक आहेत. योगासनांचा फायदा निर्विवाद आहे. मोठ्या आजारपणासाठी मेडिक्लेम सारखी पॉलिसी जरुर घ्यावी आणि निश्चिंत रहावे.
२) आपली निवृतीनंतरची पुंजी गुंतविण्याचे अनेक पर्याय आज बाजारात उपल्ब्ध आहेत पण मुद्दला सकट सगळेच जाण्याचा धोका पत्करायचे हे वय नाही. म्हणून सेफ इन्वेस्ट्मेंट करावी. नॅशनलाईज्ड बँका, पोस्ट ऑफिस सर्वात उत्तम . क्रेडिट सोसायट्या, को ऑप बँका यात जास्त व्याजाच्या मोहाने पैसे गुंतवि़णे टाळणेच इष्ट. आजपर्यंत तुम्ही तुमच्या कुटंबासाठी , मुलांसाठी आर्थिक, शारिरीक दॄष्ट्या खूप काही केले आहे. आता वेळ आहे ती स्वतः करता आणि आपल्या जोडीदारासाठी काही करण्याची. तुम्ही पै पै करुन, जीव मारुन साठविलेल्या पैशाची तुमच्या मुलांना खरचं किती गरज आहे याचा विचार करा आणि तशी गरज नसेल तर कौटुंबिक जबाबदारीमुळे आजवर राहुन गेलेल्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यावर तुमचा पैसा खर्च करा. पर्यटन, जोडीदाराला भेट वस्तु, नाटक, सिनेमा किंवा आपला काही छंद यावर खर्च करण्यास कचरु नका. पत्नीला हिर्याची कुडी भेट द्यायचीय बिन्धास द्या... हीच वेळ आहे, कारण हिर्याला कुठे माहित आहे तुमच्या पत्नीच वय काय आहे ते ( स्मित)
३) आपण आयुष्यभर मिळवेलेल्या संपत्तीचे, जमीन जुमल्याचे ( असल्यास) वाटप आपल्या पश्चात आपल्याच इच्छेनुसार व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते त्यासाठी इच्छापत्र जरुर लिहुन ठेवावे. एका इच्छापत्रामुळे पुढची सगळी गुंतागुंत टळु शकते. इच्छापत्र तयार करणे अतिशय सोपे आहे एका प्लेन कागदावर तुम्ही स्वहस्ताक्षरात ते लिहु शकता. त्यावर दोन साक्षीदारांच्या तुमच्या सहीच्या खरेपणासाठी असलेल्या स्वा़क्षर्या पुरेश्या आहेत. साक्षीदाराला तुम्ही काय लिहीले आहे ते दाखविणे गरजेचे नाही. तसेच इच्छापत्राचे पंजीकरण ही बंधनकारक नाही. विना रजिस्ट्रेशन इच्छापत्र ही तेवढेच लीगल असते
४) नोकरीत असताना आपण अक्षरशः घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेले असतो आपल्यासाठी सर्वात मौल्यवान वस्तु असते ती म्हणजे वेळ . पण आता तीच मौल्यवान वस्तु तुमच्याकडे अतिशय मुबलक प्रमाणात असणार आहे. एक मात्र पक्क ध्यानात ठेवा ऑफिस मध्ये बोलाविल्याशिवाय एकदा ही जाऊ नका. तुम्ही नोकरी असताना ही तुम्ही तिथे किती हवे असता तर आता हवे असाल ( स्मित) मिळालेल्या मोकळ्या वेळातुन आनंद निर्माण करायचा प्रयत्न करावयास हवा. वाचन, सत्संग, परमेश्वराची उपासना, एखादी लहानपणापासुन अंगात असलेली कला , सोशल सर्वीस ही त्यापैकीच काही उदाहरणे. एखाद्या फेसबुक सारख्या सोशल साईट वरुन जुने मित्रे मैत्रीणी ही परत एकत्र येऊन आनंद मिळवु शकतात.
५) ह्या स्टेजला मुले मोठी झालेली असतात. त्यांच्या आयुष्यात कमीत कमी ढवळाढवळ करण्याचे धोरण अंगीकारावे. चांगले शिक्षण, उत्तम नीतीमूल्ये मी पालक ह्या नात्याने त्यांना दिली आहेत आता त्यांचे निर्णय त्यानाच घेऊ देत असा विचार करावा. हे म्हणजे त्यांच्यावरचे आपले प्रेम , आपुलकी कमी झाली आहे असे नाही पण रोजच्या जीवनात ढवळाढवळ नको. शक्यतो होता होईल तोवर दूर दूर राहिले तर हे सोपे जाईल . कोणत्याही आनंदाच्या किंवा अडचणीच्या वेळी एकत्र येता येईलच. आपले रहाते घर मात्र आपल्या हयातीत आपल्या मुलांच्या नावावर कदापि करु नका. तो तुमचा विसावा आहे. ह्या गोष्टीवर फार भर दिला गेला. वक्त्यांनी खर्या घडलेल्या केसेस सांगुन हे आम्हाला पटवुन दिले.
६) नवनवीन तंत्रज्ञानाशी कायम मैत्री करा. तरुणांची फॅडं म्हणून त्याच्याशी फट्कारुन वागु नका. तसे केलेत तर जगच तुम्हाला फटकारेल. तुम्हीच एकटे पडाल.
७) आयुष्याच्या शेवटी वृद्धाश्रमात जाऊन रहावे लागले तरी ही त्याबद्ल खंत बाळगु नका , त्याचे दु;ख करुन मुलांना दुषणे देऊ नका. कारण बदलत्या परिस्थीतीनुसार वृद्धाश्रम ही काळाची गरज होणार आहे . तिथे ही आनंदातच रहायचा प्रयत्न करा.
८) तुमचे वय हे शेवट तुमच्या मनावर अवलंबुन असते. तुम्हाला वाटेल तेच तुमचे वय.
तर असे हे काही सल्ले / सुचना रिटायरमेंट ट्रेनिंग मध्ये मिळालेले . बघु या प्रत्यक्षात काय होते ! घोडा मैदान जवळच आहे....
हा लेख दोन वर्षांपूर्वीचा आहे . रिटायरमेंट नंतर फार काही न करता ही मी मस्त मजेत आहे .