मनीमोहोर यांचा रिटायरमेंट प्लॅनिंग वरचा लेख वाचुन मी माझ्या आईच्या रिटायर्ड लाइफ बद्दल लिहिलेला हा लेख आठवला, तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला म्हणुन इथे देतीये,
********************************************************************************************
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
मंगेश पाडगावकरांनी या कवितेत किती साध्या सोप्या भाषेत आनंदी जगण्याचं रहस्य सांगितलंय. सध्या माझ्या आईला बघून मला अगदी या कवितेचा प्रत्यय येतोय. दोन वर्षांपुर्वी माझी आजी गेली आणि पूर्णवेळ तिची काळजी घेण्यात गुंतून असलेली माझी आई एकटी कशी राहाणार हि काळजी मला लागून राहिली होती. पण मागच्या एक दोन वर्षात तिने स्वत:ला इतक्या चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या उपक्रम आणि उद्योगात रमवून घेतलं कि माझी काळजी मिटली नसली तरी खूप अंशी कमी नक्कीच झाली.
तिचा आवाज खूप गोड म्हणावा असा नक्कीच नाही आणि मागच्या वर्षी पर्यंत तिचा आणि गाण्याचा संबंध म्हणजे म्यु़झीक प्लेअरवर गाणी ऐकणे एवढाच होता. पण आता एका वर्षापासुन ती गाण्याच्या क्लासला जायला लागलीये. इथे तिला मैत्रिणींचा एक छान ग्रुपही मिळालाय. तिच्या एवढ्या, तिच्यापेक्षा लहान आणि मोठ्या अश्या सगळ्याच वयातल्या मैत्रिणी या चमू मध्ये आहेत. सगळ्या एकत्र येऊन एकमेकींना भरभरून आनंद द्यायचा प्रयत्न करतात हे कौतुकास्पद आहे. एकमेकींकडे गेट टुगेदर छोट्या सहली असे काही ना काही उपक्रम चालूचं असतात.
मला ती कशी गात असेल याबद्दल खूप कुतूहल वाटत होतं. भारतवारीत तिचं गाणं ऐकलं आणि मला ते मनापासून आवडलं. आपल्या आवाजाच्या मर्यादा ओळखून उगाच ओढून- ताणून ताना आलाप न घेता ती ज्या तन्मयतेनं गाणं म्हणते ते ऐकताना खूप छान वाटतं. माझ्या लेकीनंही शांतपणे तिचं गाणं ऐकून घेतलं आणि इतकंच नाही तर आज्जी तू खूप छान गाणं म्हणतेस अशी पावतीही दिली.
दुसरं म्हणजे तिला आत्तापर्यंत खूप इच्छा असूनही काही सामाजिक काम करायला कधी जमलं नव्हतं. या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांच्या ती संपर्कात आली होती पण त्यांचा एकंदरीत कारभार बघून समाजसेवेपेक्षा तिथे स्वत:च्याच पोतड्या भरण्याची लक्षणं दिसली. योगायोगाने काही महिन्यांपूर्वी तिच्या शाळेतल्या आवडत्या बाईंनी तिला संपर्क केला आणि तिला वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची माहिती करुन दिली. आमच्या गावातल्या त्यांच्या काही मिटिंग्जना जाऊन आल्यावर हे लोक खरंच तळमळीने काम करतायेत असा विश्वास तिला आला आणि ती आता त्यांच्या सोबत पुढे काय करता येईल त्याचं नियोजनही करू लागली आहे.
शिवाय शिवण, क्रोशा, रांगोळी ह्या तिच्या सदाबहार आवडींसाठी तिला आता भरपूर वेळ आहे आणि त्यामुळं आमच्या पिटुकलीला पण आजीने केलेली वेगवेगळी जॅकेट्स आणि स्वेटर्स घालून मिरवायला मिळतंय. स्मार्टफोन आणि कंप्युटरचा वापर युट्युबवर रांगोळ्यांचे नव- नवीन प्रकार बघायला होतोय. अजून मन रमवायला गॅलरीतून कुंड्या कुंड्यांमध्ये जपलेले सोयरे आहेतच. दोन मनीप्लँटच्या कुंडया तर तीच्या सोबत माझ्या जन्माच्या आधीपासून आहेत आणि त्यांना ती तिच्या बाळासारखंच जपते. शिवाय अधून मधून इकडून तिकडून नवी रोपं आणून प्रयोग करणं चालूच असतं. कुंडीतल्या कुंडीत आलं, पालक, आरवी असल्या गोष्टी पुरुन ठेवल्या कि तिच्यापुरती तजवीज पण होऊन जाते कधी कधी.
या सगळ्यांच्या जोडीला अध्यात्मही आहेच. बऱ्याच वर्षांपासून खंड पडल्यामुळे सलग न येणारी रामरक्षा आता मुखोद्गत झाली आहे. खूप देव देव नसला तरी रोजची पूजा आणि सकाळी फिरायला गेल्यावर खिंडीतल्या गणपतीचे दर्शन मनाला उभारी द्यायला पुरेसं आहे. ऑफिसमधली तिच्यासारखीच रिटायर झालेली एक मैत्रीण गोंदवल्याला जाऊन राहते हि पण एक दोनदा जाऊन राहून आली. छान अनुभव होता म्हणाली. आता तर तिथे जाणं राहाणं हा नित्याचाच आनंददायी अनुभव झाला आहे.
आधी तिला सकाळी उठायचा कंटाळा होता पण आता बऱ्यापैकी नियमित सकाळी उठून फिरायला जाते. दोन चार महिन्यांनी डॉक्टरकडे जाऊन बीपी वगैरेची तपासणी करून येते. मराठी मालिका बघून रडते आणि वर मला सांगते कि अगं असं रडलेलं चांगलं असतं आरोग्यासाठी, भावनांचा निचरा झाला कि कसं छान हलकं हलकं वाटतं मनाला. हे ऐकून मग माझ्या मनाला पण छान हलकं हलकं वाटतं.
हे सगळं ऐकून, ती कशी असेल ? काय करत असेल? तिला करमत असेल ना? असे विचार थोडे बाजूला जातात. नेहमी ती आनंदीच असते असं मला मुळीच म्हणायचं नाही. कधी कधी आज खूप उदास वाटतंय, करमतचं नाहीये असा सूरही असतो पण त्यातून स्वत:हुन बाहेर यायची मानसिक ताकत आणि साधनं तिच्याकडे असल्यामुळे त्यावेळे पुरता तिचा हुरूप वाढवला कि नंतर जास्त चिंता करायचे कारण नाही याची आता मला खातरी आहे.
मुळात तिचा स्वभाव खूपच भिडस्त आणि बुजरा आहे. आता ती हे सगळं करतीय त्यामुळं मला तिचं नवीनच रूप दिसतंय. उशिराने का होईना आमच्या सुरवंटाचं फुलपाखरू झालंय!
(इतरत्र पुर्वप्रकाशीत..)