आग

जुनाट समाधिस्थ
     निळसर सुस्त शिखरे
          तापून लालभडक झाली तेव्हा,

निरभ्र नभाचे किनारे
      हळूहळू पेट
           घेऊ लागले तेव्हा,

लोहाराचा भाता फुलून
       अग्निफुलांचा
            पाऊस पडू लागला तेव्हा,

करपट धुराचे लोळ
        स्वच्छ ढगांना खाऊन
             ढेकरा देऊ लागले तेव्हा,

हिरवे जिवंत रान
        भान विसरून
             राखेत उडून जाऊ लागले तेव्हा,

कपारींना जाग येऊन
         आवाजाचे कोलाहल
              उतू जाऊ लागले तेव्हा,

ओलसर शेवाळलेली जमीन
         रुसून एकेका भेगेत
              लुप्त होऊ लागली तेव्हा,

माझ्या डोळ्यांचा निळसर रंग
         सुकत चाललेल्या
              खाऱ्या पाण्यात उतरू लागला.

(बस्कुकडून थॉमस फायरबद्दल बातम्या ऐकून मनात आलेलं काही..)

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle