नॅशव्हिल
अनेक कलाकार या गावात रहातात. आणि आपल्या कलांचं छान प्रदर्शन कम दुकान आपल्या घरातच हॉलमधे मस्त मांडून ठेवतात. आपण काढलेली चित्र, विणलेल्या वस्तू, भरतकाम, जमवलेल्या अँटिक वस्तू अगदी कानातली, घड्याळं ही अन जुनेजुने फोटोही, आपल्या वडिलोपार्जित वस्तूही!
आम्ही एका आजीबाईंच्या घरी बराच वेळ घालवला. छोटसं दुमजली लाकडी घर. बाहेर छान छोटी बाग, दोन तीन पायऱ्या चढून वर पोर्च छोटसं. तिथे बाबाआदमच्या काळातल्या दोन सुबक खुर्च्या, एक छोटं टिपॉय, बाहेर विविध टांगलेल्या वस्तू. अच्छादनासारख्या घरावर पांघरून पडलेली जुनी झाडं, त्यांच्या घरावर पडणाऱ्या सावल्या... सगळं कसं स्वप्नवत, जादुभरं... :dd:
आम्ही हलकेच दार लोटलं. आत एक टुणटुणीत आजीबाई काहीतरी वाचत बसलेल्या. आम्हाला पाहून चष्म्याआडून गोड हसल्या. मी घाबरतच मे आय कम इंन म्हटलं. अगदी समोरासमोर अमेरिकन व्यक्तीशी बोलण्याची माझी पहिलीच वेळ. त्यांनी मात्र अगदी आपुलकीने स्वागत केलं.मी अन मागोमाग लेक आत शिरला. लेकाने मात्र लगेच छान संवाद साधला आजींशी. आईला कसं आर्ट आवडतं ते सांगितलं. तिला दाखवायला आणलय इथे सांगितलं. मग आजींनी प्रेमाने कसं काय काय बघा सांगितलं अन पुन्हा वाचनात लक्ष वळवलं.
मोठा हॉल उजवी, डावी कडे पसरलेला, उजवीकडे चित्र, रेखाचित्र, विणकाम, भरतकाम असं काय काय होतं. ब्लॅकअँडव्हाईट मधली चित्र विशेष आवडली. त्या बद्दल आजींशी बोलले. हसून त्याही छान बोलल्या. मग पुढे स्वयंपाक घर, तिथल्या वस्तू, भांडी, बहुदा आजींच्या आजींच्या काळातली... मग वळून डावीकडे वळलो तर समोरच्या सोफ्यावर गुबगुबीत मांजर. मी धस्सकन मागे झाले. " नो नो, शी इज व्हेरी फ्रेंडली" आजींचं लक्ष गेलच. मग लेकाने माझी प्राणीमात्रांबद्दलची भिती हसून सांगितली. न मी हळूच पुढे सटकले. तिथे जुने जुने दागिने, घड्याळं, कुटुंबाचे जुने फोटो असं बरच काही होतं. पुढे वर जाणारा लाकडी जिना होता अन तिथे साखळी अडकवून ठेवलेली. वरती आजींची रहाण्याची जागा असावी. आम्ही परत वळलो न दाराजवळ आलो.
मग आम्ही आजींना थँक्यु म्हटलं, त्यांच्या कलेचं, कलेक्शनचं कौतुक केलं. आजींनीही हसून थँक्यु म्हटलं न आम्ही बाहेर आलो.
बाहेर आल्यावर खरच मला स्वप्नातून बाहेर आल्यासारखच वाटलं. जणुकाही मी स्वप्नात शतकभर मागच्या काळात विहरून आले. कोण कुठली जुनी फोटोतून दिसलेली मंडळी. ना नात्याची, ना ओळखीची अचानक मला कोणत्या वेगळ्याच जगात, काळात घेऊन गेलेली :)
अमेरिकन लोकांचा हा गुण मला फार भावना. जतन करणं! डॉक्युमेंटेशन करणं! तिथली सगळीच चित्र आजींनी काढली नव्हती, काही त्यांनी जमवलेली, काही त्यांच्या मैत्रांनी काढलेली. फोटोही इतके जुने होते नक्कीच 70-80 एक वर्षांपूर्वीचे. पण हे जे जपणं आहे, त्याची योग्य निगा राखणं, त्याचं महत्व ओळखणं हे सगळं फार भावलं. हीच जाणीव नंतर कोलंबस पब्लिक लायब्ररीतही जाणवली.
तर आम्ही त्या स्वप्नातून बाहेर आलो. जरा वळसा घालून जाऊन टाऊनच्या मुख्य रस्त्यावर आलो.
तिथेही मजेशीर दुकानं. चित्रांची, दागिन्यांची, पुस्तकांची, अगदी बंदुकांचीही अन सजावटीच्या वस्तुंचीही अन खाऊची दुकानंही...
दागिन्यांच्या दुकानात एक धावती चक्कर मारली. कसले सुरेख दागिने :fadfad: विविध रंगी खडे, विविध आकार, विविध धातू. नाजूक पण वेगळ्याच धाटणीचे. पण घेतले नाहीत काहीच. एकतर तसे दागिने भारतात फार कमी लोकं वापरतील अन किंमतीही अंमळ बऱ्याच होत्या ( मी रुपयात कनव्हर्ट करत होते ना :winking: ) लेक म्हणाला आवडलय तर घे न एखादं. पण मला माहिती होतं ते नुसतं पडून राहिल... त्यापेक्षा आठवणीत ठेवणं मला जास्त आवडलं.
मग पुढे खाऊच्या दुकानात गेलो. किती विविध प्रकारचे केक्स, कुकिज, अन काय काय :) नुसतं बघूनही भूक लागली :)
मग लेकाने तिथल्या हॉटेलमधे नेलं. जुनंपुराणं प्रसिद्ध हॉटेल. तिथला पिझा खासच होता. अँबियन्स मला पुन्हा जुन्या काळात घेऊन गेला... दोन तीन फॅमिलिज अगदी आजीआजोबामुलगासूननाती सह! हे दृष्य मला नेहमी दिसलं. इथल्या फॅमिलीज एकमेकांना धरून होत्या. वॉलमार्ट, हॉटेल्स सगळीकडे नातवंड आजी, आजोबांसोबत होती. अगदी टिनएज नातवंडही आजी सोबत :) अर्थात आईबाबाही असतच.
दुसऱ्या टेबलवर दोघी मध्यमवयीन मैत्रिणी बीअर पित गप्पा मारत बसलेल्या. पलिकडे आठएकजणांचा मित्रमैत्रिणींचा गृप बसला होता. एका बाजुला दोन पन्नासएक वर्ष जुनी मैत्री असलेले आजोबा जुन्या आठवणी काढत बसलेले. इतकं छान कोझी वातावरण, सुरक्षित, निवांत वाटलं तिथे.
पिझा खात असताना वेट्रेस येऊन विचारून गेली काहीतरी. मला ढम्म कळलं नाही मग निखिलने हसून उत्तर दिलं. चांगला आहे पिझा, अजून काही नको थँक्यु. तेव्हा कळलं की बया पिझा आवडला का विचारतेय :ड
मस्त गरमागरम स्मोकी पिझा, सोबत लेक! अजून काय हवं सांगा :) :)
नॅशव्हिल मधली ही छोटीशी ट्रिप मला एक छान विश्वास देऊन गेली. लेक हजारों मैल लांब आलाय तर खरा. पण रुळलाय इथे. इथल्या लोकांनी त्याला सामावून घेतलय. परका म्हणून कणभरही वेगळी वागणूक नाही मिळत त्याला. इथला समाजही आपुलकीने बांधून ठेवणारा आहे.
एकुणात नॅशव्हिले फार समाधान दिलं. तिथेच सुचलेल्या काही ओळी अन तिथला एक फोटो ...
पानगळीचा सडा
चल दिले सारे रंग
उधळून तुझ्यासाठी
अंगावरचा हिरवा शालू
रंगवून टाकला
पिवळा, गुलाबी, केशरी,
अगदी भगवा न
मखमली तपकिरीही.
अन मग थंडीने
कुडुडणाऱ्या तुझी
नजरही वर उठेना
थंडीचा कडाका उठला
तशी तुझ्या पापण्या
जडावल्या, झुकल्या.
फक्ता तुझ्यासाठी
पानगळही स्विकारली
तुझ्या पायासाठी
लालगुलाबी पानांचा
गालिचा पसरला
माझा गहिवर
उतरवून खाली टाकला
पानगळीचा सडा!
आता चाल त्यावरून
पण जपून
थोड्याच दिवसात
अवघड होणारे तुला
साधं बाहेर पडणंही
मग घरातच रंगव
स्वप्न तुझी रंगीबेरंगी
तोवर मी आत,
आत गोठवून घेतो
माझ्यातलं सत्व.
खोल तळाशी
अन खोडांच्या खरखरीत
फटिफटींतून
अंगाखांद्यावर बर्फाची
चादर लपेटून घेत
मी इथेच थांबेन
शिशीर संपण्याची
वाट बघत
उरातला हिरवेपणा
जपून ठेवत
थांबेन तुझ्यासाठी
फक्त तुझ्यात साठी!