वंदना मिश्र यांचे 'मी मिठाची बाहुली' हे पुस्तक माझ्या एका मैत्रिणीने सांगितल्यामुळे वाचले. वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व.
खरं तर त्यांच्याबद्दल अजून काही सांगण्यापूर्वी त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेवू. सुशीलाबाईंचा जन्म १९२७ ला झाला. त्यांच्या आई लक्ष्मीबाई लोटलीकर यांचे लग्न १९१८ ला झाले होते. हे सांगायचे कारण म्हणजे वाचकांना थोडा काळाचा अंदाज यावा. सुशीलाबाईना दोन मोठी भावंडे होती. त्यांच्या वडिलांचा मृत्यू त्या अडीच वर्षांच्या असताना न्युमोनियाने अचानक झाला. आई मुलांना घेवून मुंबईतून रत्नागिरीमधील आडिवरे गावी त्यांच्या सासरी गेली पण थोड्याच काळात त्यांना कळून चुकले कि त्यांना एका विधवेसारखे जगावे लागेल. त्यांच्या आईला हे काही पटले नाही. त्या मुलांना घेवून परत मुंबईत आल्या. १९३० साली एका विधवेने तीन मुलांसह नोकरी करून मुंबई राहणे हा एक धाडसी आणि थोडासा बंडखोरी विचार होता. त्यांनी पुढे नर्सिंगचे शिक्षण घेवून हॉस्पिटलमध्ये नोकरी करायाला सुरुवात केली. तिथून त्यांच्या घराची आर्थिक परीस्थिती बदलू लागली.
शाळेत असताना सुशीलाबाईनी गाणे शिकण्यास सुरवात केली. त्याकाळी मराठी ब्राम्हण घरातील मुलीने संगीत शिकावे असे वातावरण नव्हते. पुढे त्यांचा प्रवेश मराठी रंगभूमीवर झाला. काही काळाने आईच्या अपघातामुळे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यास सुरवात केली. त्यांनी मराठी सोबत गुजराथी, मारवाडी नाटकेसुद्धा तितक्याच लीलया केली.
१९४० च्या सुमारास वयाच्या १५ १६ व्या वर्षी घराच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडून रंगभूमीवर पाउल ठेवणे हा धाडसाचा निर्णय त्यांनी घेतला होता. वयाच्या २० व्या वर्षी त्यांचे लग्न हिंदी लेखक जयदेव मिश्र यांच्याशी झाले. त्याकाळी एक तर नाटक सिनेमा मध्ये काम करणाऱ्या मुलीला लग्न साठी मुलगा मिळणे कठीण अश्या परिस्थितीत समोरून चालत आलेले स्थळ आंतरजातीय असले तरी सारासार विचार करून त्यांच्या आईने त्यांना लग्न करायचा सल्ला दिला. लग्नानंतर त्यांनी रंगभूमीला विश्राम दिला आणि घर, संसार आणि मुले यात रममाण झाल्या. लग्नानंतर २२ वर्षांनी परत व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे पुनरागमन झाले. सध्या वंदना मिश्र (वय ८८) बोरीवली येथे त्यांचा पत्रकार मुलगा अंबरीश मिश्र सोबत राहतात.
सदर पुस्तक एका विस्मृतीत गेलेल्या व्यक्तीची ओळख आपल्याला करून देते. त्याकाळी अनेक धाडसाचे निर्णय त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कसे सहजतेने घेतले हे दाखवते. तसेच ज्यांनी जुनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वाची किंवा नुकतेच स्वातंत्र्य मिळाल्या नंतरची मुंबई बघितली आहे त्यांच्यासाठी हि एक जुन्या काळातील सफर आहे. पुस्तक वाचताना लेखक आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारत असल्याची जाणीव होते. या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर जेरी पिंटो यांनी 'I, the salt doll'. या नावाने केले आहे.