(बंगळूरू कट्टा या ई- मासिकाच्या जानेवारी २०१८ च्या अंकात प्रकाशित)
डिसेंबर महिना सुरु झाला की नव्या येणार्या वर्षाच्या चाहुलीला सोबत घेऊन एक किडा नकळत बहुतांश लोकांच्या डोक्यात वळवळायला लागतो आणि तो असतो नवीन वर्षांच्या संकल्पाचा किडा. या किड्याला खतपाणी घालायला हल्ली व्हॉटस अप, फेसबुकवर “सरत्या वर्षातील कटु आठवणी सोडून द्या आणि नव्याला सामोरे जा” असे भारी संदेश असतातच. एकंदर या सगळ्यांमुळे हे ‘नववर्षाच्या संकल्पाचं भूत’ प्रत्येकाच्या मानगुटीवर बसू लागलंय. संसर्गजन्य रोगासारखी त्याची लागण होऊ लागली आहे तरुणाईत, प्री-टीन्स मध्येही. जो तो आपापले येत्या वर्षासाठीचे संकल्प सोडू लागला, त्या नुसार स्टेटस अपडेट करु लागला. अमका येत्या वर्षात अमुक तमुक किलो वजन घटवणार, तर तमका फक्त इंचेस कमी करणार. कोणी मागे पडलेला छंद पुन्हा जोपासणार, तर कुणी नियमित व्यायाम करणार, डाएट करणारे तर शेकड्यानी मिळतात.
मी सुद्धा याला अपवाद नव्हते. हं, ज्या वेळी मी संकल्प सोडायला सुरुवात केली त्या वेळी फेसबुक, ट्विटर नव्हतं इतकंच. पण संकल्प मात्र केले जायचेच. अगदी दरवर्षी न चुकता केले जायचे आणि वाट पहायला लावायचे हेच संकल्प नव्या वर्षाच्या पहाटेची.
पण अगदी मनापासून सांगते जितके दिवस हे संकल्प करण्यात नि त्याचं प्लॅनिंग करत स्वप्ने पहाण्यात घालवले त्याच्या निम्मे दिवसही कधी माझ्याकडून एकही संकल्प पुरा केला गेला नाही. अनेक संकल्पांनी तर जेमतेम जानेवारीचा पहिला पंधरवडा पाहिला असेल.
आजही लख्खपणे आठवतोय मी केलेला अगदी पहिला वहिला संकल्प. शाळेत वर्गशिक्षिकेने त्यांच्या दैनंदिनी लिहिण्याच्या पंचवीस वर्षांच्या सवयीबद्दल सांगितले. आजही ती जुनी पाने चाळताना मनाला किती आनंद देतात हे बाईंच्या तोंडून ऐकता ऐकताच भारावून जाऊन मी ही संकल्प सोडला नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून अशीच दैनंदिनी लिहिण्याचा.रोज घडलेल्या दिवसांचा इतिवॄत्तांत त्या दिवसाला लिहुन ठेवायचा. झालं.... बाबांच्या मागे भुणभुण सुरु झाली, “मला नवी डायरी पाहिजे”. बाबांनी डझनभर डायर्या माझ्या पुढ्यात टाकल्या, “घे यातली तुला जी आवडेल ती”. पण बाबांना कोणीतरी दिलेली डायरी मी का गोड मानून घेऊ? शी, अशी नाही मला मस्त डेकॉरेटीव्ह डायरी हवीये माझ्या पसंतीची. लेकीची आज्ञा शिरसावंद्य मानून मग मनपसंद डायरी घरात येऊन १ जानेवारीची प्रतिक्षा करु लागली.
रोज त्या डायरीच्या रंगीत गुळगुळीत पानांवरुन हात फिरवतांना मला मीच दिसत असे डायरी लिहीणारी.... आत्ताची मी, काही वर्षांनी मोठी झालेली मी आणि अगदी म्हातारपणी जुनी पाने जी मी आत्ताच्या वयात लिहीली होती ती वाचत स्वतःशीच खुदकन हसणारी मी. वा ! त्या वाट पहाण्यात किती आतुरता, अधीरता होती म्हणून सांगू. दरम्यानच्या काळात मित्र-मैत्रिणींना, भावंडांना या माझ्या संकल्पाबद्दल माहिती देऊन झाली होती. त्यात काय नि कसे लिहायचे याचा आराखडा मनात तयार होत होता. असे करता करता शेवटी १ जानेवारी उजाडला. पण सकाळी सकाळी डायरीत काय लिहीणार? दिवसभरातील घडामोडी नोंदवण्यासाठी तो दिवस पार तर पडला पाहिजे ना? मग परत दिवस सरायची प्रतिक्षा. त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीबरोबर झालेल्या संवादावर माझे बारीक लक्ष होते. कोण आले? कोण गेले? त्या दिवशी मी काय काय केले? यांपैकी काय काय ‘हायलाईटस’ म्हणून निवडून डायरीत लिहायचे अशा सार्या बाबींचा धांडोळा घेतला जात होता. रात्रीची जेवणे झाल्यावर मी माझे ‘मोस्ट अवेटेड’ काम करायला बसले. आवडत्या पेनने, आवडत्या ठिकाणी बसत, देवाला नमस्कार करुन डायरी लेखनास सुरुवात केली.मनात सारे योजलेले होतेच त्यामुळे झरझर लिहून पुरेही झाले. मग घरातल्या प्रत्येक सदस्याला ते दाखवण्याची लगबग. कुणीसं सांगितलं, "अगं दाखवायची नसते कुणाला आपली डायरी, आपली आपल्यापाशीच ठेवायची, आपणच वाचायची अधे-मधे", ही नवी माहिती मिळाली होती डायरी बद्दल. त्यानुसार मी स्वतःच त्या पहिल्या पानाची पारायणे केली.
मग उजाडला दुसरा दिवस. नाताळच्या सुट्टीनंतर शाळा उघडणार होती. आठ-दहा दिवसांनी मित्र-मैत्रिणी भेटल्या. मस्त मजेत गेला तो दिवस आणि डायरीत लिहायला भरपूर मसालाही मिळालाच. त्यानंतरच्या दिवशी परीक्षेची तारीख कळली आणि अभ्यासक्रम पुरा करण्यापायी जो तो शिक्षक भरभरुन लिहून देऊ लागला. किती ते हात दुखून आले होते त्या दिवशी... आई गं... अजून आठवतंय मला. जाऊ दे आज नकोच लिहुयात डायरी, नाहीतरी आज काही उल्लेखनीय असं घडलंही नाहीये संपूर्ण दिवसात. अशा प्रकारे त्या दिवशीचे पान कोरे राहिले. दुसर्या दिवसापासून परीक्षेची तयारी, गॄहपाठ करायलाच वेळ पुरत नव्हता तर डायरीकडे कसले लक्ष जातेय? एकदा अशीच परीक्षा होऊन गेलेल्या विषयांची पुस्तके आत खणात ढकलतांना ती डायरीही आत गेली ती बाहेर निघाली वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर जुनी पुस्तके निकालात काढण्यासाठी खण साफ केला तेव्हाच. तब्बल चार महिन्यांच्या गॅपनंतर. काय करावे? एकदा आधी लिहीलेली पाने वाचली. शी, काय लिहिलेय आपण लिहायचे म्हणून. आपण तर सध्या शाळेत आहोत. त्यामुळे काही ‘हॅपनिंग’ असं घडतच नाहीये आपल्या आयुष्यात... जेव्हा कधी असं ‘सनसनाटी’ घडू लागेल तेव्हाच डायरीलेखन सुरु करावं... झालं. मनाने चंग बांधला आणि त्या दिवसापासून आजतागायत मी माझ्या जीवनात काहीतरी हॅपनिंग , सनसनाटी घडायची वाट बघतेच आहे... ते घडू तर दे मग घेतलीच नवी डायरी आणि बसलेच लिहायला.
तर अशी ही कहाणी माझ्या पहिल्या वहिल्या संकल्पाची जी कधी सुफळ संपूर्ण होणार हे एक तो सर्वांच्या आयुष्याच्या डायर्या लिहिणारा विधाताच जाणे.
यानंतर मध्येच कधीतरी मराठी भावगीते डायरीत उतरवून घ्यायचा संकल्प सोडला. सकाळी अकरा वाजता विविध भारतीवर हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम लागत असे. त्या सुमारास रेडिओजवळ बसून आवडलेले भावगीत लागले की ते आधी ऐकता ऐकता पटापट रफ वहीत लिहून घ्यायचे आणि मग सुवाच्च अक्षरात डायरीत उतरवायचे. हे मात्र बरेच दिवस सुरु होते. त्या डायरीचे आणि म्हणून माझ्या संकल्पाचे पुढे काय झाले ते नीटसे आठवत नाही पण आता कधीही ती भावगीते कानांवर पडली की लहानपणीची रेडीओला कान लावून शब्द न शब्द कॉपी करणारी मी आवर्जुन डोळ्यांसमोर येतेच येते.
त्यानंतरही असेच काहीबाही संकल्प मी सोडतच राहिले आणि माझ्या शिरस्त्याप्रमाणे ते तसेच मध्येच सोडूनही दिले. कॉलेजात असताना एकदा ग्रुपमध्ये गप्पा मारत असतांना या संकल्पांचा विषय निघाला आणि मी माझ्या मित्र मैत्रिणींना माझे वर लिहिलेले ‘संकल्पाख्यान’ ऐकवले. माझ्या आळशीपणाची पुरती खिल्ली उडवली त्या दिवशी सर्वांनी.
तेव्हाच आमचा एक वर्गमित्र मात्र त्याच्या संकल्पांबद्दल भरभरुन बोलला.त्याला लहानपणापासून ट्रेकींगची विलक्षण आवड. त्याच्या बाबांच्या बरोबरीने आणि मोठा झाल्यावर ट्रेकर्स ग्रुप जॉइन करुन त्याने बरेच ट्रेक्स पूर्ण केले. दरवर्षाच्या सुरुवातीला तो या वर्षात किती आणि कोणते ट्रेक्स पूर्ण करायचे याची आखणी करत असे आणि वर्षभरात त्याची अंमलबजावणी. त्याचं असं ध्येय समोर ठेवून त्याचा पाठपुरावा करत असलेलं आयुष्य पाहून स्वतःचीच लाज वाटली होती तेव्हा की आपण साधे सुधे छंद म्हणून सोडलेले संकल्पही नाही पुरे करु शकलो. आपला हा मित्र तर एकाच संकल्पाचा ध्यास घेऊन त्याच्या पूर्तेतेसाठी किती झटतोय. खरंच हॅटस ऑफ टू हीम. त्या दिवशी मनाने खट्टू झाले होते खरी.
कैक वर्षे सरली या घटनेला. स्मार्ट फोन्स जन्मले आणि व्हॉटस अप, फेसबुकने परत एकदा सारे विखुरलेले मित्र मैत्रिणी पाच इंचाच्या मोबाईलमध्ये सामावून घेतले. रि-युनियन्स ठरल्या आणि त्या ट्रेकर मित्राची आठवण झाली. कुणीसं म्हणालं की दोन वर्षांपूर्वी हिमालयात ट्रेकसाठी गेला असताना अपघात होऊन तो गेला....... मोबाईलवरची अक्षरे धुसर झाली. एका क्षणांत त्या दिवशीचं माझं ‘संकल्पाख्यान’ आठवलं. माझी मस्करी आणि त्याचा संकल्प तडीस नेण्याचा ध्यास.......
दरवर्षी नियोजनपूर्वक संकल्प करुन ते प्रयत्नपूर्वक तडीस नेणारा आमचा मित्र, जोडीदाराला आयुष्यभराची साथ देण्याचा केलेला संकल्प मात्र नाही पुरा करु शकला.
त्या दिवशी एक संकल्प सोडला मात्र - नवे वर्ष सुरु होण्याची वाटही न पाहता... आत्त्ता या क्षणापासून आयुष्य स्वच्छंदीपणे उपभोगायचे. जे करावे वाटेल, शिकावे वाटेल ते कुणाची, कसलीही लाज , तमा न बाळगता भरभरुन करायचे, शिकायचे आणि हो, हा संकल्प सोडताच गेली कित्येक वर्षे ज्या 'हॅपनिंग' आयुष्याची मी वाट बघत होते, ते मिळालं मला, प्रत्येक दिवशी, दिवसातल्या प्रत्येक क्षणी अगदी पावलोपावली. त्यांची क्षणचित्रे लिहायलाही सुरुवात केलीच मनाच्या डायरीत, दिवस सरण्याची वाट न पाहता, प्रत्येक क्षणी आणि माझी डायरी बहरु लागलीये एकदम ‘सनसनाटी हॅपनिंग’ क्षणांच्या आठवणींनी.