हॉलिवुडानं आपल्याला दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी माझ्यामते दोनच! (दोनच का? तर लहानपणापासून दूरदर्शन खूप पाहिल्याने 'एक किंवा दोन बस्स!' हे घोषवाक्य मनात ठसलं आहे.) तर दुसरी गोष्ट म्हणजे अर्नोल्ड श्वार्झनेगर.. माहेरचा टर्मिनेटर, थांब कमांडो कुंकू लावते या महासुपरहिट कौटुंबिक अॅक्शनपटांचा महानायक! आणि पहिली म्हणजे ममीचे सिनेमे. 'द ममी' आणि '(तीच) ममी रिटर्न्स'.. अर्नोल्डविषयी बोलण्यासारखं खूप आहे. माझा पत्रमित्रसुद्धा अर्नोल्ड नावाचा स्पॅनिश मुलगा आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेम्यातल्या 'ला टोमाटिना'च्या नाचात माझ्या ताईनेसुद्धा भाग घेतला होता. तेव्हा तिने अर्नोल्डच्या आजोबांच्या टोमॅटोच्या स्टॉलवरून टोमॅटोची परडी आणि अर्नोल्डचा इमेल पत्ता घेतला होता. 'ताई, एकपन टोमेटो खराब निगाला काय, मेल टाका. आमी फुकट नवीन परडी देऊ.' असं अर्नोल्ड म्हटल्यामुळे तो मनाने चांगला मुलगा आहे, हे ताईला कळलं. मग आमच्या शाळेत पत्रमैत्री प्रोजेक्ट झाला तेव्हा तिने मला अर्नोल्डचा इमेल पत्ता देऊ केला. आम्हां दोघांचा आवडता नट अर्नोल्डच त्यामुळे आमची लगेच मैत्री झाली. तर ते असो. दोन्ही अर्नोल्डांविषयी पुन्हा केव्हातरी सांगेन. आत्ता आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय ते ममीवर..
इजिप्त माझा भयंकर आवडता देश! मी बोललेला पहिला शब्द म्हणजे 'पिरॅमिड' (आणि ताईचा 'तूतनखामेन') असं आजही माझी आज्जी तिच्या बोलण्यावर जो विश्वास ठेवू शकेल त्याला सांगते. (खरंतर मी बोललेला पहिला शब्द म्हणजे 'पेढा'(ताईचा 'लाडू').. 'तर.. तर.. नुसत्या खायच्या गोष्टी सुचतात या घरातल्या प्रत्येकाला. एकही मूल जरा काही वेगळं बोललं असेल बोलायला शिकल्यावर तर शपथ!' आजी घरात पाहुणे वगैरे नसताना बोलते ते हे वाक्य! तर ते असो.) आम्हांला इजिप्तची ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे आमचे आजोबा. त्यांच्याकडे एक इजिप्तवरचं पुस्तक होतं, शिवाय खूप वर्षांपूर्वी ते इंग्लंडला जात असताना त्यांचं विमान वाटेत कैरोला थांबलं होतं. या दोन गोष्टींच्या आधारे त्यांनी आम्हांला इजिप्त देशाबद्दल केवढीतरी माहिती सांगितली होती. आजोबांचा 'खेळताखेळता, चालताबोलता, मांजरीला हुसकून लावतालावता, मोत्याला दूधभाकरी घालताघालता ज्ञानप्रदान' या थिअरीवर खूप विश्वास. त्यामुळे कुठलाही धागा धरून त्यांचा इजिप्तबद्दलच्या माहितीचा धबधबा सुरू होत असे. एकदा त्यांनी आईला 'मेघा, आपल्या आंब्याला यंदा खूप कैरो आल्या आहेत.' असं म्हटलं होतं. तर एकदा आमची मांजरी दोन पाय पुढे ठेवून बसली असताना तिच्या डोक्याभोवती स्वतःच्या जुन्या चट्टेरीपट्टेरी पायजम्याचा तुकडा बांधून 'पोरींनो, हा पहा आपला घरगुती स्फिंक्स!' अशी उत्साहात आरोळी ठोकली होती. मात्र एकदा प्रकरण जरा जास्त गंभीर झालं. शेजारच्या बंट्याचे (पूर्वाश्रमीचे) पैलवान आजोबा दूधवाल्या रामशरण भैयाशी पैज लावून घराच्या पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर उडी ठोकताना जोरात खाली आदळले व त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना हॉस्पिटलात ठेवलं होतं. त्यांच्या डोक्यालाही थोडा मार बसल्याने बँडेज बांधलं होतं. त्यांना भेटायला हॉस्पिटलात गेल्यावर आमचे आजोबा अतिशय आनंदाने 'अजून थोऽऽऽडं बँडेज गुंडाळलं की ममी होणार तू लेका!' असं म्हटले. बंट्याच्या आजीने डोळ्यांना पदर लावला. बंट्याच्या आईने 'तिन्हीसांजेला कसलं अभद्र बोलता हो तुम्ही?' म्हणून आजोबांकडे रागाने पाहिलं. त्यादिवशी घरी आल्यावर आज्जीने आजोबांना सॉलिड दम भरला 'इजिप्तचं पुस्तक बंबात टाकेन' म्हणून! आमच्याकडे अजूनही पाणी तापवायचा बंब आहे. कारण पुन्हा आमचे आजोबाच! खूप वर्षांपूर्वी बाबांनी गीझर बसवायला एकाला बोलावलं होतं. नेमके तेव्हा फक्त आजोबाच घरी होते. त्याने म्हटलेल्या 'गीझर बसवायला आलोय' या वाक्यात आजोबांनी 'गिझा' ऐकलं आणि तो गिझाच्या पिरॅमिडाची प्रतिकृती घेऊन आलाय, असा काहीसा त्यांचा समज झाला. त्यांनी त्याला स्वहस्ते बनवलेला चहा ऑफर केला आणि गिझाच्या पिरॅमिडांबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. अडीच तासांनी 'मला अजून एका ठिकाणी जायचंय.. साहेब आले की पुन्ना येतो!' म्हणून त्याने जो पळ काढला तो आजतागायत त्याने तोंड दाखवलेलं नाही.
आजोबांचं हे असं इजिप्तवेड पाहता 'द ममी' प्रदर्शित झाला तेव्हा आजोबा 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ला गेले नसते तरच नवल! आजोबा आम्हां दोघींना घेऊन गेले होते. त्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मम्या पाहिल्या. नंतर आजोबांकडून आम्हांला मम्यांबद्दल तपशीलवार माहिती कळली. मम्यांचा शोध कसा लागला, ही कथाही मोठी रंजक आहे. आपल्याकडे राजा जनकाने शेतात उत्खनन करून जिवंत मुलगी बाहेर काढली, ही गोष्ट 'भारताचा इतिहास-भाग १' पुस्तकात वाचून इजिप्तवासीयसुद्धा पिरॅमिडांचं उत्खनन करायला गेले. तर आतून मम्या निघाल्या. पिरॅमिडात आडव्या पडलेल्या मम्या उभ्या केल्या की, समोर दिसेल त्या माणसाच्या मागे दोन्ही हात उभारून हल्ला करायला पळत सुटत. खरंतर त्यांना त्या आखडलेल्या अवस्थेतून बाहेर काढणार्या लोकांचे त्यांनी आभार मानणं सयुक्तिक होतं. आता या मम्या अशा का वागत, हे जाणून घ्यायला आपल्याला इतिहासात मागं मागं जायला हवं. (योग्य तो इफेक्ट येण्यासाठी आजोबा पुस्तकाची पानं उलटत मागे मागे गेले. भिंतीला डोकं आदळल्यावरच त्यांचा हा फ्लॅशबॅक थांबला.)
तर इजिप्तचे राजेलोक खूप श्रीमंत! मार्केट कधी पडेल/वधारेल, सोन्याचे भाव केव्हा कमी असतील, वगैरे बाबी अचूक ताडण्यात सगळे निष्णात! (एखादा निष्णात नसेलच तर तो पदरी अर्थतज्ज्ञ वगैरे मंडळी नेमत असे.) त्यामुळे प्रत्येक राजाकडे भरपूर सोनं, हिरेमाणकं वगैरे धन साठलेलं असे. जुना राजा गेल्यावर नवीन राजाची नियुक्ती झाली की, त्याचं सोनं ठेवायला तिजोरी, कपडे ठेवायला कपाटं अशी सगळी जागा मोकळी करून द्यावी लागे. म्हणून इजिप्शियन राजांमध्ये मेल्यावर सगळ्या वस्तू बरोबर घेऊन पिरॅमिडात राहायला जाण्याची पद्धत सुरू झाली. सुरुवातीला राजा अगदी मरायला टेकला की, पिरॅमिडाचं बांधकाम हाती घेतलं जाई. त्यामुळे पिरॅमिडात खूप त्रुटी राहत असत. एका फॅरोहाच्या पिरॅमिडातल्या मुख्य खोलीतला एसी बिघडला व त्यातून पाणी गळू लागलं. मुख्य दाराला टाळं ठोकून मजूरबिजूर निघून गेल्यानं ही गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही. तीन दिवसांनी त्याची ममी पोहत बाहेर आल्याची नोंद त्याकाळच्या दस्तऐवजांमध्ये आढळते. दुसर्या एका राजाबरोबर पिरॅमिडात जाणार्या लवाजम्यातले लोक बरोबर न मोजल्यानं त्याच्या पिरॅमिडाच्या मुख्य खोलीत मम्यांची दाटी झाली आणि दरवेळी तो जरा निजला की, त्याच्या कुठल्यातरी एका राणीची ममी 'अहो, जरा तिकडे सरका' म्हणत त्याला शांतपणा मिळू देईनाशी झाली. 'ममी होऊन पिरॅमिडात जाणं म्हणजे मृत्युपश्चात जीवन एंजॉय करणं' ही गोष्ट काही साध्य होईना. मग वाढीव एफएसआय घेऊन पिरॅमिडाचं पुनर्बांधकाम केलं गेलं. तोवर सगळ्या मम्या वाळवंटात तंबू ठोकून राहिल्या.
सुरुवातीला असे किस्से झाल्यावर मग पुढचे राजे शहाणे झाले. त्यांनी पिरॅमिडबांधणीत एक शिस्त आणली. पिरॅमिड स्पेशालिस्ट आर्किटेक्ट, इंटिरियर डेकोरेटर वगैरे मंडळी हाताशी घेऊन प्रत्येक पिरॅमिड हा एक शिस्तबद्ध प्रकल्प म्हणून राबवला जाऊ लागला. आतमधल्या प्रत्येक खोलीचं सुशोभिकरण राजा स्वतः लक्ष घालून करवून घेई. गिझा पिरॅमिड संकुलातल्या एका पिरॅमिडावर 'उजवीकडच्या तिसर्या खोलीला व्हॅनिशियन ब्लाइंड्स की रेशमी पडदे: राजाकडून नक्की करून घेणे' अशी नोंद कोरलेली आहे. यथावकाश पिरॅमिडाधिपती राजा मरायला टेकला की, त्याच्या वस्तू एकेक एकेक करून पिरॅमिडात नेमलेल्या ठिकाणी आणून ठेवायला सुरुवात होई.
तोवर एकीकडे बँडेज डिपार्टमेंट ममी मसाला बनवायला घेई. ममी मसाला हा फारच रंजक प्रकार बरं का! इजिप्तमध्ये पिरॅमिडांभोवती मोठं वाळवंट आणि अख्ख्या इजिप्तला पाणीपुरवठा करायला एकुलती एक नाईल नदी. ममीला किमान आंघोळीसाठी तरी पाणी लागणारच होतं. त्यासाठी सुरुवातीला एका राजानं पिरॅमिडापर्यंत पाईपलाईन टाकून नाईलचं पाणी पिरॅमिडात खेळवण्याची योजना मांडताच इजिप्तातल्या लोकांनी चांगलाच विरोध केला. राजाला प्रजाजनांपुढे माघार घ्यावी लागली. मग आंघोळीचा प्रश्न सोडवायला इजिप्ती राजवैद्यांनी जुने ग्रंथ अभ्यासून ममी मसाल्याचा फॉर्म्युला तयार केला. हा मसाला लावून वर बँडेज गुंडाळल्यास आंघोळीची आवश्यकता नसे. रोजच्या रोज आंघोळीची कटकट वाचली, म्हणून राजांनी हा मसाला भलताच उचलून धरला. (तरी सुरुवातीला काही राण्यांच्या मम्या सवयीने 'अहो, किती वेळ घालवणार नुसतं लोळत पडून? आंघोळ करून घ्या एकदाची. मेलं दहा मिन्टांत आंघोळ उरकायची, त्याला सेवकाने पंधरावेळा पाणी गरम केलंय..' ही वाक्यं म्हणायच्याच! तेव्हा राजाची ममी विजयी मुद्रेनं त्यांना मसाल्याचा डबा दाखवून, बसल्या जागेवरून जरासुद्धा न हलता रिमोटनं टीव्हीचा चॅनल बदलत असे.) तर असा हा बहुगुणी, सुगंधी, टिकाऊ ममी मसाला बनवायला कडक नियम होते. सगळे घटक अचूक पारखलेले लागत. त्यामुळे पिरॅमिडात वस्तू हलवायला सुरुवात झाली रे झाली की, इकडे मसाला बनवायला प्रारंभ होत असे. एकीकडे बँडेजांचे रोलच्या रोल मागवले जात. राजवाड्याच्या गच्चीवर इजिप्तच्या कडक उन्हात मसाल्याचे घटक वाळत पडत. राजवाडाभर मसाल्याचा वास भरून राही. जेवणाला, कपड्यांना, बागेतल्या फुलांना, कुपीतल्या अत्तरांना तोच एक वास येत असे. मसाला सिनेमातल्या 'तुमच्या आमच्या जगण्याला मस्साल्याचा टच' या गाण्याच्या ओळीचा खरा अर्थ तेव्हा समस्त राजवाडावासीयांना उमगत असे. या गाण्याच्या सुरुवातीला 'तोळाभर तीखा तीखा...' असे शब्द आहेत. त्याच्याशी निगडित एक गोष्टही या ममी मसाल्याच्या इतिहासात आहे. इजिप्तात पूर्वी रुग्णाची नाडी पाहून 'आय'म व्हेरी सॉरी मिसेस अनक-सू-नमून.. तूतनजी (द ग्रेट गोल्डमॅन तूतनखामेन!) अब हमारे बीच नही रहे' अशी वाक्यं म्हणून तोंडावर पांढरी चादर सरकवणारे डॉक्टर नव्हते. त्यामुळे रुग्णाला पिरॅमिडात नक्की न्यायचं की नाही, हे ठरवायला ममी मसाल्यात तोळाभर तिखट घालत असत. अशा मसाल्याचा एक हात दिला की (रंगाचा एक हात देतात तसं), जिवंत असलेला रुग्ण ताडकन उठूनच उभा राही. अन्यथा त्याला पिरॅमिडात नेलं जाई.
मसाला झाला की, बँडेजवाल्यांची पाळी! आता यांची जरा गंमत होती. इजिप्तमधलं वैद्यकशास्त्र जरा मागासलेलंच होतं. काहीही झालं की, बँडेजचा रोल घेऊन रुग्णाला त्यात गुंडाळत सुटायचं, एवढीच उपचारपद्धत त्यांना ठाऊक होती. केळीच्या सालावरून घसरलो आणि गुडघ्याला मुकामार लागला, असं सांगत रुग्ण आला की, त्याला पूर्णपणे गुंडाळून ठेवत. बरा झाला तर बँडेज उघडून देत. नाहीतर काही काळाने त्याची रवानगी पिरॅमिडात होई. रुग्णाचीही त्याबद्दल तक्रार नसे. आज ना उद्या आपल्याला पिरॅमिडात जायचंच आहे, हे त्याला पक्कं ठाऊक असायचं. तर असो. रुग्ण समजूतदार असल्याने बँडेज डिपार्टमेंटचं अल्पज्ञान चालून जात होतं. राजाच्या ममीचं काम निघालं की त्यांच्या पाट्या टाकण्याला ऊत येई. एकेका राजाला तीनचार बँडेज रोल गुंडाळून टाकत. एकदा तर रात्री गप्पाटप्पा करत, तंबाखूचे तोबरे भरून गुंडाळकाम करताना त्यांनी नुसतेच रोलावर रोल गुंडाळले. राजाची ममी बाजूलाच थंडीनं कुडकुडत पडली होती. शेवटी थंडीनं ममीचे दात वाजायला लागल्यावर त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. पुढे शाही खजिनदाराकडे बँडेजची भरमसाठ बिलं जाऊ लागल्यावर त्यांची रीतसर चौकशी झाली (म्हणूनच कुठल्याही विषयात 'कुठं थांबायचं?' हे कळणं महत्त्वाचं!) आणि ढ कारागिरांना हटवून इतरांसाठी नीट प्रशिक्षण आयोजित केलं गेलं. मग त्यांनी भारतातून चरक संहिता, सुश्रुताची पुस्तकं यांची लेटेस्ट लो प्राईस एडिशन मागवली व त्यावरून अभ्यास करून रुग्ण बरे केले.
मात्र हे बरं व्हायचं भाग्य जुन्या मम्यांच्या नशिबी नव्हतं. त्यांना डोक्यापासून पायापर्यंत गुंडाळल्यावर पिरॅमिडात आडवं केलं जाई. आखडल्या अंगानं त्या शतकानुशतकं पिरॅमिडात पडून राहायच्या. आता 'ममी रिटर्न्स' सिनेमात इम्होटेपच्या ममीला उकरून काढायला सुंदर दिसणारी अनक-सू-नमून येते आणि त्याला प्रेमानं मंत्र म्हणून जिवंत करते. आता ही गोष्ट माहीत असलेल्या प्रत्येक ममीला अशीच सुंदर बाई आपली सुटका करेल अशी आशा लागून राही. शतकाशतकांनी माणसांची चाहूल लागली की, ममी उत्सुकतेनं वाट पाहत राही. पण सुंदर बाईऐवजी दोन काळेकभिन्न मजूर खांद्यावर कुदळफावडं घेऊन 'रामा, राजा कसला आखडू दिसतांव बग.. पिरामिडात पडून राहिलांव येकटाच तरीपन जल्लां अजून इगो गेला नाय..' (आमचं मालवणी/आगरी/कोकणी बिगरी पातळीचंच! वांयच अॅडजष्ट करून घेवा..) अशा पिंका(तंबाखूच्याच!) टाकताना ऐकू आले की, ममीचं पित्त खवळे. (पित्त खवळलेलंच असे. अंग घट्ट बांधल्याने नीट जेवण नाही, जेवणाला वेळकाळ नाही, जठरातल्या पाचकरसांचं कार्य बिघडून गेलेलं. पुन्हा सूतशेखर, सुवर्णसूतशेखर आणि इतर आयुर्वेदिक उपाय सगळे भारतात. पित्ताला उतार पडणार कसा?) याच कारणापायी, मोकळी झालेली ममी केवळ दिसेल त्याच्यावर हल्लाच करायची, यात तिचा काय दोष?
... आजोबांचा फ्लॅशबॅक सांगून संपला. मग आजोबा पुढे पुढे येत वर्तमानात परत आले. मम्यांबद्दल इतकी रंजक माहिती कळल्यानं आम्ही 'ममी रिटर्न्स' पाहायला अधिकच उत्सुक होतो. तो प्रदर्शित होणार होता तेव्हा आजोबांनी 'फर्स्ट डे फर्स्ट शो'चं अॅडव्हान्स बुकिंग करून ठेवलं. आमचा एकंदरीत उत्साह पाहून आई आणि आजी मात्र आमची चेष्टा करत होत्या. आजोबा आजीला उत्साहानं 'अगं, ममी रिटर्न्समध्ये माहितीये का, इम्होटेपचीच ममी परतलीये..' असं सांगायला गेले तेव्हा तिने 'अगंबाई, परतलीये? आधी तो कायसा ममी मसाला घातला होता, आता परतलीये म्हटल्यावर चांगली खमंग झाली असेल.. खी खी खी..' असा वाईट विनोद करून भरपूर हसून घेतलं. आदल्या दिवाळीला आम्ही तिघं तिच्या 'अगंबाई मेघा, या बॅचच्या चकल्या हसतायत गं..' या वाक्याला ख्याख्याख्या करून हसलो होतो. वर आजोबांनी 'अरे वा, मग दात दिसले का चकल्यांचे? हसतील त्याचे दात दिसतील, म्हटलंच आहे..' असा अतिशयच वाईट विनोद केला होता. संधी मिळताच उट्टं काढणार नाही ती आमची आजी कसली? (तरी ताई माझ्या कानात 'या बॅचच्या हसतायत तर स्कॉलर बॅचच्या तळायला घे म्हणावं आजीला..' असं कुजबुजली ते आजीनं ऐकलं नव्हतं, नाहीतर पाच किलोच्या चकल्या पाडायला ताईलाच बसवलं असतं आजीने!) त्यामुळे मी, ताई आणि आजोबा मग शांतच राहिलो.
सिनेमाच्या दिवशी थिएटरवर गर्दीच गर्दी होती. त्या गर्दीत आम्हांला ममीसारखं काहीतरी दिसलं म्हणून जवळ जाऊन पाहिलं, तर ते बंट्याचे आजोबा निघाले. सोबत रामशरणभैया! 'आज ममी रिटर्न्स पाहायचाच म्हणून सकाळीच आमच्या डॉक्टरांकडे जाऊन फ्रेश बँडेज गुंडाळून आलो. तसा बरा केव्हाच झालोय.. पण सिनेमाला शोभेशी वेषभूषा पाहिजेच बॉ! रामशरणलाही सकाळीच विचारलं. म्हटलं, बघू तरी तू ममी, इजिप्त वगैरे सांगतोस ते काय प्रकरण आहे ते!' ते उत्साहानं म्हटले. रामशरणभैयाला आपल्याशी लावलेल्या पैजेमुळे बंट्याचे आजोबा जायबंदी झाले याचं अजूनही थोडं वाईट वाटत होतं. त्यामुळे कर्तव्यबुद्धीनं तो त्यांना सोबत म्हणून आला होता. बंट्याच्या आजोबांनी 'द ममी' खरंतर पाहिला नव्हता, त्यामुळे ते पोस्टर पाहून आजोबांना प्रश्नच प्रश्न विचारत होते. इम्होटेपला पाहून 'हा टकल्या कोण?' असं विचारलं. 'तोच ममी' म्हटल्यावर 'त्याची बँडेजं कुठेयत?' असं विचारलं. पुढे 'इम्होटेप कोणाची ममी असतो?' असंही विचारलं. आमचे आजोबा त्या प्रश्नांमुळे अगदी अस्वस्थ झाले. मग मजाच झाली. बंट्याचे आजोबा सारखे बडबड करत होते, त्यामुळे सिनेमाला आलेल्या इतर लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. सिनेमा सुरू व्हायला काहीसा अवकाश होता, तोवर मग काही लोकांनी बंट्याच्या आजोबांबरोबर फोटो काढून घेतले. काही लोकांनी त्यांना हात उभारून, आपल्यामागे हल्ला करण्याच्या आवेशात पळायला लावून त्याचे व्हिडिओ घेतले. ते थकून मॅक्डीच्या रॉनल्डशेजारी बसल्यावर काहींनी त्यांच्यामध्ये आणि रॉनल्डमध्ये बसून, हाताने 'व्ही'ची खूण करून फोटो घेतले. बंट्याच्या आजोबांना बँडेजं कशी मिळाली, याची राम(शरण)कहाणी ऐकल्यावर एका वार्ताहरानं त्यांना सिनेमाच्या पोस्टरसमोर उभं करून त्यांचा बाईट घेतला. थोडक्यात काय, बंट्याचे आजोबा थिएटरमध्ये जगप्रसिद्ध झाले.
इकडे आमचे आजोबा मात्र काहीसे उदास झाले. 'कसं असतं बघा मुलींनो! हा बंट्याचा आजोबा.. इजिप्त, ममी, वगैरेंबद्दल काडीची माहिती नाही याला. मी माहिती द्यायला जायचो तर पाच मिन्टांत घोरायला लागायचा हा ऐकताऐकता. आता पहा, ममीसारखी वेषभूषा करून कशी प्रसिद्धी मिळवतोय तो! आजकालचं जग नुसत्या बाह्यरुपाला भुलतं हेच खरं..' असं गंभीरपणे म्हणून ते निमूटपणे पॉपकॉर्नच्या रांगेत उभे राहायला जाणार, तेवढ्यात बंट्याचे आजोबा पाच फुकट मॅक्डी व्हेज बर्गर, पाच स्प्राईटचे मग आणि दोन मोठे पॉपकॉर्न घेऊन आमच्यापाशी आले. आजोबांचा चेहरा अजूनच पडला. सुदैवानं लगेचच आम्ही आत शिरलो आणि सिनेमा सुरू झाला.
... सुंदर दिसणार्या अनक-सू-नमूननं एका विशिष्ट जागी खोदून इम्होटेपची ममी बाहेर काढली. मला आणि ताईला तेव्हा एकच शंका आली.
'आजोबा, गेल्यावेळी ममीमध्ये ममीपासून माणूस झालेला इम्होटेप त्या कुठल्याशा नदीत बुडून मरतो की नाही? मग पुन्हा त्याची ममी कशी सापडेल?'
'अरे बिटिया, इतने बडे आदमीके एकही ममी होगी क्या? तीनचार इस्पेअर ममीज ('ज' जगातला) तो रखे होंगे बनाईके उके लिये.. हमरा जब गैरेज था तब हम हर इस्कूटरके लिये पचास-पचास इस्पेअर पार्ट रखते थे..' - रामशरणभैया. त्याचं उत्तर ऐकून आजोबा जाम खूश झाले. 'बघितलंत पोरींनो, मी तुम्हांला इजिप्ताबद्दल सांगायचो तेव्हा यानं केलेली श्रवणभक्ती काही वाया गेली नाही. कसं पटकन अगदी योग्य उत्तर सुचलं बघा त्याला!' आम्हां दोघींचं खरंतर शंकासमाधान पूर्णपणे झालं नव्हतं आणि रामशरणभैया आमच्याकडे येताना कानांत कापसाच्या बोळ्याएवढे असणारे वॉकमनचे स्पीकर लावून यायचा. (त्याकाळात दैनंदिन कामं करताना वॉकमन ऐकायची खूप क्रेझ होती. शिवाय गोपालन केंद्रातल्या व्याख्यानात रामशरणभैयानं 'गोठ्यात गाणी ऐकली की, गायीम्हशी दुप्पट दूध देतात' हे वाक्य ऐकलं होतं. तो नित्यनेमानं दिवसभर गोठ्यातच काय, इतरत्रही गाणी ऐकत असे.) पण सिनेमा सुरू होण्याआधी आजोबा खूप उदास झालेले असल्यानं आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. चुपचाप पुढचा सिनेमा पाहू लागलो. हा सुरुवातीचा ममीचा मुद्दा सोडला तर बाकी सिनेमा झकास होता. स्कॉर्पियन किंग, अहम शहरातल्या पिग्मी मम्या, अनुबिसची सेना असे बरेच नवीन प्रकार त्यात होते. एक बंट्याचे आजोबा सोडता आम्ही सगळे रंगून जाऊन सिनेमा पाहत होतो. बंट्याचे आजोबा मात्र त्यांच्यावाटचा बर्गर संपवून पॉपकॉर्न तोंडात टाकत बसले होते.
सिनेमा संपला. बाहेर पडताना पुन्हा बंट्याच्या आजोबांनी एक फोटोसेशन उरकून घेतलं. त्यांनी काही लोकांना 'इम्होटेप' अशा नावानं सह्यासुद्धा दिल्या. हे पाहून आजोबांनी तिथल्यातिथं 'ह्या माणसासोबत मी काही ममी-३ बघणार नाही..' अशी भीष्मप्रतिज्ञा केली. त्यादिवशी घरी आल्यावर त्यांना आजीनं केलेल्या खमंग अळूवड्यासुद्धा नीट गेल्या नाहीत. 'का हो खात नाही आहात? ममी मसाला लावूनच पानं गुंडाळलीयेत..' या आजीच्या वाक्यावर त्यांनी अगदी दु:खी नजरेनं आजीकडे पाहिलं, त्यामुळे एकूणच घटनेचं गांभीर्य जाणून चक्क आजीसुद्धा शांत राहिली. त्यानंतर इजिप्तबद्दल बोलायचा त्यांचा उत्साहच जरा कमी झाल्यासारखा झाला.
... अशीच काही वर्षं गेली. ममी-३ प्रदर्शित होणार, अशी कुणकुण लागताच आजोबा एकदम आनंदले. उत्साहानं ममी-३ बघायच्या तयारीला लागले. आम्हांला पुन्हा नव्या जोमाने इजिप्तची माहिती देऊ लागले. आमच्या मांजरीचा स्फिंक्स बनवून त्यांनी ऑर्कुट, फेसबुक वगैरेवर तिचे फोटोही टाकले. त्याला ढिगानं लाईक्स आणि शेअर आल्यावर बंट्याच्या आजोबांना हरवल्यासारखा त्यांना आनंद झाला. अशी सिनेमा पाहण्याची तयारी जोरात सुरू असताना त्यांना कुठूनसं कळलं की, ममी-३मध्ये चिनी ममी आहे, इजिप्तातली नाही. हा म्हणजे त्यांना धक्काच होता. 'ड्रॅगन एम्पररची ममी???? चिनी ममी?' विश्वासच बसत नसल्यासारखं ते नाव त्यांनी पुन्हा पुन्हा उच्चारून पाहिलं. 'आता चायनामेड ममीसुद्धा? हे चिनी लोक कुठकुठलं मार्केट काबीज करतील, काही सांगता येत नाही...' त्यांनी दु:खी आवाजात म्हटलं. कितीतरी वेळ ते हॉलमधल्या खुर्चीत तसेच सुन्न बसून होते. एकूण प्रकरण गंभीर आहे हे कळताच आजी उठली, तिनं आजोबांचं इजिप्ताबद्दलचं पुस्तक कपाटातून काढून त्यांच्या हातात कोंबलं आणि मृदू आवाजात म्हणाली, 'आज ममी मसाला घालून सुरमईचं कालवण करू?'