ती येते...
मी लाख विनवुनी पाही.
ती मला जुमानत नाही.
कोंडता उफाळुन येते.
ये म्हणता दडून राही.
कधी पारंपरीक साज
अन् वाणी ठसकेबाज.
कधी अलंकार त्यागुनी,
पांघरून घेई लाज.
कधी गालावरचा तीळ,
कधी देवावरची भक्ती.
कधी निसर्ग हो रमणीय,
कधी प्रेमामधली शक्ती.
कधी खळाळ होइ झर्याचा,
कधी लाटांवरती नाचे.
कधी सुसाट बोलत राही,
कधी शब्द होति सोन्याचे.
कधी नियम पाळुनी सारे,
आदर्श बालिका होते.
कधी वरुनि मुक्तछंदाला,
बंधने झुगारुन देते.
कधी दिवस मावळुन जातो,
रात्रहि तशीच सरते.
मी थकुन सोडते नाद,
अन् तेंव्हा ती अवतरते.