साहित्य:
१. जरा लहान आकाराचे almost पिकलेले आंबे (कडक हवेत, सुरकुत्या नको) - १० - १२ (मला हापूस आवडतात, पण जरा आंबटगोड आवडणारे रायवळ किंवा गावठी आंबेसुद्धा वापरू शकता)
२. गूळ - साधारण पाव किलो
३. तेल - वाटीभर
४. लाल मोहरी पावडर करून - वाटीभर
५. मेथी पावडर - दोन किंवा तीन टेस्पू
६. हिंग - दोन टेस्पू
७. मीठ - दोन टेस्पू किंवा आवडीनुसार
८. हळद - दोन टिस्पू
९. लाल तिखट - चार/पाच टेस्पू
१०. पाणी - एक लिटर
कृती:
१. आंबे नीट धुवून मग गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून १० ते १५ मिनिटे उकडा. (कुकर वापरू नका, आत स्फोट होतील) :P उकडलेले आंबे एका सुती साडीवर गार आणि कोरडे करत ठेवा.
२. एका पातेल्यात गूळ घेऊन गॅसवर ठेवा. त्यात पाणी घालून पाक करा. घट्ट न होऊ देता गॅस बंद करून निवत ठेवा. निवल्यावर त्यात मोहरी पावडर, मेथी पावडर, तिखट आणि मीठ घालून नीट ढवळा.
३. दुसऱ्या एका लहान कढईत तेल घालून थोडी अख्खी मोहरी, हिंग, हळद, थोडं तिखट घालून फोडणी करून हिंग फुलल्यावर गॅस बंद करा. फोडणी निवू द्या.
४. निवलेली फोडणी गुळाच्या पाकात ओतून जोरदार ढवळा. दोन मिनिटे लाकडी रवीने घुसळले तरी चालेल.
५. काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत सगळे आंबे (अक्खा, साल न काढता) हळूहळू ठेवा आणि वरून पाकाचे मिश्रण ओता. नीट घट्ट झाकण लावून, हवा/पाणी/ऊन लागणार नाही अश्या ठिकाणी ठेवा. एप्रिल-मेमध्ये घातलेला उकडांबा जुलै-ऑगस्टपर्यंत मस्त मुरेल तेव्हा थोडाथोडा खायला काढा.
खाताना नखाने डेख काढून जरासा पिळून टाका म्हणजे खाताना चीक लागणार नाही. बाहेर कोकणातला रपारप पाऊस कोसळत असताना गरमागरम वाफाळत्या भातावर धम्मक केशरी रसाळ आंबा सालासकट कुस्करून स्वाहा करा!
(यावर्षीचा उकडांबा तयार झाल्यावर फोटो येतील )
याची अजून एक पद्धत आहे :
गूळ सोडून वरील सर्व साहित्य घ्या.
या प्रकारात तेल जरा जास्त लागेल, दोन वाट्या घ्या. तिखट, मीठ आणि हळद सुद्धा प्रत्येकी अर्धी वाटी.
कृती:
१. मेथी पावडर, तिखट, हळद, हिंग हे वेगवेळ्या वाडग्यात ठेवा. तेल तापवून गरम तेल प्रत्येक वाडग्यात घालून चमच्याने नीट कालवा. निवत ठेवा.
२. मोहोरी पावडरमध्ये एक लिटर पाणी घालून रवीने खूप नाकात ठसका जाईपर्यंत फेसा. त्यात बाकी मसाले आणि मीठ घालून परत घुसळा.
३. आता बरणीत आंबे ठेऊन वरून हे फेसलेलं मिश्रण हळूहळू ओता.
बाकी घट्ट झाकण वगैरे सूचना वरच्यासारख्याच :)