२८/१/२०१८
नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला? विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का ? माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं ! दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला. निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक पण 'पण' असतात.
अचानक ध्यानीमनी नसताना ठरलेली ही ट्रीप!
त्याचं असं झालं पिंपळदला असल्याने माझ्याशी संपर्क न झाल्यामुळे शोभा/वंदना (बहीण) व तिच्या यजमानांनी एका प्रवासी कंपनी बरोबर जायचं ठरवलं 'रण आॅफ कच्छ' ! हो, तेच ते ! ज्याची जाहिरात अमिताभ बच्चन करतो ना तेच. माझी जी मोठ्ठी बकेट लिस्ट आहे ना त्यात हिमालया नंतर दुसर्या क्रमांकावर असलेलं हे स्थान! हं तर त्या प्रवासी कंपनीवाल्याकडे दोन जागा शिल्लक असल्याचा निरोप आला तिला. मी ही नागपूरला परतले होते. तिने आम्हाला विचारलं पण इतक्या वेळेवर रेल्वेचं आरक्षण मिळण्याची शक्यता कमीच वाटत होती म्हणून आधी फ्लाईटची तिकीट बघितली पण ती काहीच्या काही महाग! टूर तीस तारखेला अहमदाबादहून सुरू होणारे पण एकोणतीसच्या कुठल्याही गाडीचं आरक्षण शिल्लक नव्हतं. फक्त सत्तावीसच्या संत्रागाच्छी राजकोट स्पेशल ट्रेनमध्ये मात्र अडीचशे तिकीटं शिल्लक होती. पण परतीची स्लीपर क्लासची मिळत होती . ती आधी तर काढलीच व त्याचसोबत एसीची पण काढून ठेवली. अश्याप्रकारे रेल्वेला आम्ही नियमीत देणगी देत असतो :) दोन दिवस नंतर न राहता आधी राहू निताकडे (चुलत बहीण)असा विचार करून सत्तावीसची तिकीटं नंतर काढली अन् दोन दिवसांनी गाडीत बसलोही :)
नीताचं घर मणीनगर स्टेशनपासून जवळ, पण तिथे गाडी थांबत नाही पण काही कारणाने. म्हणजे सिग्नल वैगेरे नाही मिळाला आणि थांबली तर आम्ही उतरण्याच्या तयारीने दाराशी आलो. गाडी हळू झाली पण थांबली नाही. थोडं पुढे जाऊन थांबली अन् पब्लिक उतरू लागलेलं पाहून आम्ही पण उतरलो... थ्रील ! एडवेंचर ! रिक्शा करुन घरी पोचलो.
काकूने गरमागरम मेथीचे गोटे म्हणजेच भजी नाश्त्याला केली ती इतकी तोंपासू होती की फोटो काढायला विसरले. रात्र थोडी सोंग फार व पोट लहान! मनसोक्त गप्पा मारून आधीच ठरवलेल्या प्रोग्रामप्रमाणे इथलं स्पेशल काठियावाडी जेवायला गेलो. पंजाबी मेन्युला काट मारून स्थानिक जेवण मागवलं. उंधियो, भरीत, तुरिया पात्रानु शाक, खिचडी -कढी ! एकूण गुजराती गोडबोले, दिलदार व आतथ्यशील. ताकाचा मसाला आवडल्याचे सांगतात शंभरग्रॅम मसाल्याची पुडी हातात दिली. काॅलेज बाॅय माधव आम्हा बायकांमध्ये मस्त एन्जाॅय करत होता, कौतुक वाटलं.
घरी आल्यावर आराम व गप्पांत रात्र केव्हा झाली कळलेच नाही. जेवायचा प्रश्नच नव्हता . एकादशी दुप्पट खाशी! दुसर्या दिवशी एकादशी तर करत नाही पण दुप्पट खादाडी (रात्रीची व सकाळची)मात्र केली आदल्या दिवशी!
नीता सख्खी चुलत बहीण! बर्याच वर्षांनी नीताला प्रत्यक्षात भेटत होते. किती बोलू न बोलू झालं. ती एकेक तिची फाईट सांगत होती अन् मी तिच्याकडे थक्क होऊन पहात राहिले. कॅन्सर सर्व्हायवर नीता म्हणजे मूर्तिमंत सकारात्मकता! पंधरा वर्षांपूर्वी केमो, रेडीएशन करून दहा वर्षे व्यवस्थित गेली. नुसती व्यवस्थितच नाही तर एक उद्योगिनी उदयाला येत होती. सोयाबीनचे प्रोटीन रिच विविध टीकाऊ पदार्थ, सोया पफ्स, प्रोटीन पावडर, चटपटीत पूड चटणी असे करून विकायची. कामाला पाचसहा जण होते. भारतभर खादी ग्रामोद्योग प्रदर्शनात तिचा स्टाॅल असायचा.
त्यानंतर रिलॅप्स झाले. परत पाच केमो नीट पार पडले नंतर सहन झाले नाही त्यामुळे रेडीएशन घेतलेच नाही. दुर्दैव हात धुवून पाठीमागे लागले... पंधरा वर्षापासून चालू असलेला उद्योग तेव्हाच घाट्यात आला अन् व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसायात सुभाषची साथ होती व सासुबाईंचा पाठिंबा. सुभाषकडच्या सात पिढ्या गुजरातच्या मातीत व पाण्यावर वाढलेल्या ! हार मानली नाही. विम्याचं काम सुरू केलं. घसरलेली गाडी जरा रूळावर आली. अॅलोपथीच्या औषधांचा परिणाम ह्रदयावर झाला. एका नामांकित आयुर्वेदिक डाॅक्टरकडे खोपोलीत ट्रीटमेंट घेतली त्याने बराच आराम पडला. घरबसल्या म्युच्युअल फंडाचे काम करते. दोन तरूण काॅलेजमध्ये शिकणारी मुले. सुभाष अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी गेलेत. दोन म्हातार्या सासू व आई, दोन तरुण मुले असे आज आनंदाने एकमेकांना सांभाळत राहताहेत.
क्रमश: