लोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुपचाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल. तर सांगायचा मुद्दा हा की हा बाणेदारपणा हरवत चालला आहे.
आज आपल्याला व्हॉट्सॅपवर कितीतरी प्रकारचे मेसेजेस येत असतात आणि त्यावर मला "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" असे निक्षून सांगावेसे वाटते पण धीर होत नाही कारण सामजिक हितसंबंध! लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण.. सहन करतो न खाल्लेल्या शेंगांची टरफले.. हे विधात्या! तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्याला आम्ही मेसेज करतो ते आम्हाला रिप्लाय करत नाही आणि दुसर्या बाजूला जे आम्हाला मेसेज करतात त्यांना आम्हाला रिप्लाय करवत नाही.. मग हे करुणाकरा... भरकटलेल्या व्हॉटसॅपचे मेसेजेस घेऊन आम्ही कुणाच्या इनबॉक्स्मधे डोके आदळायचे? कुणाच्या.. कुणाच्या कुणाच्या!!
पुरेसा मेलोड्रामा झालेला आहे असे समजून आता मंडळ पुढील चौकात सरकत आहे. भाविकांना नम्र विनंती की त्यांनी शांतता व संयम राखावा. रांगेचा फायदा सर्वांना. ३२ लोकांनी बसावे व १८ लोकांनी उभे रहावे. तर असे शेंगा टरफलवाले मेसेजेस कोणते ते पाहू.
१. कुणीतरी ट्रीपला किंवा घरगुती कार्यक्रमाला गेलेले असते. तिथले किमान ७ तरी फोटो अशा गृपवर टाकतात जिथला एकही माणूस तिथे हजर नसतो. हेच लोक जितक्या गृपवर तुमच्यासोबत असतात त्या सगळ्या गृपमधे हे फोटो आदळतात. - मी ट्रीप/ कार्यक्रमाला आले नाही, मी एवढे फोटो डाऊनलोड करुन वा वा छान लिहीणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).
२. अचानक आलेले ज्ञान! मेसेजेस - यात आरोग्यापासून ते खगोलशास्त्रापर्यंत सगळे शोध कसे आपल्या पुराणांत, वेदांमधे आधीच लागून गेलेले आहेत आणि नासा, अमेरीका कसे लेट करंट आहेत प्रकारचे #थोरभारतीय संस्कृती मेसेजेस. - यांना 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' म्हणायची जाम खुमखुमी येते पण ही म्हातारपणापर्यंत थोपवून धरली आहे कारण तेव्हा जगण्यात 'राम' हवा!
३. फळे आणि भाज्यांचे उपयोग - हे आम्हाला शिक्षण मंडळाने शिकवायचा खूप प्रयत्न केला. तरी डब्यात पडवळ, नवलकोल, सुरण इ भाज्यांना प्रवेश नव्हता आणि आता आमच्या मुलांच्याही डब्यात नसतो. शिवाय रामानंद सागरांनीही आम्हाला (निक्षूनच!) सांगितले आहे की 'होनी को कोई नही टाल सकता'- मग भले आम्ही व्हिटॅमिन डेफिशियन्सीत जगू (एवढंच ना!) पण शेवग्याच्या सालांची चटणी खाणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).
४. राजकीय मेसेजेस - याबददल आपण सोडून सर्वांना सर्वच माहीत असते. त्यामुळे शेंगा आणि टरफलांचा उपयोग नाही. इथे टिळकच पाहिजेत. (पण तेवढं ते बोल्डमधे लिहायचं कमी कराल का? राजकीय घडमोडींबद्दल तुम्ही एवढं भरभरुन लिहीताय यातच काय ते बोल्ड आलं असं मानू.)
५. आज काय स्पेशल फोटो - रोज घरी बनवल्या जाणार्या पदार्थांचे फोटो. हल्ली यात आजूबाजूला पसारा चालत नाही म्हणे. म्हणजे तीही काळजी घेणं आलं. पण यात अगदी शेंगा आणि टरफल पोटेन्शियल आहे! म्हणजे घटक पदार्थ म्हणूनही आणि आपल्याला ज्याची चवही मिळणार नाही ते पाहून रोज ते जीभ बाहेर आलेले स्मायली का बरं टाकायचे म्हणूनही!
6. कोडी सोडवा - हे मेसेजेस म्हणजे वावटळीला निमंत्रण. एकदम 53 मेसेजेस कशामुळे बघायला जावं तर जनता जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखं कोडी सोडवत असते. चित्रं डीकोड करून उत्तर शोधण्याचा हा खेळ आपल्या पूर्वजांनी पूर्वीच खेळून ठेवला आहे.यावर मला स्वतःलाच मुद्दा क्र. 2 टाईप मेसेज लिहायची खुमखुमी येते पण पुन्हा खुमखुमी - म्हातारपण - राम आहेच. (हे चित्रलिपीत द्यायला पाहिजे डिकोड करायला.)
याव्यतिरिक्त रोजचे सुप्रभात, शुभरात्री मेसेजेस नात्यांचे महत्व मेसेजेस किंवा मुलगी आणि वडीलांमधलं प्रेम सांगणार्या कविता, घरकाम श्रेष्ठ्काम कविता, प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ, इस्कॉन, साईबाबा, कोल्हापूर आणि हजारो देवळांमधली आजची पूजा फोटो अशा विविधतेने नटलेल्या व्हॉटसॅपचा मला मुळीच अभिमान नाही. या परंपरेची पाई'प' होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी मुळीच प्रयत्न करणार नाही. मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा मान ठेवीन पण प्रत्येकाशी सौजन्याने वागणे अवघड आहे. माझा देश आणि देशबांधव यांचे कल्याण तर होतच आहे समृद्धीही होत राहो कारण त्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शेंगा. जय टरफले.