राधे... - १. सृजन

राधा, या राधेने  मला नेहमीच  भुरळ घातली आहे. नक्की कोण ही राधा? 
तसं म्हणावं तर कृष्ण महाभारतातून उतरला. पण असे म्हणतात की महाभारतात राधेचा उल्लेखच नाही.
राधा, आठवते ती मथुरेतली, यमुनातीरी कृष्णाची वाट बघणारी, रास खेळणारी, सासूचा मार खाणारी, अनयची बायको म्हणून वावरणारी, यशोदेशी छान मैत्री असलेली.
राधा,  कधी कृष्णाच्या बरोबरीची, कधी कृष्णा पेक्षा कितीतरी मोठी असणारी,...
राधा, यमुने सारखी निळी सावली, कधी गोरीपान, कधी गडद-गुढ -खोल डोळ्यांची, कधी बासरीत स्वत:ला हरवलेली, कधी यमुनेच्या पाण्यात पाय सोडून माधवाची वाट पाहणारी, कधी कृष्ण आणि त्याच्या  गोपांवर रागावलेली, ....
राधा, किती रूपं, किती गोष्टी, किती कथा, किती रुपकं,...
आणि तरीही  ओंजळीतून पाणी खाली झिरपून जावं तशी निसटून गेलेली...
असाच तिचा विचार करताने मनात एक तरंग उठला,...
राधा खरी नसेलच तर? राधा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कृष्णाची विवेकनिष्ठा असेल तर? त्याचा  सारासार विचार, त्याची सहृदयता,  त्याचे निर्मळ मन म्हणजे तर राधा नव्हे ?
राधा कृष्णाची सारासार विवेकबुद्धी ; राधा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कृष्णाचे अंतर्मनच. भले- बुरे, नैतिकता- अनैतिकता, राजकारण- माणुसकी, ... या सा-यात एक तरल सीमा रेषा आखणारे त्याचे मन म्हणजे राधा. आणि म्हणून ही राधा त्याला त्याच्या सा-या आयुष्यभर भेटत राहतेय. खरी राधा गोकुळापुरती; पण ही त्याची मनसखी मात्र सतत त्याच्या सोबत, त्याला सजग ठेवणारी.अन मग मला हे फार भावलं. खर काय असेल ते असो, मला आता राधे मध्ये कृष्णाचे मन दिसू लागले. 
आणि कृष्ण !
कृष्ण, नेहमी मनाला भुरळ घालणारे एक गारुड ! किती विविधांगी व्यक्तित्व ! आपण पाहू तसे दिसणारे, अन तरीही प्रत्येक वेळा काही नवे सांगणारे, सूचवणारे, शिकवणारे.
या व्यक्तित्वाच्या सोबत काही जुन्या, काही नव्या, काही काल्पनिक घटना जगून बघायचा हा प्रयत्न. या सर्व लिखाणाला पुरावे सापडतीलच असं नाही, किंबहुना माझ्या मनातले हे सारे खेळ... कधी काही वाचलेले, ऐकलेले. त्याला धरून मनात उठणारे हे तरंग. ते चितारण्याचा हा प्रयत्न फक्त !
त्यामुळे काहींना पटतील, भावतील, काहींना अवास्तव वाटतील. पण त्यात वास्तव शोधायचेच तर त्यातील भावना, तत्व यांत शोधा. अन्यथा कवी कल्पना म्हणुन सोडून द्या.

___

सृजन 

मला अजून आठवतो तो दिवस. नुकतेच कालिया मर्दन झाले होते. त्यामुळे मी खूष होतो. आम्ही सगळेच बालगोपाल; इतकेच नव्हे तर मैय्या, नंदबाबा आणि सगळेच गोकुळ आनंदात अन काळजीमुक्त होते.
त्या दिवशी सकाळीच सुदामा आणि ५-६ जण आले. आणि मैय्याला विचारू लागले,
" आम्ही जाऊ का यमुनातीरी, कान्हाला घेऊन ? " अन मैय्यानेही हसत हसत आम्हाला जाऊ दिले होते.

एकमेकांना ढुशा देत अन सुदाम्याची चेष्टा करत आम्ही सगळे यमुनातीरी आलो. आणि कदंबाच्या अंगाखांद्यावर विसावलो. सूर्य आता वर आलेला; पण कदंबाच्या पानांनी आमच्यावर छान सावली धरलेली. मी माझ्या लाडक्या फांदीवर बसलो.अन सुदाम्याने पाव्याला हात लावत प्रेमळ हट्ट केला, " वाजव की रे ..."

मी पावा काढला आणि ओठावर ठेऊन वाजवणार; इतक्यात दूरवर तू दिसलीस. तू अन अनय येत होतात. तू काहीतरी तावातावाने सांगत होतीस अन तो हात मागे बांधून, ताठ मानेने पुढे पुढे चालत होता. तू मागून त्याला एकदा थांबवण्याचा प्रयत्नही केलास...पण तो न थांबता तुलाच थोडी खेच बसली. तू पुन्हा त्याच्या मागे धावलीस... वा-यावर तुझी ओढणी फडफडली. जणुकाही अनय तुला पुढे ओढत होता अन वाहणारे वारे तुला मागे ढकलत होते. तुझी होणारी घालमेल, ओढाताण स्पष्ट दिसत होती अगदी !

आता तू अगदी समोर आलीस. ऐकू येत नव्हतं काही, पण स्पष्ट दिसत मात्र होतं. अनय तट्टकन उलटा फिरला. मागे बांधलेले हात आता सुटले. एका हाताने तुझा दंड धरत तुला त्याने ठामपणे थांबवले. आणि दुस-या हाताने काहीतरी समज दिल्यासारखी मुद्रा करत काहीबाही बोलला. अन दुस-या क्षणी तुला सोडून देत तो पुन्हा तट्ट्कन उलटा होऊन बाजाराच्या दिशेने ताड ताड निघून गेला.

तू तशीच उभी... काष्ठवत ! कोरड्या डोळ्यांनी पाठमो-या जाणा-या अनय कडे बघत.
अन मग कोणीतरी ढकलल्यासारखी तू तीरावर आलीस. अगदी माझ्यासमोर येऊन मटकन बसलीस. हातातली घागर कधी खाली ठेवलीस तुलाही कळलं नाही. अन गुढग्यांना पोटाशी धरत, भकास नजरेने वर बघितलस... माझ्या आरपार... !
अन कोमल ऋषभ लावत साद घातलीस... "अनय...."

तू आरपार बघत होतीस माझ्यात. अन मलाही जाणवलं, माझ्या आत आत एका कोप-यात अनय ताडताड चालत दूर जातच होता की !

तू अनयला साद घातलीस तोच कोमल ऋषभ माझ्या पाव्यातून वाहू लागला. अन माझ्याही न कळत मी पाव्यात फुंकर मारली. सारा आसमंत त्या कोमल ऋषभाने हेलावून गेला. अन कितीतरी वेळ तुझी वेदना माझ्या पाव्यातून ठणकत राहिली. सारे, सारे त्या वेदनेने हेलावले. हळुहळु एक एक जण पांगले.
आता तीरावर केवळ तू, मी अन कोमल ऋषभ नुरले. एक क्षणी माझी बोटं थरथरली अन अलगत षडजावर स्थिरावली.

अन मग तुझ्या काळ्याभोर डोहात कुठुन कुठुन जलद भरून आले. भरभरून ओथंबू लागले. ते पाहून माझी बोटं थरथरली अन पुन्हा ऋषभ निनादला. तशी त्या थेंबांनी किनारा सोडला. गंधार कसाबसा गाठला मी, पण तुझ्या धारांनी मात्र सगळाच ठावठिकाणा सोडला होता...
अन तुझ्या ओठी आलेच...." श्रीरंगा..." अगदी सा रै ग...

आता तुझ्या डोळ्यात ओळख आली. माझ्यातल्या अनयला विसरून माझ्यातल्या श्रीरंगाची ओळख तुला पटली. तशीच उठून माझ्यासमोर उभी राहिलीस.

" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "

... मला तू शिकवलेला, तो पहिला धडा होता.
पावा असा वाजवावा की सूर तर निघावा हवा तसा, पण वेदना आत - आत आवरून, सावरून रुजू द्यावी.
तरच ते सृजन !

"राधे... "

( पूर्वप्रकाशित)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle