कितीदा साद घालतं
माझं माणूसपण मला
कधी ममतेचा पूर घेऊन
कधी स्वार्थाचा सूर घेऊन
कधी गर्वाचा विखार होऊन
तर कधी अश्रूंचा मोतीजाळ घेऊन
पण माझ्यातलं विदेहीपण
मात्र नेहेमीच असतं जागृत
ते नेहेमीच असतं न बदलणारं
शांत, स्थितप्रज्ञ तरीही जाणतं
नसानसांतून खेळल्या जाणाऱ्या
ह्या चैतन्याच्या रंगपंचमीला
नेहेमीच साक्ष असं
बघत असतं ते सतत
ह्या चैतन्याच्या नवरुपांना
पण त्यात ते रंगून मात्र जात नाही
सतत जागृत असणं
हाच त्याचा गुणधर्म
काहीच सांगत नाही,
बोलत नाही ते कधी आपणहून
मलाच पण जाणवतं ते कधी
एकदम असं
कधी कवितेच्या फुटक्या तुकड्यातून
तर कधी काळोख्या
गाभाऱ्याच्या मंद तेजात
कधी माझ्याच चहुदिशांनी धावणाऱ्या
चंचल विचारप्रवाहात ..एकदम ..अवचित
कधी खूप रडल्यावर
कधी खूप हसल्यावर
कधी खूप एकाकीपणात
कधी सुखाच्या मऊ दुलईत
तर कधी दुःखाच्या काटेरी बोचरेपणात
माझाच विदेहीपणा मला भेटतो
असा अनंत रूपांतून
ओळख पटवतो तो
माझ्यातल्या ‘मी’ पणाची नाही
तर माझ्यातलं ‘मी’पण ‘मी’ नसण्याची
तो विदेहीपणा तर माझ्यातलाच
पण माझ्यातली ‘मी’ मात्र विदेही
हे कसले द्वैतातले ‘अद्वैत’
की अद्वैतातले ‘द्वैत’
का चैतन्याचा खेळ
का जीवशिवाचा मेळ?
~ देवयानी गोडसे