जवळ जवळ २४ वर्षांपूर्वी अमेरीकेत आल्या आल्या पहिल्यांदा नवा पदार्थ चाखला तो म्हणजे नवर्याने टोस्टरमधे गरम केलेला एगोचा वाफल आणि त्यावर ओतलेला मधाच्या रंगाचा पाक. बेताच्या गोडीचा हा पाक मला फारच आवडला. त्या पाकाला मेपल सिरप म्हणतात आणि तो मेपल नावाच्या झाडापासून मिळतो अशी ज्ञानात भरही पडली. त्यानंतर मधला काही काळ फ्रोजन वाफल्सची जागा घरच्या देशी खाण्याने घेतली आणि मेपल सिरपही मागे पडले. पुन्हा वाफल्स, पॅनकेक वगैरे प्रकार आमच्या घरात आले ते लेक शाळेत जावू लागल्यावर. शाळेत मार्केट डे म्हणून फंडरेझरचा प्रकार असे. दर महिन्याला तयार खायच्या पदार्थांची यादी यायची. त्यातून पदार्थ सिलेक्ट करुन ऑर्डर दिली की ठरलेल्या दिवशी शाळेत खाऊचा खोका मिळायचा. आम्ही पण पिटूकले पॅन केक आणि वाफल स्टिक्स ऑर्डर केले. त्या सोबत पिटूकल्या ड्ब्यांतून सिरपही आले. लेक मिटक्या मारत खायचा. एक दिवस मी देखील त्यातलाच खाऊ खाल्ला तर सिरप एकदम गोड मिट्ट! खोक्यावरची माहिती वाचल्यावर कळले की हे नुसतेच पॅनकेक सिरप आहे मेपल सिरप नाही. गावातल्या दुकानातही पॅनकेक सिरपच होते. झाले! खरे मेपल सिरप कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला. नवर्याने स्थानिक मित्राला विचारले तर तो म्हणाला आता नाही मिळणार, सिझन सुरु होईल तेव्हा मिळेल. वाट बघता बघता एकदाचा मार्च उजाडला आणि आम्हाला मिळालेल्या पत्त्यानुसार दीड-दोन तास ड्राईव करुन जाऊन मेपल सिरप फेस्टिवलला गेलो. तिथे मेपल सिरप फार्मर्सच्या रानात फिरुन , ते कसे तयार होते ते बघून, गॅलनभर सिरप घेवून आम्ही परतलो. लेकाला ती भटकंती खुपच आवडली. पुढे मध, मेपल सिरप या गोष्टी थेट शेतकर्यांकडून स्टेटफेअर मधे विकत मिळतात हे कळल्यावर वर्षाची खरेदी स्टेटफेअरमधेच होवू लागली आणि इतर व्याप वाढल्याने मार्चमधे फेस्टीवलला जाणे आपोआपच मागे पडले.
यावर्षी मात्र अचानक मेपल सिरप फेस्टिवलचा योग जुळून आला. या विकेंडला काय करायचे, जवळपास काय इवेंट आहेत म्हणून जालावर शोधताना शेजारच्या स्टेटमधल्या फेस्टिवलची माहिती मिळाली. सव्वातासाची ड्राईव होती आणि रस्ताही ओळखीचा होता तेव्हा शनिवारी लगेच फोन करुन माहिती घेतली आणि रविवारी शेजारच्या ओहायो राज्यातील ह्युस्टनदवुड स्टेट पार्कला जायचे पक्के केले. दुपारी साधारण एकच्या सुमारास पार्कमधे पोहोचलो. मेपल सिरप फेस्टिवलसाठीचे राखीव पार्किंग कुठे आहे ते दर्शवणार्या पाट्यांचा मागोवा घेत योग्य ठिकाणी गाडी पार्क केली. समोर शांत अॅक्टन लेक आणि सभोवताली पानगळ झालेले रान! एका बाजूला खाद्य पदार्थ विकत घ्यायची सोय होती आणि हवेतील गारव्यावर उपाय म्हणून दुसर्या बाजूला चक्क शेकोटी! पार्कच्या ट्र्कबेडसमधे पेंढ्याची बैठक असलेल्या राईड्स - हे राईड्स आम्हाला रानात घेवून जाणार होत्या. त्यासाठी रांगेत उभे राहिल्यावर १५ मिनिटात आमचा नंबर लागला. रानातल्या रेंजरच्या ताब्यात आमच्या ग्रूपला देवून राईड दुसरा ग्रूप आणायला गेली आणि आम्ही रेंजर सोबत ट्रेलवरून माहिती ऐकत चालायला सुरुवात केली.
मेपल सिरप हे शुगर मेपल, रेड मेपल आणि ब्लॅक मेपलच्या सॅप पासून बनवतात. थंड प्रदेशात वाढणारी ही मेपलची झाडे हिवाळ्यात टिकून रहाण्यासाठी हिवाळा सुरु होण्याआधी आपल्या मूळांमधे पिष्टमय पदार्थ(स्टार्च) साठवतात. या स्टार्चचे रुपांतर नंतर साखरेत होते. हे साखर असलेले पाणी म्हणजेच सॅप ही झाडाच्या xylem system मधून वर सरकते. खोडातून वर सरकत झाडांच्या फांद्यांच्या टोकातून खाली ठिबकू लागते. झाडाच्या खोडाला भोक पाडून ही सॅप गोळा करता येते. उत्तर अमेरीका खंडात रहाणारे मुळचे रहीवासी हे मेपलच्या झाडाची सॅप गोळाकरुन ती लाकडी भांड्यात साठवत असत. खालच्या चित्रात लाकडी खोदलेले ट्रे टाईप जे आहे तशा भांड्याचा उपयोग करत.
ही सॅप म्हणजे गोडसर पाणीच असे. त्यातील पाण्याचा अंश कमी करण्यासाठी ही सॅप आटवणे आवश्यक होते. मात्र या लोकांकडे धातूची भांडी नव्हती. त्यामुळे विस्तव पेटवून त्यात दगड गरम करुन ते गरम दगड सॅप असलेल्या लाकडी भांड्यात टाकत आणि पाण्याला उकळी आणत. मात्र या प्रकारे आटवलेली सॅप ही सिरप इतकी गोडही नसे आणि घट्टही नसे. खालच्या चित्रावरुन अंदाज येइल.
पुढे युरोपियन लोकं आले, त्यांच्यासोबत धातूची भांडी आली. मेपलची गोड सॅप गोळा करुन धातुच्या भांड्यात आटवणे सुरु झाले.
उघड्यावर मोठ्या भांड्यात सॅप आटवणे
हळू हळू तंत्र विकसित होत बॅरल स्टोवचा वापर होवू लागला.
आजकाल मोठ्या प्रमाणात सॅप आटवायचे काम शुगर शॅकमधे करतात.
शुगर शॅकमधे
सॅपमधील पाण्याच्या अंश आणि साखरेचे प्रमाण यानुसार साधारण ४० गॅलन सॅप पासून १ गॅलन मेपल सिरप तयार होते. पूर्वी सॅप लाकडी बॅरलमधे गोळा करत, मग धातूच्या बादल्या आल्या आणि आता बरेच जण प्लॅस्टिकच्या बॅग्जही वापरतात.
टॅप केलेले झाड - लाकडी बॅरल आनि धातूच्या बादल्या
ओहायो स्टेटमधे शुगरमेपल जास्त प्रमाणात आहेत. शुगर मेपलच्या सॅपमधे साखरेचे प्रमाणही जास्त असते. सॅप गोळा करायला टॅप करायचे झाड साधारणतः ३० पेक्षा जास्त वयाचे असते. सॅप गोळा करायचा एक विशिष्ठ अवधी असतो. रात्रीचे तापमान गोठवणारे हवे आणि दिवसाचे तापमान त्यामानाने उबदार हवे. असे असताना दिवसा सॅप वाहू लागते आनि रात्री हे वाहणे थांबून नव्याने सॅप खोडापर्यंत येवून थांबते. त्यामुळे साधारण हिवाळ्याच्या शेवटच्या ट्प्प्यात, फेब्रुवरीचा शेवट ते मार्च या काळ हा शुगरिंग सिझन असतो. त्यानंतर झाडावर कळ्या येऊ लागल्या की सॅप मधे रासायनिक बदल घडून येतो आणि सॅपची चव बदलते. त्यामुळे ४-६ आठवड्याचा शुगरिंग सिझन असतो. टॅप करायला झाडाला जिथे भोक पाडलेले असते तो भाग झाड स्वतःच दुरुस्त करुन पुन्हा पुढल्या वर्षासाठी अन्न साठवायला तयार होते.
मेपल सिरप ही कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर-पूर्व भागाची खासीयत. इथल्या मूळ रहिवाश्यांनी गोडाची गरज भागवायला गोळा केलेली सॅप ते मिलियन्स ऑफ डॉलरचा कॅनडाचा मेपल सिरप एक्स्पोर्ट असा हा प्रवास. मेपल सिरप बनवणारी आमची सहावी पिढी, आठवी पिढी असे अभिमानाने सांगणारे शेतकरी बघितले की कौतुक वाटते. त्यांनी राखलेले रान आणि जपलेली परंपरा दोन्ही कौतुकास्पद.