जवळ जवळ २४ वर्षांपूर्वी अमेरीकेत आल्या आल्या पहिल्यांदा नवा पदार्थ चाखला तो म्हणजे नवर्याने टोस्टरमधे गरम केलेला एगोचा वाफल आणि त्यावर ओतलेला मधाच्या रंगाचा पाक. बेताच्या गोडीचा हा पाक मला फारच आवडला. त्या पाकाला मेपल सिरप म्हणतात आणि तो मेपल नावाच्या झाडापासून मिळतो अशी ज्ञानात भरही पडली. त्यानंतर मधला काही काळ फ्रोजन वाफल्सची जागा घरच्या देशी खाण्याने घेतली आणि मेपल सिरपही मागे पडले. पुन्हा वाफल्स, पॅनकेक वगैरे प्रकार आमच्या घरात आले ते लेक शाळेत जावू लागल्यावर. शाळेत मार्केट डे म्हणून फंडरेझरचा प्रकार असे. दर महिन्याला तयार खायच्या पदार्थांची यादी यायची.