कुंभारकामाच्या वर्कशॉपमध्ये केलेली ही काही भांडी आणि इतर थोडं काम
अगदीच पहिली आहेत त्यामुळे भांड्यांच्या कडा जाड असणे, सगळीकडे सारख्या जाडीच्या नसणे, आकारात फार विविधता नसणे हे सगळे आहेच. शिवाय ग्लेझिंग देखिल अगदी रामभरोसे झालंय. पण तरीही मला आवडलीयेत माझी बाळं. :ड
हा एक मुखवटा केलाय. तळहातापेक्षा थोडा लहानच आहे.
हे एक म्युरल. असंच
ही कोंबडी आणि चिमणीचं हायब्रीड आहे.
हा एक स्लॅबवर्कमधून केलेला ट्रे
अन ही भांडी.
हे हातानं केलंय
बाकी खालची चाकावरची आहेत
आणि हा झाकणवाला डबा
*******************************************************************************************
कुंभारकामाच्या कार्यशाळेबद्दल आणि वर विचारलेल्या प्रश्नांच्या निमित्तानं थोडसं:
तर ही शाळा मी केली शालनताई डेरे यांच्या पॉटर्स प्लेस नावाच्या स्टुडिओ मध्ये. नशिबानं माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. हिंदुजा हॉस्पिटलच्या जवळ आणि बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या बरोब्बर मागे. शाळा ६ दिवसांची होती. सलग. सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०. त्यातील एक दिवस मला अजिबात भांडी करताच आली नाहीत. मग मी हातानं करायचे प्रकार केले. सेंटरींगची प्रॅक्टिस केली.
चाकावर जेव्हा ओली माती टाकतो आणि चाक गरागरा फिरायला लागतं, तेव्हा त्या मातीवर सेंट्रिफ्युगल फोर्स लागू होतो. त्यामुळे ती जर अगदी बरोबर मध्यावर नसेल तर वेडीवाकडी फिरते, थिऑरेटिकली भांडी गोल होत होणार नाहीत पण खरंतर भांडी करताच येत नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सेंटरींग. त्या गोळ्याला चाकाच्या मध्यावरच्या शून्य बिंदूवर आणून मग त्यावर काम करणे. पण हे जमवणं जरा कठीणच असतं. याकरता डोळ्यानं न बघता, हातातल्या संवेदनेकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. बरं एकदा पहिल्यांदा माती सेंटर केली म्हणजे झालं असं नाही. त्यातून भांडी घडवत असताना केव्हाही त्या मातीचा / भांड्याचा शून्य बिंदू नाहीसा होतो आणि मग वाटोळं नाही नाही वेडविंद्रळं होतं.
माझं काम अत्यंत बिगरीतलं आहे. अनेक ठिकाणी माती जास्त आहे काही ठिकाणी एकदम कमी आहे. हे पुढे प्रॅक्टिसनंच येईल. पण चाकावरचं काम करायला सगळ्यात मजा आली मला. अजूनही स्वप्नात मी चाकावर भांडी करतेय. फार आतवर पोहोचलाय हा अनुभव.
कलर स्कीम इतकीशी जमली नाहीये. सिरॅमिकचं ग्लेझिंग हा एक अमर्यादित अफाट विषय आहे. आम्ही आमच्या बाईंनी जी ग्लेझेस बनवून दिली ती आपापल्या मगदुराप्रमाणे वापरली. तरी मी सगळे रंग वापरले नाहीत. निळा का वापरला गेला नाही देव जाणे. पुढच्या भांड्यांमध्ये निळा वापरेन. ग्लेझेस जोवर भाजत नाही तोवर भांडी कशी दिसतील याची अजिबातच कल्पना येत नाही.
तो ट्रे म्हणजे स्लॅबवर्क. माती लाटण्यानं लाटून त्यावर डिझाईनचे ठसे उमटवले आहेत. सगळ्यात सोपं आणि झटपट काम. मग तो स्लॅब ज्या आकाराचा हवा त्या आकाराच्या वस्तुत घालून सुकवायचा.
मी आता एप्रिलपासून नियमित शालनताईंच्या स्टुडिओत आठवड्यातून दोन वेळा प्रॅक्टिसला जायचा विचार करत आहे.
****************************************************************************
काही पॉटरी स्टुडिओ (मिनोतीनं सांगितलेले आणि मला माहित झालेले)
* मुरुड-जंजिरा किंवा दिवे आगारला तुम्ही कोणी जाणार असाल तर तिथे एक इंदापूर नावाचे गाव आहे. तिथे आकार पॉटरी वर्क्स नावाचा स्टुडिओ आहे. आम्ही गेलेलो तेव्हा त्यांनी सर्व स्टुडिओ फिरुन दाखवला होता. https://www.facebook.com/aakarpotart/
* कोल्हापुर जवळ किणी नावाचे एक गाव आहे तिथे टेराकोटा जर्नी नावाचा एक स्टुडिओ आहे. बहुदा तो स्टुडिओ आता कोल्हापुरमधे आहे पण नक्की कळत नाहिये. तो मुलगा बरेच ठिकाणी वर्क्शॉप्स घेतो. त्याच्या फेसबूक पेजवर नेहेमी माहिती टाकतो. त्याचे गणपती खुपच सुरेख आहेत. अमेझॉन वर विकतो. गणपती करायला शिकवतो पण बहुदा. https://facebook.com/Terracottajourney
* इंदापूरलाच संदीप मंचेकरांचा स्टुडिओ आहे. ( https://www.anvipottery.com/ ) ते फार नावाजलेले आहेत. आमची कार्यशाळा सुरू असताना एकदा शालनताईंना भेटायला आले होते. एका एक्झिबिशनची तयारी सुरू होती. मंचेकर व्हिल्सही बनवतात. बाकी सर्व पॉटरी मटेरियलही त्यांच्याकडे मिळतं.
* अजून दोन पॉटरी स्टुडिओज हेरून ठेवले आहेत. जरा नीट काम जमायला लागलं की तिथे जाऊन शिकायचा विचार आहे.
१. ऑरा आर्ट स्टे - मोहाली : http://www.auraartstay.com/page/the-studio
२. आंद्रेता पॉटरी - हिमाचल प्रदेश : http://www.andrettapottery.com/Pottery.html
३. या व्यतिरीक्त पाँडिचेरीला देखिल आहेत छान छान स्टुडिओज.