अ‍ॅस्परॅगस रिझोतो

इटालियन रिसोत्तो/रिझोतो

हा इटालियन प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्याची फ्रेंच, स्पॅनिश, जपानी अशी बरीच व्हर्जन्स पण खाल्ली. टेक्स्चर मधे आपल्या दालखिचडीच्या जवळ जाणारा प्रकार एकदम गुणी आहे. बिघडण्याचे चान्सेस कमी असतात. नेटवर असंख्य कृती आहेतच त्यात अजून एक माझी भर.

साहित्य

२ कप अर्बोरिओ राईस (याला सबस्टिट्यूट करू नका शक्यतो कारण या शॉर्ट ग्रेन तांदळामुळेच रिझोटो ला ते छान क्रीमी टेक्स्चर येते. हल्ली भारतात पण ऑनलाईन/फूडमॉल्स मधे हा तांदूळ नक्की मिळतो.)
८-१० कप व्हेज/चिकन स्टॉक (अधिक टीपा पहा)
१ मध्यम कांदा बारीक चिरून (लाल कांदा नको)
१०-१२ कोवळे अ‍ॅस्परअ‍ॅगसचे दांडे (जमिनीकडला कडक भाग काढून टाकून गोल गोल बारीक चिरायचा. या ऐवजी ड्राईड मश्रुम्स/किंवा ताजी मश्रुम्स पण वापरू शकता)
१.५ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
२ टेबलस्पून कोणतीही व्हाईट वाईन (कुकिंग वाईन पण चालेल अथवा वगळली तरी चालेल. चवीत फार फरक पडत नाही)
१/२ कप फ्रेश ग्रेटेड पार्मेजान चीज (शक्यतो ओरिजिनल पार्मेजान ऐनवेळी ग्रेट करूनच वापरावे, तयार पावडर वापरू नये.चवीत फारच फरक पडतो.)
मीठ
मीरपूड

कृती

१)स्टॉक एका मोठ्या पातेल्यामधे बारीक गॅसवर गरम करायला ठेवून द्यावा.
२)दुसर्‍या एका पसरट पॅनमधे ऑलिव्ह ऑईल घालून गॅसवर ठेवावे.
३)ऑ. ऑ. मधे लगेच चिरलेला कांदा घालून, कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे.
४)अ‍ॅस्परॅगस (मश्रूम्स वापरत असाल तर ते)पण त्यावर घालून हलके परतून घ्यावेत.
५)लगेच वाईन घालून २-३ मिनिटे परतावे.
६)त्यावर तांदूळ न धुताच घालून अगदी १-२ मिनिट परतावा.
७) एव्हाना स्टॉक गरम झाला असेल. एक-एक डाव/पळी स्टॉक तांदळावर घालून भात ढवळत जावे. सुरूवातीला तांदूळाचा स्टॉक शोषण्याचा स्पीड भरपूर असतो. हळूहळू तांदूळ छान गुब्गुबीत दिसायला लागतात. मग स्पीड कमी होतो. न कंटाळता एक-एक डाव स्टॉक ची आहुती रिसोटो यज्ञात घालणे आणि खालपासून मिश्रण नीट ढवळणे हे करत रहावे.
८) साधारण २० मिनिटांत भात बहुतेकसा शिजतो. या वेळी घातलेला स्टॉक नीट शोषला जात नाही. या वेळी ग्रेटेड चीज घालावे. चव पाहून मीठ आणि मीरपूड घालावी. आणि ५च मिनिटे झाकण ठेवावे. (ही स्टेप बर्याच ठिकाणी नसते पण झाकण ठेवून शिजवल्याने आत राहिलेली किंचीत कणी पण जाऊन छान क्रीमी रिसोटो होतो.)
९) लगेचच बारीक चिरलेली इटालियन पार्स्ले आणि अजून थोडे पार्मेजान किसून घालावे आणि खावे.

अधिक टीपा
१) स्टॉक : व्हेज किंवा चिकन स्टॉक घरी करू शकता. चिकन साठी चिकनचे पीसेस( विथ बोन्स), कांदा,गाजर, तमालपत्र हे ३० मिनिटे उकळून गाळून घ्यायचे. नाही तर ड्राईड मश्रूम्स भिजवून ते पाणी पण स्टॉक म्हणून वापरू शकतो पण याची चव थोडी उग्र लागते. विकतचा लो सोडियम स्टॉक नक्कीच वापरला तरी चालतो. अगदी आळशीपणा म्हणजे मापाच्या पाण्यात मॅगीचे(आयडी नव्हे ब्रँड)/अजिनोमोतो वगैरेचे सूप क्यूब घालून ते उकळून ते पण वापरू शकतो. फक्त विकतच्या स्टॉकमधे मीठ खूप असल्याने अगदी खारट पण होऊ शकतो कारण परत चीजमधे पण मीठ असते. नाहीतर विकतचा स्टॉक वापरताना १/४ क्वांटिटी साध्या उकळत्या पाण्याने सबस्टिट्यूट करावी.
२) गरम गरमच छान लागतो. गार झाला की विचित्र घट्ट होतो.
३) बरोबर पॅन फ्राईड फिश, ग्रिल्ड चिकन, ग्रिल्ड मशुम्स असे काहीही चांगले लागते. खालच्या फोटोत ग्रिल्ड मश्रूम्स आहेत.

फोटो

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle