शोधितो मी पुन्हा फिरून
मलाच मी वजा करून।
देह मी की उड्डाण मी
घरटे मी की कुटुंब मी?
आभाळ की वनराजी मी।
संदर्भहीन तर कोण मी?
रंग रूप की प्रजाती मी
पुन्हा विसरून मी माझे स्मरण
मलाच मी वजा करून।।
कार्य मी की करण मी
क्रिया मी की प्रतिक्रिया मी
उत्तर मी की अनुत्तर मी
प्रत्युत्तर देतो कोण आतून
मलाच मी वजा करून।।
शून्य की महाशून्य मी
संख्या संज्ञा की अक्षर मी
धुळीकणाच्या पाटीवरती
कोण कुठील टीम्ब मी
कुठले बिंब अन प्रतिबिंब मी
कर्म साखळी सिद्धांतातील
कुठले प्रारब्ध संचित मी
क्रियमाणकी पुण्य पाप मी
हिशेब जुळवी कोण मोजून
मलाच मी वजा करून।।
रश्मी भागवत।।