" .... जीव असह्य दमला आहे. पायांच्या चिंध्या झाल्या आहेत. शरीराचा कण अन कण दुखतो आहे. पाणी संपत आले आहे. पाठीवरचे ओझे सहन होत नाही...." कुठल्या तरी मधल्याच शिखरावर बसून दम खाणार्या शेरीलची शारीरिक अवस्था बरी म्ह्णावी इतकी मानसिक अवस्था वाइट आहे. अशातच एक बूट घसरून दरीत पडतो. ती प्रचंड वैतागून शिव्या देते व दुसराही बूट फेकून देते. आता पुढील ट्रेक कसा पूर्ण करायचा ही चिंता देखील तिच्या मनाला शिवत नाही. ह्या पॉईंट वर सुरू झालेला चित्रपट नक्की कुठे जाउन संपेल हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. इथून सुरू होते एक शोधयात्रा. कसला शोध? स्वतःचा... स्वतःच्या स्त्रीत्वाचा, आपली आई नक्की कशी होती ? ती तशी का होती? ह्या चिरंतन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपले आईशी, आपले स्वतःशी असलेले नाते तपासण्याचा; जिथे गरज भासेल तिथे स्वतःलाच सहानुभूती दाखविण्याचा आणि आता आधार द्यायला आई नाही म्हणून स्वतःच स्वतःला फटकारून उभे करण्याचा पुढे पुढे पावले टाकण्याचा. ही सिंपथी टूर आहे कि एंपथी टूर हे प्रत्येक प्रेक्षकाच्या जाणिवांवर अवलंबून आहे. दिग्दर्शक व लेखिका इंटरप्रिटेशनचा मार्ग
तुमच्यासाठी फक्त खुला करून देता व बाजुला होतात.
४६ वर्षीय शेरील स्ट्रेड ह्या स्त्री वादी लेखिकेचा मानसिक प्रवास तिने वाइल्ड : लॉस्ट अँड फाउंड ऑन द पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल ह्या पुस्तकात शब्द बद्ध केला आहे व त्याला कॅनेडिअन दिग्दर्शक ज्यां मार्क वाली ह्यांनी चित्रबद्ध केले आहे. रीस विदर्स्पून ऑफ लीगली ब्लाँड फेम आणि लॉरा डर्न - ज्युरासिक पार्क मधील पॅलिओ बोटॅनिस्ट ह्या दोघींनी या चित्रपटातील मुलगी व आईच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्या ह्या व्यक्तिरेखा जगल्या आहेत हे म्ह्णणे फारच क्लीशेड होईल . इतका प्रामाणिक अभिनय हिंदी बॉलिवूड, तथाकथित आर्ट फिल्म्स व हॉलिवुड बिग बजेट चित्रपटांत अभावानेच बघायला मिळतो. ह्या कसलेल्या अभिनेत्रींनी आजिबात हॅमिन्ग न करता व्यक्तिरेखेत मिळून जाउन त्यांना जिवंत केले आहे.
शेरीलची एकुलती एक मानसिक ताकद असणार्या आईचा अचानक कर्करोगाने मृत्यू झाला आहे. आईच्या वियोगानेच नव्हे तर तिच्या एकंदर हताश जीवन यात्रेची व करूण मृत्यूची शेरील साक्षिदार आहे. आई वारल्यानंतर ती आपल्या नवर्याला घटस्फोट देते व ड्रग्ज आणि कोणाहीबरोबर शरीर संबंध ठेवण्याच्या दुष्टचक्रात अडकते. पण ह्या घातक चक्रातून बाहेर पडण्यासाठी तिला जो इमोशनल अँकर हवा आहे तो कुठेच नाही. भावाशी संवाद नाही त्यामुळे ती अगदी एकाकी , एकटी झाली आहे. पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी ती जो उपाय योजते व तडीसही नेते त्या प्रवासाचे नाव म्हणजे वाइल्ड हा चित्रपट.
रूढ अर्थाने इतकीच कथा आहे. पण चित्रपटाची ट्रीटमेंट, त्यात येणारा निसर्ग आणि नैसर्गिक अदाकारी ह्यामुळे ही स्वशोधयात्रा अविस्मरणीय ठरते. चित्रपटाची नायिका पॅसिफिक क्वेस्ट ट्रेल वर संपूर्ण तयारीनिशी निघते. जेवढे आपल्याला पाठीवरच्या बॅक पॅक मध्ये वाहून नेता येइल तेव्ढेच ओझे बरोबर न्यायचे. त्यात जेवायखायची संपूर्ण तयारी, तंबू , स्ली पिन्ग बॅग पाणी व इतर असंख्य उपयोगी/ उपयोगी वाट्तील अश्या वस्तू ह्यात वाचायची पुस्तके, रेप अटेंप्ट झाल्यास किंवा अपघात झाल्यास वाजवायची शिट्टी पैसे, पाण्यासाठीचा फिल्टर वगिअरे आलेच.
चित्रपट ट्रेल वर असलेली नायिका तिला भेटणारे चित्र विचित्र लोक, येणारी संकटे, तिला होणारे भास व येणार्या आठवणी ह्यात पुढे मागे जात राहतो. एक लिनीअर असे नॅरेशन नाही. नेहमी ट्रेकिन्ग हायकिंन्ग करणार्यांना ह्यात ओळखीचे काही सापडेल. पण हा रूढ अर्थाने साहसपट ही नाही. जी शिखरे सर करायची आहेत आणि ज्या भयानक लॉस व दु:खाच्या दर्यांतून वर यायचे आहे ते पूर्णपणे नायिकेच्या मनात आहेत. त्यामानाने ट्रेल हे एक सहायक अभिनेत्याचेच काम करते. म्हणूनच चित्रपटातील निसर्ग, व्यक्तिरेखा, संगीत , तिच्या आठवणी ह्या अगदी " आहे हे असे आहे." ह्या स्वरूपातच येतात. कुठेही कसलाही नाटकी अभिनिवेष नाही.
तिच्या आठवणीतील आई ही मुलां बरोबर नाचणारी गाणारी, कमी पैशातही मुलांसाठी जमेल ते सर्व करणारी आहे. त्यांचा एक लाडका घोडा असतो. वडील आईला मारझोड करत असतात व म्हणून ती मुलांसकट निघून येते. व बारकी सारखी कामे करून घर चालवते. हे सिंगल मदरचे टेंप्लेट वैश्विक आहे. त्यामुळे दिग्दर्शकाला ते कुठेही जास्त सोलून सांगावे लागत नाही. परिस्थिती दारूणच आहे त्यातही आई मुलांबरोबर काही थोडे सुखाचे, आनंदाचे व जगातील सौंदर्य टिपण्याचे प्रयत्न करते. कधी ते यशस्वी होतात तर कधी लाथ बसते. आई मुलीला
म्हणते " You have to put yourself in the path of beauty." मुलीला ते अचानक संदर्भा शिवाय आठवते. ती एका फेलो स्त्री ट्रेकर बरोबर बोलताना! व आईच्या म्हणण्याचा अर्थ तेव्हा तिला उमगतो. मुलां बरोबर बसून सूर्यास्ताच्या वेळी एक मोकळा श्वास घेताना आई दाखवली आहे. तिचे ते वढेच मागणे असते पण जीवनाबरोबर झगड्यात तेही बरेच वेळा अपूर्णच राहते. त्यातूनही हिंमत दाखवून आई मुलीबरोबरच कॉलेज शिकायला जाते. आई मुलींचे एरिका जाँगच्या साहित्याबद्दल बोलणे होते. ( ते इथे लिहू शकत नाही. )
भाउ आल्यावर असाइनमेंट लिहीनारी आई लगेच स्वैपाकाला लागते. भावाचे चित्र फारसे स्प ष्ट नाही पण आई गेल्यावर तो एका ठिका णी म्हणतो "आई असताना आपल्याकडे काही नाही असे मी म्हण त असे पण शी वॉज एव्हरी थिंग!" हे सिनेमात अश्या ठिकाणी येते कि त्या दोघांचा लॉस किती अपरिमित आहे हे समजून आपणच एका दरीत कोसळतो.
तिला एक म्हातारा शेतकरी, बरोबर चा ट्रेकर - हा मधेच ट्रेक सोडून जातो - दंगेखोर उत्साही तरूण मुले,
शांत शहाणी फेलो वुमन ट्रेकर, लेचरस व डेंजरस भटके बाप्ये, एक आजी व तिचा शहाणा नातू, एक जादुई प्राणी व एक कुत्रा हे बरोबर असे वेगवेगळे लोक भेटतात. पण ह्या फक्त व्यक्तिरेखा नसून, प्रवुर्त्ती किंवा रूपके आहेत. आपल्या जीवन रेखे प्रमाणे अनुभवांप्रमाणे आपण त्यांचा वेग वेग्ळा अर्थ लावू शकतो. मला हा शेवटचा गॄप सर्वात छान व जवळचा वाटला.
तिचा अवजड बॅक पॅक व तो हळू हळू हलका होत जाणे, वापरत नसलेल्या अर्ध्या गोष्टी टाकून देणे हा प्रागमॅटिक सल्ला देणारा अनुभवी माणूस, इव्हन; ट्रेलचे माहीती पुस्तक देखील जशी ट्रेल संपेल तसे टाकून दे असे तो तिला सांगतो. हे एक प्रकारे कार्मिक बर्डन, भावनांचे ओझे व त्यातून मुक्त होणे असे मी घेतले. तुम्ही इंटर्नली अश्या प्रोसेस मधून ऑल रेडी जात असाल तर चित्रपटात नायिकेबरोबर , लेखिकेबरोबर पावले टाकणे सोपे जाईल. तरीही प्रवास तुम्हाला रिक्त करणारा किंवा एका जीवनेच्छेने भरून टाकणारा असा वाटेल.
ट्रेलच्या प्रवासात ती एका गावात येते व लिप्स्टिक लावून बघते तेव्हा दुकान चालिका तिला आधी हायजीन बघ स्वतःची असा सल्ला देते. ती एका बरोबर रात्री झोपते तेव्हा कपडे काढताना हेवी बॅक पॅक ने तिच्य शरीरावर उमटवलेले व्रण बघून कसे तरी होते. शरीरसंबंधामधील एक रोमँटिसिझम, आनंद जाउन ती फक्त एका थकलेल्या शरीराने उपलब्ध आहे म्हणून करायची कृती होते. ह्यातून तिला आपल्या त्या फेज ची व्यर्थता कळते
ही काही दृश्ये मायबाप सेन्सॉरने कट केली आहेत.
दोन ठिकाणी मला कचकून रडू आले. एक म्हणजे आई मुलांना म्हणते मी तुमच्या वर इतके प्रेम करते इतके प्रेम करते हे हात लांब लांब करून त्यावेळेला व घोड्याला गोळी घालून मारतात तेव्हा. तुमचे इमोशनल ट्रिगर्स
कुठे आहेत त्यावर तुमचा रिस्पॉन्स अवलंबून आहे. पण कुठेही नायिका प्रेक्षकांची सिंपथी मागत नाही. प्रसंगांची अपरिहार्यता स्वीकारून पुढे जाते.
ट्रेलच्या प्रत्येक टप्प्यावर ती एक एक वाक्य पुस्तकात लिहून पुढे जाते. मग तरूण मुलांचे टोळके वॉव यू आर हर!! असे म्हणते तेव्हा आपणही हसतो.
अजुन चालतेची वाट असे चालू अस्ताना अचानक ब्रिज ऑफ गॉड्स येतो व ट्रेल संपते. शेरील ने पुढील जीवनात सुखी फॅमिली लाइफ स्वतःची मुले व इतर अचीव्ह केले अशी एक छोटी नोंद ती आपल्या आईसाठी ठेवते व पुढील वाटचालीस निघून जाते. इथे चित्रपट संपतो व आपला प्रवास अजूनही संपलेला नाही ही जाणीव घेउन आपण उठतो.
एका सर्वसाधारण स्त्री चा आत्मशोध - समाज, पूर्वग्रह, पुरुषी वासनेला सामोरे जाणे, स्वतःच्या गरजा समजणे, नात्यांमधील गॅप्स, स्वतःची शारिरिक , आर्थिक हतबलता समजून त्यासकट पुढे जात राहणे आईच्या कहाणीतून आपली कहाणी सुरू करणे - मुळातूनच अनुभवण्यासारखे आहे.
आई जवळ असेल तर तिचा हात हातात घेउन पहा नाहीतर तिच्या आठवणींसोबत.