अश्या या पावसात तू असावंस..

अश्या या पावसात
तू असावंस
हातात हात घेऊन फक्त
काहीच न बोलता

पावसाची रिमझिम
झाडांची एकेरी शीळ
रात्रीचं गडद आकाश
झुळुझुळू वाहणारे
नवे ओहोळ, नुकतेच जन्मलेले ,
सुसाट वारा सुटल्यावर
झाडांचे आवेगाचे नृत्य
आणि मग थोडी शांतता
निथळलेले थेंब झेलत
अलगद यावी
तुझ्यात – माझ्यात .

सगळी धरा न्हालेली
हळवी झालेली
एका तृप्तपणात
आता पाऊस थांबलाय
प्रत्येकाने आखलेलं
आपापलं आकाश
स्वच्छ झालंय
चांदणं फुलतंय
हळूच चाहूल घेत
डोकावतं आहे
तुझ्यात -माझ्यात ,
आता खरंच पाऊस थांबलाय
पण मला माहितीये
तो अलगद झिरपतो आहे कुठेतरी
इथेच अगदी इथेच
तुझ्या -माझ्या मनात .

~ देवयानी गोडसे

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle