तर काल काय झालं.... कामं होती म्हणून ठाण्यात दुपारी बाराच्या उन्हात भटकले. धड जेव्ण मिळेल असं एक ठिकाण दिसेना. मग परतताना टिप टॉप लक्षात आलं तिथे गेले. वेटिंग होतंच ते सहन करून मग जागा पटकवली. गार थंड पन्हे, ताक व इतर पदार्थांची गाडी सुरू झाली. आणि मग एक वाटीत मँगो फ्लेवरची अम्गुरी रसमलाई थंडगार व गोड आली आणि सीझनचा राजा आमरस तो ही आलाच छोट्या वाटीत दोन पळ्या!! तुरुंगातून सुटलेला गुन्हेगार सर्व प्रथम जिथे गुन्हा केला तिथेच जातो ह्या न्यायाने मी बरेच दिवसाने गोड खाते आहे तर पूर्णच वाइट वागू म्हणून जेवण संपल्यावर रसमलाईतले थोडे गार आंबा फ्लेवर बासुंदी सारखे दूध त्या आमरसात एक दोन चमचे वरून घातले!! काय मस्त लागलंय महाराजा. आत्मा तृप्त जाहला. आज दो गोली खानी पडी तो बेहतर. म्हणून तो क्षण अगदी एंजॉय केला. लिहायचे कारण आजचे गाणे ते ही असेच गोड व मलईदार आहे.
चित्रपट लव्ह इन तोक्यो
संगीत: शंकर जयकिशन
शब्दः हसरत जयपुरी.
मुझे तुम मिल गये हमदम सहारा हो तो ऐसा हो
जिधर देखुं उधर तुम हो नजारा हो तो ऐसा हो.
किसी का चांद सा चेहरा नजर से चूम लेती हुं
खुशी की इंतहा ये है नशे में झूम लेती हू.
हुई तकदीर भी रौशन सितारा हो तो ऐसा हो.||
मेरी आ़खों में आंसू है मगर आंसू खुशी के है
किसे छोडुं किसे पा लूं ये रिश्ते जिंदगी के है
हमे तो नाज है हमपर हमारा हो तो ऐसा हो
उधर दिल है इधर जां है बडी मुशकिल का सामां है
लबों पर मुस्कुराहट है मगर सांसों में तूफां है.
ये मैं जानुं या तुम जानो इशारा हो तो ऐसा हो.
आयुष्याची किती वर्षे वाट बघितली, अनेक चुकीचे टर्न घेतले अपेक्षा भंग सहन केले आता इंतजार संपून हवा तो जोडीदार मिळाला आहे. मला गर्व आहे, अभिमान आहे माझ्या निव्डीचा. तो माझ्यासाठी अगदी सही आहे. आणि त्याला व मला हे आतून कळले आहे. सर्व गाण्याला पियानोची अशी एक खास महिरप आहे व त्यात लतेचा आवाज हलक्या हळूवार खालच्या पट्टीत ( तिच्या नेहमीच्या तुलनेने) आपल्याशी गूज करतो. पियानो व आवाज एकमेकांशी खेळतात व मागून व्हायोलिन्सचा संच रंग भरतो आहे चित्रात.
कडवे संपायच्या आधीच्या ओळी नीट ऐका ती कश्या जोडून घेते.
ठेका अगदी साधा आहे. पियानो व व्हायोलिन्सचा सर्व खेळ आहे. गाण्याचे चित्रीकरण बघितले तर अतिशय विनोदी आहे. प्राण किंवा जॉय मुखर्जी हा काय चॉइस आहे? मी ते दूर ठेवून माझ्या मनातली चित्रे बघते नेहमी. मनातली सबकाँशस आंदोलने व्हायोलिन्सचा संच व्यक्त करतो. वरची खुशीची पखरण पियानो ने केली आहे. व सर्वाला तारून एक सुरेख दागिना बनतो तो त्या आवाजाने.
बरेच वेळा स्त्रीला आपल्या मनातले सांगता येत नाही पण आत भावनांचा कल्लोळ माजलेला असतो
ह्या परिस्थितीचे प्रतिबिंब ह्या गाण्यात दिसते. आपले भवितव्य घडते आहे. मनात शंका आहेत पण आनंद पण आहे. दोलायमान अवस्थेत ती आपल्या भावना व्यक्त करण्याच प्रयत्न करते आहे.
आजकालच्या टेक्स्टींगच्या व व्हॉट सॅप इमोजीद्वारे व्यक्त होण्याच्या इमोशनली कॉन्स्टिपेटेड जमान्यात असले गोड गाणे ऐकायचे म्हणजे भावनांचे एक अजब मधुर कॉकटेल घुटक्या घुटक्याने पिण्यासारखे आहे. कधी एखाद्या अंधार्या रात्री रत्नखचित आकाशाखाली आपल्या जिवलगाच्या खांद्यावर मान ठेवून जरूर ऐका. चांद जमींपर आ जायेगा...
अश्विनी खाडीलकर.