एकटी

एकटा , एकटी किंवा एकटं असणं ...अशा असण्यात खूप सामर्थ्य दडलंय. एकट्याला दुकटं असल्याशिवाय आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही असा समज पूर्णतः चुकीचा आहे. आयुषातले अनेक महत्वाचे निर्णय किंवा जाणीवा आपल्यात मुरतात त्या आपण एकटे असतांना. स्वतःच एकटेपण नीट उपभोगता आलं पाहिजे;ते जमलं नाही तर एकटेपणा बोचतो..

माझ्या पिढीतल्या अनेक जणांना double income families चे तोटे आणि फायदे अनुभवायला मिळाले. शाळेतून घरी आल्यावर, शेजारून किल्ली घेऊन घर उघडायची जवाबदारी काहींना सांभाळावी लागली.
मला तसं ते किल्लीने दार उघडून घरात येणं खूप आवडायचं. आमच्या घरात एवढी शांतता एरवी कधीच अनुभवायला मिळायची नाही. एरवी आमच्या सगळ्यांचं असणारं घर , तेव्हा फक्त माझं असायचं.घरात शिरल्यावर सगळ्या खोल्यांमध्ये फिरून, बाबांची आदल्या दिवशीची कात्रणं, स्वैपाक घरातले सगळे डबे उघडून बघणं, ताई दादांचे कप्पे पडताळून पाहणं, त्यांच्या वाचनातली पण माझ्या आवाक्याबाहेरची पुस्तकं चाळून बघणं , मला फार आवडायचं. डब्यातला शेवटचा उरलेला चिवडा , खारीचं बिस्कीट, ताई -दादांबरोबर Share न करता खाऊन टाकायला आवडायचं. तो घरातला एकटेपणा खूप रम्य होता , त्या मध्ये कधीच भीती नव्हती. त्या रम्यपणातूनच खूप नंतर कधीतरी माझ्या "निळाई आणि पसारा' ह्या एकांकीकेतल्या नायिकेचा जन्म झाला. स्वतःची ओळख करून देताना ती म्हणते ," कधीतरी लहानपणी मी मला वाटणाऱ्या गोष्टी आकाशाला सांगायला लागले. मी शाळेतून घरी यायचे , कुलूप उघडायचे, चहा करायचे आणि गच्चीत जायचे.आणि कशी कुणास ठाऊक ? मला सवयच लागली आकाशाशी मनसोक्त गप्पा मारण्याची.नंतरही माझ्या स्वप्नात घोड्यावरचा राजपुत्र आला नाही असं नाही . पण मला कायमच आकर्षण होतं ते माझ्या वरच्या मला गिळून टाकणाऱ्या निळाईचं ." असा तो रम्य एकटेपणा, उसंत, स्वस्थता देणारा. तो अनुभवल्यामुळेच ज्यावेळेला त्याचं बोचरंरूप समोर आलं तेव्हा ते जास्त बोचलं....

दहावी नंतरच्या उन्हाळ्यात अचानक माझे आजोबा, वडिलांचे वडील, heart attack ने गेले. ते सत्त्यांशी वर्षांचे होते पण चिरतरुण म्हणतात तसे. Massage therapist असणारे नाना , वयाच्या सत्त्यांशी वर्षी सुद्धा दिवसाला २-३ Patient ना मसाज करत, १०० जोर मारून दाखवत.. गेले त्याच्या आधी तास दीड तास त्यांनी तसाच मसाज केला होता. ते जायच्या आधी आठवडा -दीड आठवडा मी rock climbing करताना पडले , म्हणून त्यांनी रोज रास्तापेठेतून कोथरूडला येऊन मला मसाज केला होता. मी बरी झाले आणि पुन्हा हिंडा-फिरायला लागले, आणि नाना भेटायला बोलवत असूनसुद्धा , त्यांना न भेटता अलिबागला गेले. परतीच्या प्रवासात कळलं ...नाना गेले. नंतरचा महिना, आई बाबांच्या नोकरी- कामांमुळे, ताई -दादा दिल्ली, मुंबईत असल्यामुळे ,त्या रास्तापेठेतल्या घरात मी बरेचदा एकटी असायचे. मनात , स्वतःचा स्वार्थीपणा आणि त्यांना न भेटल्याची खंत सतत खात असल्यामुळे -हा एकटेपणा मनाला बोचणारा होता. तेव्हा पहिल्यांदा वाटलं की , ज्या प्रश्नांची उत्तरं आपण एरवी टाळतो ते प्रश्न एकटं असल्यावर भेडसावतात-त्यांच्यापासून लपता येत नाहीत. १५ -१६ वर्षाचे असताना सगळं जग स्वार करण्याचा फसवा आत्मविश्वास असतो . आयुष्यचक्र, मृत्यू ह्याचा विचार केलेला नसतो .. नानांची कधी माफी मागता आली नाही - पण ते गेल्यानंतरच्या एकटेपणात मी मोठी झाले.

अमेरिकेत दुकटी होऊन आले पण माझ्या दिनचर्येत एकटेपणाच मांडलेला होता. दुपारच्या जेवणाला घरची प्रकर्षाने आठवण यायची. आई रात्र महाविद्यालात शिकवत असल्यामुळे आमच्याकडे दुपारचं जेवण साग्रसंगीत,एकत्र , गप्पा मारत जेवायची पद्धत होती. नव्वद टक्के वेळेला आई माझ्या आवडत्या, परतलेल्या, गरम गरम,भाज्या पानात वाढे. कॉलेज मध्ये जेवणाच्या वेळी अड्डा जमे, नंतरही कधी एकटं जेवणं मी फारसं अनुभवलेलं नव्हतं.अमेरिकेत घरात घड्याळाची टिक टिक मंदिराच्या घंटे सारखी कानात घुमत राही . लोकांची वर्दळ नाही , सतत बेल नाही, घरात फोनची ट्रिंग ट्रिंग नाही , निकित शिवाय मला कुणाचा फोन यायचा नाही; चिडीचूप शांताता असायची.निकीत धपा धप त्याचे Phd चे units संपवण्याच्या मागे होता,sandwich वगैरे खाऊन त्याचं जेवण व्हायचं .पण मी stanford ला आल्यावर त्याला जमेल तेव्हा आम्ही एकत्र जेवायला भेटायचो. काही दिवस मी अगदी स्वतःला stereotypical immigrant brideच्या भूमिकेत बसवलं होतं. घरापासून लांब, उठून कुठे office, university मध्ये जायचं नाही , भेटी गाठी घायायला ओळखीचे लोक नाहीत, कशाचच routine नसल्यामुळे ह्या एकटेपणात बुडून, निकीतकडे रडगाणं गाण्याची तयारी पण मी केली होती. पण मग डोक्यातल्या चक्रात एक खडा अडकला.
हायदराबाद जवळच्या खेड्यातून लग्न करून आलेली एक मुलगी, सुमित्रा, माझी मैत्रीण झाली. लग्नाआधी ती दोनदा तिच्या नवऱ्याला भेटली होती, कधी घराबाहेर राहिली नव्हती. स्वैपाक फारसा येत नव्हता, म्हणून तिच्या आईबाबांनी Roti Maker पाठवला होता, पण त्यातल्या पोळ्या नवऱ्याला आवडत नव्हत्या. मला भेटल्यादिवशी ती मला त्यांच्या स्टुडीओ apartment मध्ये घेऊन गेली. "आटा बना के दिखाओ" म्हणाली म्हणून कणिक भिजवून दिली.तिला विचारलं," तुम्हे फ्रेश रोटी खिलाऊ क्या?" तर तिच्या डोळ्यात पाणी तरंगलं. अमेरिकेत पहिल्यांदाच मी दुपारी पोटभर जेवले असेन.

सुमनशी ओळख झाल्यावर जाणवलं रिकामटेकडापण माझ्या एकटेपणाला बोचत होता. एक जग सोडून दुसरया जगत पदार्पण केलेल्या कुणालाच, रिकामटेकडपणाचे सोंग घेऊन चालत नाही.. मग नवीन जगाची ओळख कशी होणार? आणि मुख्य म्हणजे त्या जगात स्वतःची ओळख कशी प्रस्थापित करणार? मी अनुभवलेला थोडासा रितेपणा, immigrant म्हणून आलेला एकटेपणा - हेच माझं qualification होतं. मला International Spouse Center मधला पहिला Job म्हणूनच मिळाला. community associate म्हणून काम करताना मी इतरांशी ओळख असो , नसो, संवाद साधू शकले. इतर अंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटताना, प्रत्येकाच्या मनात दडलेला मायदेश, आणि ह्या नवीन जगातलं स्थान शोधत असताना, वाट्याला आलेला एकटेपणा हाच आमच्यातला दूआ होता. नवीन भेटणाऱ्या ह्या लोकांमध्ये काही सगळेच वाहणाऱ्या मायेचे झरे नव्हते. कामापुरतेच बोलणारे, सांस्कृतिक आणि भाषेच्या सीमेपलीकडे न पाहू शकणारे, माझ्या भारतीय इंग्रजीला न समजू शकणारेकिंवा प्रयत्न सुद्धा न करणारे, अंतरर्ष्ट्रीय विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबीय पण भेटले. अशा वेळेला उगाच आपणच चुकतोय, कमी पडतोय असं वाटायचं -पण इतकं प्रकर्षाने ही नाही की स्वतःला बदलून टाकावस वाटेल. ज्यांच्याशी ओळखी झाल्या त्यांच्याशी नेहमीच wavelength जुळेल असं नाही झालं. काहीही वेळेला भाषिक, सांस्कृतिक context translate नाही करता येत. त्यामुळे ह्या नवीन नात्यांमध्ये एकमेकांबद्दल न कळलेले vacuum pockets आड आले . घट्ट मित्र मिळेपर्यत वाटलेला एकटेपणा स्वतःला तपासण्यात गेला..

आता मागे वळून पाहताना वाटतं - तो एकटेपणा नव्हताच - नवीन अवकाशात उडी घेताना, मनाला , बुद्धीला, नवीन दृष्टिकोनासाठी सक्षम करायला , तो मिळालेला मोकळा अवकाश होता. ह्या देशात राहत असताना एकटेपणाची एक लकेर सतत साथ राहणार ह्याची जाणीव करून देणारा काळ होता.

कामासाठी बरेचदा प्रवास करायला लागतो , निकीत जातो, तेव्हाचा एकटेपणा - वाट बघण्यात जातो. त्याला एक start आणि end date असते, तो मनात फारसा झिरपत नाही. पण हव्या हव्याश्या भौगोलिक गोष्टींपासून लांब असल्यामुळे वाटणारा एकटेपणा जाणवतो. अशावेळेला दोन्ही आया, पुण्यातली घरं, मित्र मैत्रिणी, रुपालीतली medium strong ग्लासातली कॉफ्फी आणखीनच हवी हवीशी वाटते.

आई झाल्यावर कळलेला एकटेपणा खूपच वेगळा आहे. ह्या एकटेपणात आळस आहे, शांत पाय वर करून झोपावं असं असताना - कॉफ्फी shop मध्ये बसून large strong coffee पिणं आहे, 'आई' म्हणून व्यापून टाकणारी स्वतःची ओळख थोडा वेळ बाजूला सारून, बायको , मैत्रीण, बहिण, मुलगी, आणि 'स्व'' चा पुनर्विचार आहे..ह्या एकटेपणात खूप आत्मनिरीक्षण आहे.

( हा लेख ब्लॉगवर पूर्वप्रकाशित :
http://amrutahardikar.blogspot.com/2017/12/blog-post.html)

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle