पैसा आणि मानमरातब नात्यात आला कि नात्यांच्या झाडाला इजा होतेच, त्याची मुळे सैल होतातच. आणि मग या झाडाला आवश्यक असणारी प्रेमाची माती, जिव्हाळ्याचे पाणी आणि आपुलकीचे क्षार कितीही प्रयत्न केला तरी ह्रदयाच्या गाभ्यापर्यंत पोहचत नाही.
निस्सीम प्रेम, आपुलकी यांच्या जोरावर परक्यांनाही आपलंस करता येत, पण… पैसा नसेल तर आपलेही परके कधी होतात समजत नाही. किती विचित्र आहे माणसाचं वागणं? “भौतिक सुखाच्या गारपिटीसाठी नाती तोडणारी माणसे आणि किंचितशा प्रेमाच्या शिड्काव्यासाठी नाती जोडणारी माणसे” यामध्ये हाच तर फरक असतो. हेतुपुरस्य नाती कधीच टिकत नाहीत, त्यांचा आधारच स्वार्थ असतो.
पैसा, सत्ता, ताकद डोळ्यांना सुखावणारा गोष्टींना जीवनाचं फळ मानल जातं पण याच फळासाठी नात्यांच्या मुळावर घाव घालू पाहणारे लोकही काही कमी नाहीत! किती विरोधाभास? फळासाठी मुळालाच इजा केली जाते आणि मग सगळंच कोमेजून जातं. कसं टवटवीत राहील म्हणा! मुळाचा आणि मातीचा संबंधच राहिला नाही तर? आणि ….मिळालेली, साठवून ठेवलेली फळे मग आयुष्यभर कुढत तरी खावी लागतात नाहीतर न खाताच इथेच ठेवून जावी लागतात ….अगदी कायमची….!!!