मार्गारेट अॅटवुडचं 'द हँडमेड्स टेल' वाचलं. फार फार आवडलं. पण प्रचंड अस्वस्थ करून गेलं.
एकतर ते वाचणं त्यातल्या आशयामुळे त्रासदायक आहे. एका ख्रिस्ती मूलगामी पंथानं ताब्यात घेतलेली अमेरिकन संघराज्यं आणि त्यांच्या तथाकथित बायबलप्रणित व्यवस्थेतलं बाईचं भयावह स्थान असं एकोळी सूत्र सांगता येईल. हे सत्तांतर होण्यापूर्वीच्या जगात मूल जन्माला येणं ही कमाल अप्रूपाची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे गाभण राहू शकणार्या स्त्रिया ही एक मूल्यवान वस्तूच आहे. अशा काही मोजक्या स्त्रिया चर्चनं आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यांना हँडमेड्स म्हटलं जातं. उच्चाधिकारिवर्गासाठी त्या लैंगिक गुलामगिरी करतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ते न घेण्याचा पर्याय कागदोपत्री अस्तित्वात आहे. पर्याय आहे कॉलनीजमध्ये काम करणं. तिथल्या भयानक दूषित वातावरणातला कचरा साफ करताना लवकरच मृत्यू येईलच. अधिकारिवर्गाच्या पत्नींसाठी आयुष्य तसं थोडं बरं आहे. आपल्याला मिळालेल्या हँडमेडचे हात धरून मागे बसणं आणि नवर्याकरवी तिच्यावर बलात्कार करवून घेणं, अशी एक सवलत त्यांना आहे. इतर घराची देखभाल, घरकामाच्या बाया, नोकरचाकर आणि हँडमेड्स यांच्यावर देखरेख ही कामंही आहेत. वाचनलेखन मात्र कोणत्याही स्त्रीला निषिद्धच आहे.
अशा राजवटीतल्या एका हँडमेडची ही गोष्ट. एका की अनेक? ठाऊक नाही. ही राजवट कशी संपली? ठाऊक नाही. त्या मुलीचं काय झालं? ठाऊक नाही. आपल्याला या राजवटीतल्या या भयानक आयुष्याचा एक तुकडा दिसतो बस.
पुस्तक वाचल्यावर मालिकाही पाहिली. ती आजही आपली धारदार धमकी घेऊन उभी आहे. त्यामुळे ती बघणंं अजूनच त्रासदायक. ती पाहताना केलेल्या या नोंदी.
***
- क्रौर्याच्या नाना परी आहेत यात. शारीरिक तर अनंत. गुरांसाठी वापरण्याच्या यंत्रानं विजेचा धक्का देण्यापासून ते हात-पाय-डोळे काढण्यापर्यंत आणि स्त्रीचा शारीर आनंद हिरावून घेण्यासाठी गुप्तांग चिरण्यापासून ते फाशी देण्यापर्यंत. बलात्कार तर वैध आहेच (जसा भारतात नवर्यानं बायकोवर केलेला आहे तसाच); खेरीज वाचण्यापासून ते मेकपपर्यंत अनंत गोष्टींवर बंदी आहे. मानसिक छळ आहेत नाना. तरीही सगळ्यांत जास्त संतापजनक वाटतं, ते पुरुषानं स्त्रीला पेट्रनाइज करणं. संतापानं रडू येतं, हिंसा उफाळून येते अंगात. आश्चर्यकारक आहे हे, पण दिलासादायकही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणिचा असाही आविष्कार.
- स्त्रीच्या शरीरावर कधी कुठल्या धर्मात अधिकार होता तिचा, म्हणून हे समोर दिसणारं मला इतकं भयावह वाटतं आहे? सगळंच तर कुठे ना कुठे घडलं आहे, घडतं आहे. इस्लामी अत्याचारांचा गाजावाजा अधिक अमेरिकी कृपेनं. पण अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देणारे हिंदू काय, शरीरसंगाला पाप मानणारे ख्रिस्ती काय आणि स्त्रीला मोक्षाच्या वाटेतली धोंड मानणारे बौद्ध काय. सगळेच एकजात मूर्ख आणि क्रूर. तरीही या सगळ्या अत्याचारांना तोंड देत स्त्रीचं आयुष्य नाना प्रकारांनी बहरत राहिलं आहे. त्यातलं नक्की काय नि कसं खुडल्याचं दाखवलं आहे अॅटवूड आजींनी, म्हणून माझ्या अंगावर भीतीचा हा असा काटा फुलतो आहे वारंवार? छळाची संस्थात्मकता? ती तर कायमच होती. सर्वधर्मीय अत्याचारांची सर्वंकष व्यापकता? नक्की काय? मला काही केल्या हे उत्तर सापडत नाही. आणि पडद्यावरचं वास्तवच आम्ही - आपण जगत आलो आहोत, फक्त जगताना त्यातली भीती नजरेआड केली आहे जगण्याच्या जैविक प्रेरणेनं, हेच उत्तर वारंवार सापडत राहतं. त्यापासून सुटका होत नाही. घाम फुटतो, शरम वाटते. भीती वाटते अधिकच. प्राणांतिक. जगण्याच्या लालसेनं होऊ शकणार्या आपल्या अधःपाताला नसलेल्या सीमा पाहून.
- ट्रम्प आणि मोदी आणि तालिबानच्या युगात आहोत आपण. बाई म्हणून असलेलं माझं स्वतंत्र अस्तित्व आहे असंच राहील असं मानण्याची सवलत नसण्याच्या काळात. आत्तापावेतो भोवंडून टाकणार्या भीतीला इथे आणखी अणकुचीदार टोक फुटतं. झोपेतून दचकून जाग येण्याइतपत.
- Margaret Atwood या बाई भयानक आणि भयानक द्रष्ट्या आहेत.
- रशियाई दिग्दर्शक झ्यागून्स्कीचा Loveless पाहिला इतक्यात. आधुनिक जगातलं आत्मलोलुप जगणं, युद्धं, दुःखं, एकटेपणा, स्पर्धा, प्रेमविहीन नाती इत्यादी गोष्टींच्या पार्श्वभूमीवरचं एक घटस्फोटाच्या उंबऱ्यावरचं जोडपं आहे त्यात. एकमेकांबद्दल विषारी झालेलं. त्यांचं एक जहरी भांडण ऐकून त्यांच्या १२ वर्षांच्या मुलानं केलेला अंधारातला मुका एकाकी आक्रोश अंतर्बाह्य हादरवून टाकतो. ते मूल एका भांडणानंतर गायब होतं घरातून, ते आईला कळायलाही दोन दिवस जातात. मग पोराचा शोध आणि पार्श्वभूमीला जगण्यातला अंतहीन दिशाहीन विखार. हाडं फोडणारी थंडी, उदासवाण्या बर्फाच्या संततधारा, ओस पडलेल्या इमारती... अशा, संथपणे अंगावर चालून येणाऱ्या, दाहक, भेदक चौकटी. The handmaid's tale पाहताना माझ्या डोक्यात Loveless ही जागा होता. आहे. The handmaid's tale मध्ये Gilead-पूर्व जगाचे - 'before'चे - संदर्भ जागोजागी येतात. आपलं आज-आत्ताचं जग हे टीव्ही मालिकेतलं before-जग आहे. त्यात किती दुःखं, किती तिरस्कार, किती अन्याय, किती असुरक्षितता होती... याचे दाखले गिलियडमधले सत्ताधारी पदोपदी देत असतात. निदान काही जणांना तरी ते पटतच असतं. त्यांच्या दृष्टीनं before जगातल्या दुःखांचं निराकरण करण्याचा मार्ग हा जुन्या धर्माचरणाकडे परत जाणं हाच आहे. मग त्यात काही जणांवर टोकाचा अन्याय असेना का. Greater good, जगाचं भलं, समाजाचं हित इत्यादी साधण्यासाठी 'काही जणांचा' त्याग रास्तच आहे. ओळखीचं वाटतंय ना हे खूप? एखाद्या भीषण, किळसवाण्या जनावरानं थेट तोंडावर उच्छ्वास सोडावा आणि आपल्याला भयचकित होऊन जाग यावी तसं? I know. तर - loveless मधल्या भीषण, हादरवून सोडणाऱ्या परिस्थितीला कदाचित एकच कुणी जबाबदार नसेलही. भांडवलशाही, युद्धखोरी, निसर्गाला अंतहीन ओरबाडत सुटणं, आध्यात्मिकतेपासून दूर जाणं... या सगळ्याचे एकत्रित परिणाम असतीलही कदाचित. एकेकट्या व्यक्तीच्या वा संस्थेच्या आवाक्यापल्याडचे. पण अशा गुंतागुंतीच्या परिस्थितींमध्ये दोषाचं टेपर ठेवायला कायमच काहीतरी सोपं उत्तर समाजपुरुषाला हवं असतं हे आपण पुन्हा पुन्हा पाहिलं आहे. त्यागासाठी कुणीतरी बकरा लागतो हेही.
बाया कायम होत आल्या आहेत अशा गाई. इतिहास साक्षीला आहे. गोधन आणि बाया - एकच. पळवा आणि दावणीला बांधा. पळवा आणि बलात्कार करा. पळवा आणि वस्त्रहरण करा. शत्रूला नामोहरम करण्यासाठी वापरण्याची शत्रूची मालमत्ता म्हणजे बाया. स्थलकालातीत पुनरावृत्ती होत आली आहे या उत्तराची.
Loveless ची परिणती The handmaid's tale मध्ये होणार नाही कशावरून? जगाचा अंत की अर्ध्या लोकांनी करण्याचा 'माफक' त्याग? किती सोपी आहे ना निवड भल्याभल्यांसाठीही? बाई म्हणून माझा पॅरानॉइया असेल हा. तर असो. असोच...
