नैनिताल्हुन परत आले आणि विचार करू लागले खरंच कशासाठी गेलो होतो ? एरवी आपण फिरायला जातो ते मजा आणि चैन करायलाच ना! मग केली मजा तर काय बिघडलं… इत्यादी इत्यादी हे खरंतर उतू जाऊ द्या वर लिहायच होतं पण लिहीता लिहीता लक्षात आलं की अगदीच सगळं काही वैताग आणणारं नव्हतं चांगल्याही गोष्टी झाल्या आणि ते इतकं मोठं झालं की शेपरेट लेखच झाला.
त्याचं असं झालं की माझी मैत्रीण एका शिबिराला गेली होती. मलाही तिथे जायची खूप इच्छा आहे पण पर्यटक म्हणून नव्हे तर तिथे निवांत राहायला जायचं आहे किंवा एखाद्या शिबिराला ! पण तेव्हा पिंपळदला होते म्हणून शक्य झाले नाही. तर ती म्हणाली नैनीताला शिबिर आहे तेही शिबिर छान असतं व वक्त्या पण चांगल्या आहेत. हिमालयात कुठेही कधीही, केव्हाही जायला एका पायावर तयार असणारी मी! ही तर चांगलीच संधी होती पण अध्यात्म, उपनिषद वैगेरे काही आपला प्रांत नाही सगळं डोक्यावरून जाईल. जाईल तर जाईल, इथे कोणी परीक्षा घ्यायला थोडीच बसलंय! हिमालयाच्या कुशीत निवांत राहायला जाऊ असा विचार करून लगेच तिकीट आरक्षित केली. नैनितालला जवळपास तीस वर्षांपूर्वी गेलो होतो. त्यानंतर पूर्व पश्चिम बहुतेक सगळा हिमायल बघून झाला असला तरी हिमालय नेहमीच साद देत असतो! आसामामधलं काम आटपून, थोडी भटकंती करून मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते काठगोदाम, काठगोदाम ते नैनिताल असा पूर्व,पश्चिम,उत्तर त्रिदिशांचा तीनटोकांचा प्रवास. पुण्याहून चाळीस पंचेचाळीस जणांचा ग्रुप त्याच ट्रेनने जुन्या दिल्लीतून चढला व आम्ही आधीच दिली क्यॅन्टहून. काठगोदामला सगळे शिबिरार्थी उतरल्यावर पाहिलं तर एक आमच्याच बिल्डिंगमध्ये पूर्वी राहणार्या जोडप्याशिवाय सगळेच अनोळखी. काठगोदामला आम्हाला घ्यायला गाड्या आलेल्या होत्या. आम्ही कुठल्या ग्रुपबरोबर नसल्याने ज्यात जागा मिळेल त्यात कुठेही बसून जाऊ विचार करत लोकांची लगबग न्याहाळत होतो. मेरा नंबर कब आयेगा! अखेर एका गाडीत मागच्या सीटवर जागा मिळाली त्यानंतर दोन बायका चढल्या त्या तणतणतच... हे काय आमचा ग्रुप तुटला... तोडायचं होतं तर ग्रुप कशाला बनवले. आम्हाला मागे बसावे लागतेय... इत्यादी इत्यादी.. आध्यात्मिक शिबिराची सुरुवात :) नैनिताल ते आश्रम दीड तासाचा सुंदर घाटदार प्रवास! देवदार, पाईन वृक्षराजीतल्या निसर्गरम्य प्रवासाने आधल्या रात्रीच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळाला. आश्रमात पोचलो. अतिशय सुंदर, निसर्गरम्य जागा पाहून मन प्रसन्न झाले. निरभ्र आकाश, हवेत सुखद गारठा! हिमालय वेड लावतो अक्षरशः ! जन्नत यही है, यही है, यही है! किती फोटो काढू न किती नाही… असं झालं. पण पुढचे कार्यक्रम वाट बघत होते...
शिबिर म्हणजे डॉरम्याटरी अशी केंद्रीय कल्पना होती पण इथे प्रत्येक जोडीला अट्याच टॉयलेट रूम ! अंघोळ, जेवण खाणं छाया चित्रण करून आराम करायचा विचार करतो न करतो तोच थडथड आवाज येऊ लागला. खिडकी बाहेर डोकावलो तर मस्त गारांचा पाऊस सुरू झाला होता. परत फोटो, व्हिडिओ सत्र सुरू झालं ….. एकाच दिवसात निसर्गाच्या विविध छटा, अनोखी रुपं बघायला मिळणं निव्वळ रोमांचकारी!
संध्याकाळी ओळख कार्यक्रम झाला. काहीजणं पूर्वीही इथे येऊन गेली असल्याची माहिती ओळखीतून कळली. बरीच मंडळी गीता अभ्यासक होती तर काही संथा देणारीही होती. अपवाद आम्हीच होतो बहुतेक. आयोजकांनी काही ‘करा’ ‘न करा’ ची यादी वाचून दाखवली तसेच सहा दिवसातल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सकाळी योग/प्राणायाम, दोन प्रवचने/व्याख्याने. संध्याकाळी ध्यानाचं विवेचन व अर्ध्या तासाचे ध्यान! आssणि मधल्या वेळेत स्थलदर्शन!.
नमनाला घडाभर घालून झालं …..
आता हे फक्त उतू जाऊ द्या… चिडचिड किंवा त्रास करून घेतला नाही पण आपण सुजाण किंवा सुसंस्कृत नागरिक कधी होणार? नियम मोडण्यासाठीच असतात का? असे अनेक प्रश्न पडले..
१) प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी निवेदक आपला स्वतःचा फोन काढून प्रात्यक्षिक दाखवून फोन बंद किंवा फ्लाईट मोडवर आहे की नाही खात्री करून घ्यायला सांगत होते. तरीपण ध्यानाच्या वेळेला भ्रमणध्वनी बंद किंवा फ्लाईट मोडवर न ठेवता, व्हायब्रेटवर टाकलेला फोन गुरुगुरु लागला. दुसर्या दिवशी एका बाईचा पर्सच्या पसार्यात हरवलेला फोन खणखणू लागला. झोप आली तर डोळे उघडायचे जेणेकरून झोप लागणार नाही, घोरणार नाही अशी सूचना तिसर्या दिवशीही दिल्यानंतर एकजण लयीत घोरत होता. त्याचे डावे, उजवे, मागचे,पुढचे शेजारी इतके ध्यानमग्न होते की त्यांनी त्याला हालवायची तसदी घेतली नाही. ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी येऊन शांत बसावे. पण काही बडबड करणार्यांना शांत बसा, शांत बसा, असं आणखी चार जणं हे बोलून अजून कोलाहल वाढवायला मदत करत होते.
२) उपासाच्या पदार्थांची सोय होऊ शकणार नाही! आणि अगदी त्याचदिवशी वक्त्यांनी (योगायोगाने की मुद्दाम) उपवासाचा अर्थ सांगितला होता. बायकांनी साबुदाणा, दाणे, दही आणून स्वयंपाक घराचा ताबा घेऊन, बनवलेली साखि, बभा व सोबत आणलेल्या कोरड्या फराळाचा कृतार्थ भावनेने आस्वाद घेत चतुर्थीच्या उपासाचे पुण्य पदरात पाडून घेतले.
३) स्थल दर्शनाकरिता सहाजणांचा गट बनवून जा! प्रवचनात ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘हे विश्वची माझे घर’ ह्या संकल्पना सांगितल्या होत्या. पण अर्ध्या तासाच्या प्रवासाकरिता आपलं कुटुंब सोडायला काहीजण तयार नव्हते.
४) ह्याच आश्रमाचा उपविभाग दुसर्या ठिकाणी होता. तिथे गेल्यावर तिथल्या प्रमुखांनीही करा व नकराच्या सूचना दिल्या त्यात शांतता व मौन हे प्रमुख होते. मौन म्हणजे काय रे भाऊ?
५) हे उपविभाग ठिकाण अतिशय निसर्गरम्य तर होतंच पण तिथल्या फुलांनी डोळ्याचे पारणे फिटले ही उपमा फिकी वाटेल अशी तिथली बाग होती. क्यामेर्यापेक्षा डोळ्यात साठवून घ्यायची सूचना धुडकावून लावून छायाचित्रणाची, सेल्फीची हौस अनेकांनी भागवून घेतली.
बायकांना सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडून विणकाम शिवणकाम करवून स्वेटर, शाली, पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यांच्याशी अशक्य घासाघीस करून वस्तू कमी किमतीत घेतल्याचा आनंद घेत असता जेव्हा तिथल्या प्रमुखांना कळलं तेव्हा त्यांनी त्यापाठीमागचा उद्देश्य सांगितला व अत्यंत नम्रतेने सूचित केलं केलं की ज्यांना शक्य असेल त्यांनी मूळ किंमत द्यावी किंवा परत कराव्या. फार थोड्या लोकांनी मूळ किंमत दिली व बाकीच्यांनी परत केल्या. एका प्रवचनात ‘तेन तक्तेन भुजिंथा मा गृध कस्य स्विध्दनम्’ भोग घ्या पण त्यात त्याग असावा असं निरूपण करून झालं होतं.
हे खूप नकारात्मक वाटतंय ना ….. पण तसं नाही हं पण आध्यात्मिक शिबिराच्या अपेक्षेला थोडा धक्का नक्कीच बसला. जिथे गेलो आहोत तिथले नियम पाळणे कठीण काम आहे का? ज्ञानामृत, बोधामृत नितीमत्तेचे व चांगुलपणाचे धडे देणारी कायप्पा विद्यापीठ किंवा इतर तत्सम यंत्रणा स्वामी, महाराजांची प्रवचने ह्या सगळ्याचा खरंच सामाजिक जीवनात, व्यवहारात परिणाम का दिसत नाही ? कायप्पा मेसेज म्हणजे ब्लाऊज पिस ओन्ली फॉरवर्ड ज्याचं ब्लाऊजमध्ये कधी रुपांतर होत नाही. तसंच मेसेजेसचं आला की लगेच ताबडतोब सरकवं पुढच्याला… आणि समजा वाचला तरी आचरणात आणायचा असतो का ? असो!
ह्या सहलीत निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला, व्याखाने/प्रवचने उत्तम झाली. वक्त्यांची वकृत्वशैली रसाळ व ओघवती होती. श्रवणानंद घेतला, उपनिषदाची तोंडओळख झाली, योग शिक्षक जाणकार होते सहा दिवसात ‘अपेक्षित वीस’ आसनं व प्राणायामाची ओळख करून दिली. नवीन आसने, प्राणायामाचे प्रकार शिकायला मिळाले, यशोधर मठपाल ( ह्यांच्या बद्दल नंतर लिहीन) सारख्या योगी, मनस्वी कलाकाराला भेटलो, त्यांची पेंटिंग्ज त्यांच्याचकडून समजवून घेता आली, साधं पण रुचकर जेवणानंद घेतला, खूप वर्षानंतर ट्रेकानंद घेतला, नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या… आणि हो, प्रसारमाध्यमाचा उपास… अश्या अनेक चांगल्या वाईट अनुभवाची गोळा बेरीज करता चांगल्या अनुभवांच पारड नक्कीच जड झालं होतं …… चित्रात बघितलेला अजुन एक हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला अतिशय सुंदर रायवळ आश्रम ज्याने मनात घर केले आहे, त्याला भेट द्यायची स्वप्न बघतच परतीची वाट धरली ..
चित्रकार यशोधर मठपाल
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle