आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण

इथे एवढ्यात बर्‍याच मैत्रिणींनी युरोप-स्विस भटकंतीबद्दल प्रश्न विचारलेले दिसले, मग प्रत्येक वेळी ब्लॉगची लिंक देण्यापेक्षा इथेच मैत्रिणींसोबत लेख शेअर करूयात असा विचार केला. ही लेखमालिका लिहून आता ४ वर्ष होतील, पण सगळ्या सहलींमध्ये ही सगळ्यात जास्त आठवणीत राहिलेली. म्हणून हिने श्रीगणेशा :)

जर्मनीत आल्यापासून जवळपास सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि अजून कुणी ओळखीचे यांच्याकडून एक ठरलेला प्रश्न असायचा, "स्वित्झर्लंडला जाउन आलात का?" "नाही गेलो अजून" असे म्हटल्यावर पुढचा प्रश्न, "का नाही गेलात अजून" किंवा "कधी जाणार मग" किंवा "किती वेळ लागतो तुमच्या इथून" इत्यादी इत्यादी. "झुरीच ट्रेनने तीन साडेतीन तास, सगळं तसं पाच सहा तासांच्या आत" हे उत्तर ऐकल्यावर तर समोरच्याचे हावभाव जणू काही आम्ही 'स्विसला गेलो नाही म्हणजे घोर पाप केले' असे असायचे. मग इकडे जा, तिकडे जा असे कधी प्रेमळ सल्ले तर कधी खवचट उपदेश मिळायचे आणि आम्ही माना डोलवायचो. स्वित्झर्लंड सुंदर आहे यात वाद नाहीच. जायचे नव्हते असेही नाही. पण इथे राहतोय म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' च्या रेल्वे स्टेशन ला भेट दिलीच पाहिजे असेही नाही ना? शिवाय इतरही अनेक कारणं होती की ज्यामुळे आम्ही हे सो कॉल्ड घोर पाप करत होतो. दोन वर्षात जी जी भटकंती झाली. त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. इतर वेळी जसे सहज शनिवार-रविवारी किंवा चार दिवस सुट्टी आहे म्हणून फिरायला जायचो त्यापेक्षा जास्त दिवसांची ही सहल करावी असे डोक्यात होते. म्हणजे या सहलीला योग्य नियोजन हवे. शिवाय तिथली सार्वजनिक वाहतूक अगदी उत्तम असली तरीही गाडीने गेलो तर अजून मनाप्रमाणे भटकता येईल म्हणून पहिले काही दिवस त्यात गेले. त्यात मग ऐन गर्दीत तर अजिबात जायचे नाही, कारण नुसता चिवचिवाट असतो, त्यातही चीनी-जपानी वगैरे वगैरे तर इतके, की आपण कुठे आहोत असा प्रश्न पडावा. (हे लोक आणि यांच्या अदा हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल) शिवाय हवामान योग्य पाहिजे. ऐन थंडीत नको कारण आल्प्स मधीलच एक हिवाळी सहल आधीच झाली होती. सुट्टी पण मिळायला हवी. एक ना अनेक. एका सहलीसाठी कित्ती कित्ती त्या अटी असे वाटत असेल तर थांबा. अजून संपल्या नाहीत. स्विस म्हणजे अजून एक अति महत्वाचा मुद्दा, महागाई. स्वित्झर्लंडचे चलन आहे स्विस फ्रँक (CHF). त्याचे पुन्हा इतके युरो वगैरे हा हिशोब अशक्य, करायचाच नाही. पण पूर्वीच्या एका छोट्याशा सहलीत नुसती सीमा पार केली तर लागली दुपटीने किमती बदललेल्या पाहिल्या होत्या. आम्ही स्विस ला जायचा विचार करत आहोत असे सांगितले की ऑफिस मधल्या प्रत्येकाची पहिली प्रतिक्रिया यायची, खूप महाग आहे. दुसरं कुणी काही बोलायचेच नाही. आणि हा एक मुद्दा बाकीच्या सगळ्या मुद्द्यांशी निगडीत. जेव्हा जास्त पर्यटक तेव्हा महागाई अजूनच वाढणार. आणि या सगळ्या अटींच्या वरताण अशी नियोजन करणारी दोन डोकी (कोण म्हणून काय विचारताय), जी कधी युती करतील आणि कधी विरोधी पक्षात जातील हे राजकीय घडामोडींप्रमाणेच अनिश्चित. Wink सहलीला जायचे या मुख्य मुद्द्यावर अर्थात एकमत होते. तिथून पुढे मग उर्वरित घडामोडी सुरु झाल्या.

मग वरच्या काही अटी बघता सप्टेंबर चा शेवट ही वेळ नक्की झाली. ३ ऑक्टोबरला पूर्व पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाची सुट्टी आणि त्याआधीच्या जोडून इतर सुट्ट्या निश्चित झाल्या आणि कामं सुरु झाली. आता नवऱ्याच्या डोक्यात याच सहलीसाठी अजून काही गोष्टी बसल्या होत्या. इटली मधील प्रसिद्ध असा स्टेलव्हिओ पास (http://en.wikipedia.org/wiki/Stelvio_Pass) जिथे त्याला जायचेच होते. आणि असेच काही अजून स्विस-इटालियन आल्प्स मधील घाट. स्विसमध्येच बघण्यासारखे इतके काही आहे की आठ दिवस पुरेनात आणि तरीही स्टेलव्हिओ मार्गे जायचे यावर तो ठाम होता. मग याची जरा अजून माहिती काढली आणि "तू नीट गाडी चालवशील ना या अशा भयानक घाटातून" हे अनेकदा वदवून घेतले आणि होकार दिला. हुश्श. आता पुढे कुठे आणि काय काय बघायचे यासाठी आंतरजालावर शोध सुरु झाला. स्विस टुरिझमची अनेक संस्थळे, अनेक ब्लॉग्स वाचून काढले. काही पुस्तके वाचून झाली. आणि गोंधळ अजूनच वाढत गेला. कारण आठ ते नऊ दिवस हातात होते आणि सगळ्याच ठिकाणी जावेसे वाटत होते. चर्चा, वाद विवाद करत करत हेही हवे आणि तेही हवे असे सगळेच कसे होईल हे कळून चुकले. मग शेवटी एक आठवडा एकाच कुठल्यातरी मध्यवर्ती ठिकाणी राहून त्या भागात फिरायचे असे ठरले. इंटरलाकेनला तूर्तास मध्यवर्ती धरून तिथल्या हॉटेल्स शोधमोहीम सुरु झाली. शाकाहारींसाठी खाण्याचे पर्याय बघता आणि बाहेर सततच्या खाण्याचा खर्च बघता छोटे स्वयंपाकघर असेल अशी अपार्ट्मेंट बघायचे ठरले, इतर ब्लॉग्सवरील माहितीनुसार देखील हाच पर्याय सोयीस्कर वाटला. या भागातल्या अनेक गावात गाडी नेता येत नाही, पर्यावरणासाठी हानिकारक म्हणून. त्यामुळे ती गावं बाद झाली. शोधाशोधीत एक मनाजोगते ठिकाण सापडले, विल्डर्सविल (http://en.wikipedia.org/wiki/Wilderswil) या टुमदार खेड्यात. मेल लिहून विचारपूस केली आणि दुसऱ्याच दिवशी उत्तर मिळाले. या कालावधीत उपलब्ध आहे. झाले एकदाचे एक महत्वाचे काम. आता अजून या स्टेलव्हिओ मार्गासाठी दोन रात्रीची हॉटेल्स बुक झाली आणि पुढची तयारी सुरु झाली.

स्वित्झर्लंड म्हणजे अत्यंत स्वच्छ, शिस्तप्रिय लोकांचा देश. जगप्रसिद्ध स्विस घड्याळे आणि त्या घड्याळांच्या अचूकतेप्रमाणेच चालणारे लोक. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रीया आणि इटली हे शेजारी देश. सगळ्यांचीच काही सांस्कृतिक साधर्म्य तर काही भिन्नता. अधिक पुढच्या लेखांमध्ये येईलच. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्तम पर्यटन विकास. प्रत्येक स्थळाची योग्य माहिती इंग्रजीतून देखील उपलब्ध आहे. त्या ठिकाणाहून जवळ काय बघता येईल, कसे जाता येईल, गाडी नेता येते की नाही इ. त्यामुळे या सात दिवसात कुठे जायचे अशा ठिकाणांची यादी तयार झाली, सगळी माहिती एकत्रित केली आणि म्हणता म्हणता एक आठवडा उरला. सप्टेंबर तसा उन्हाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूची, पर्यायाने हिवाळ्याची सुरुवात. पण जर्मनीत आधीच थंडीने रंग दाखवायला सुरुवात केली आणि हवामान नेहमीप्रमाणे दगा देणार की काय ही शंका आली. या गोष्टीवर आपला इलाज नाही, हवामान भगवान भरोसे म्हणून तो विचार सोडून दिला. गाडीला हिवाळी टायर्स लावणे अत्यावश्यक होते. ते झाले. स्विस मध्ये जर्मनीतील गाड्यांना वेगळा कर भरावा लागतो. त्यासाठी लागणाऱ्या vignette ची खरेदी अनायासे पूर्वीच झाली होती. तिथे जाऊन निदान रात्रीचे खायला करता यावे म्हणून रेडी टू इट, मॅगी आणि इतर सामानाची खरेदी झाली. सामान भरताना वाटले की आपण खायला जातो आहोत की फिरायला. पण पोटोबाची सोय महत्वाची. :) थंडीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे हेही बूट, तेही बूट, हे जॅकेट, ते स्वेटर असे एकेक सामान वाढत गेले. दोन लोक आणि बॅगा किती. गाडीत सगळे भरले गेले आम्हीच थक्क झालो. मुख्य ठिकाणचे अंतर बरेच लांबचे असल्याने केवळ काही पल्ला पार करण्यासाठी एक दिवस आधी निघायचे ठरले होते. संध्याकाळ झाली होतीच. गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकली, जीपीएसला पत्ता दिला आणि प्रवास सुरु झाला.

पण सगळं सुरळीत झालं तर कसं होईल. निघण्यापूर्वी हवा तपासायला गेलो आणि पहिला धक्का बसला. एका चाकातून किंचित हवा लीक होतेय असे लक्षात आले. आता जर पंक्चर असेल तर काय. नुकतेच हिवाळी टायर्स लावले होते त्यामुळे तेव्हाचा कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असावा असे वाटले. दुकान बंद व्हायला अजून केवळ २० मिनिटे होती. पटापट गाडी वळवून परत गॅरे़ज मध्ये नेली. एक व्हॉल्व्ह खराब झाला होता तो त्याने लागली बदलून दिला आणि शेवटी एकदाचे निघालो. नशीब पंक्चर नव्हते. ठरलेल्या हॉटेलला पोहोचलो. सुरुवात थोडीशी चिंताजनक झाली तरी उर्वरीत सहल सगळे पूर्वनियोजन सार्थकी लावणारी झाली. प्रत्येक दिवस आणि अनुभव वेगळा ठरला. हवामानाने साथ दिली. नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघूयात आल्प्सच्या वळणांवर…

क्रमशः

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle