माझी सैन्यगाथा (भाग १)
माझा जन्म पुण्यात झाला. माझं बालपण च काय पण किशोरावस्थेचा तो सप्तरंगी काळ ही मी पुण्यातच अनुभवला. थोडक्यात सांगायचं तर माझं लग्न होईपर्यंत मी पुण्याच्या बाहेर फारशी गेले नाही.
लहानपणापासून मला 'आर्म्ड् फोर्सेस्' बद्दल जबरदस्त आकर्षण होतं. दरवर्षी २६ जानेवारी ला दूरदर्शन वरून प्रसारित होणारी गणतंत्र दिवसाची परेड बघणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. दिल्लीच्या राजपथ वरुन शिस्तबध्द आणि तालबद्ध रीतीनी मार्च-पास्ट करत जाणारे ते सैनिक बघताना मला नेहमीच अभिमान वाटायचा. आणि सिनेमात दाखवतात तसं बऱ्याच वेळा त्यातल्या परेड कमांडरच्या जागी मी स्वतःला बघायचे.
कॉलेजमध्ये असताना मी तीन वर्षं एन्.सी.सी मधे होते. दर रविवारी सकाळी तो कडक इस्त्री केलेला युनिफॉर्म आणि आदल्या रात्री पॉलिश करून करून चमकवलेले ते शूज् घालून परेड ग्राऊंड वर जाताना मला अगदी बॉर्डर वर निघाल्याची फीलिंग यायची.
तेव्हा मुलींना सैन्यात प्रवेश करायला फक्त एकच मार्ग होता... वैद्यकीय सेवा! मी त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला.पण त्यावेळी नशीबानी साथ दिली नाही म्हणा किंवा माझेच प्रयत्न थोडे कमी पडले म्हणा... पण सैन्यात दाखल होण्याचं माझं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं.त्या वेळी खूप वाईट वाटलं, पण 'जे होतं ते चांगल्यासाठीच' असा विचार करून मी माझं पुढचं शिक्षण संपवलं.
पण सैन्याची ओढ काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. त्या मुळे मनाशी ठरवून टाकलं... मी स्वतः जरी सैन्यात भरती होऊ शकले नाही तरी काय झालं! माझा जीवनसाथी भारतीय सेनेतला असेल.
माझ्या या निर्णयावर माझ्या घरच्यांकडून तसेच माझ्या मित्र मैत्रिणींकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही जणांनी माझ्या या निर्णयाचं स्वागत केलं पण काहींना थोडी काळजी वाटत होती.. खास करून माझ्या वडिलांना. कारण आमच्या नात्यात किंवा ओळखीत कोणी armed forces मध्ये नसल्यामुळे त्या बद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. बाबांना convince करणं सोपं नव्हतं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून पाहिला;मी माझा निर्णय बदलावा म्हणून! पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता…. माझं स्वप्नच होतं म्हणा ना !!
माझा एक मानलेला भाऊ तर मला म्हणाला,” अगं प्रिया, हा नाद सोड. माझा एक मित्र आहे, बँकेत आहे नोकरीला, चांगला पाच आकडी पगार आहे त्याला (त्या काळी इतक्या तरुण वयात पाच आकडी पगार असणं म्हणजे खूपच creditable!).. मस्त नवीन कार मधून फिरायचं सोडून त्या miltary च्या मोडक्या जीप ची स्वप्नं कशाला बघतीयेस?” मी त्याला फक्त एव्हढेच म्हणाले,” त्या मोडक्या जीप मध्ये जी शान आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही गाडीत नाहीये.”
काही जणांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन मला माझ्या निर्णया पासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला. “ अगं प्रिया, माझ्या अमक्याच्या तमकीनी असंच मिलिटरी ऑफिसर शी लग्न केलं, पण नंतर तिच्या लक्षात आलं की त्या लोकांचं सगळं वेगळंच असते, आपण नाही ऍडजस्ट करू शकत त्या lifestyle मधे.” … या आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकल्या मी त्या काळात.
पण इतके सगळं होऊन ही मला कोणाचा राग वगैरे नव्हता आला, कारण मला माहित होतं की ते हे सगळं माझ्या वरच्या प्रेमापोटी च करत होते.
मी मात्र ‘ऐकावे जनाचे - करावे मनाचे’ हे धोरण ठरवलं होतं. कारण मला स्वतःला माझ्या निर्णयाबद्दल पूर्ण खात्री होती.
आणि यावेळी मात्र नशिबानी माझी साथ दिली…. मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला. अशा रीतीने एक अधिकारी म्हणून जरी नाही तरी एका अधिकाऱ्याची पत्नी म्हणून मी सैनिकी परिवारात दाखल झाले.
पहिल्या पासून सैन्याची आवड होतीच आणि त्यात माझ्या जोडीदाराची साथ… त्यामुळे लवकरच मी या सैनिकी वातावरणात रुळले.
आमचं लग्न ठरलंं तेव्हा नितिन (माझा जोडीदार) अरुणाचल प्रदेश मधे एका अतिशय दुर्गम अशा जागी तैनात होता. त्या गावाचं नाव होतं ‘लोहितपूर’ !
माझ्या माहेरी कुणीही सैनिकी पेशात नसल्यामुळे माझ्या घरच्यांना थोडी काळजी वाटत होती - आपली मुलगी पुणे सोडून जाणार आणि तेदेखील अशा गावात की ज्याचं नावही कधी ऐकलं नाही. त्यांना काळजी वाटणं साहजिकच होतं.. खास करून माझ्या आजीला ! ती मला म्हणाली,”भारताच्या नकाशात दाखव मला .. हे लोहितपूर कुठे आहे ते. नक्की कुठे जाणार आहेस तू?” आम्ही सगळा नकाशा पालथा घातला पण लोहितपूर काही केल्या सापडेना! तेव्हा मात्र माझ्या आजीला काळजी वाटायला लागली. ती माझ्या बाबांना म्हणाली सुद्धा,”इतकी काय घाई झाली होती मुलीच्या लग्नाची? अजून थोडे दिवस थांबला असतास तर इथला जवळपासचा मुलगा मिळाला असता. आता ही इतक्या लांब जाणार आणि तीही एकटी!!”
पण मी एकटी कुठे होते? माझ्या बरोबर होती नितिन ची साथ, आणि स्वतःचा संसार सुरु करायची उमेद. आणि माझं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे एक वेगळीच त्रुप्ती होती मनात!
लग्नानंतर जेव्हा लोहितपूरला जायचा दिवस उजाडला तेव्हा अचानक मनाला एक हुरहुर वाटायला लागली. वाटलं,’ आजपर्यंत मी माझ्या आई-वडिलांच्या संसाराचा एक भाग होते ; पण आता मी माझा स्वतःचा संसार थाटायला निघाले आहे, आणि तेही एकटीने… गरजेच्या वेळी मार्ग दाखवायला, सल्ला द्यायला आता कोणी वडीलधारी माणसं नाहीत बरोबर. यापुढील आयुष्य आता आपल्याला स्वतःच्या हिमतीवर जगायचं आहे. जमेल ना मला हे? माझ्या स्वप्नातलं माझं जे छोटंसं घरकुल होतं, ते मी सत्यात उतरवू शकेन ना?’
क्षणभर मन दोलायमान झालं पण मग मी हळूच डोळे मिटले आणि डोळ्यासमोर माझ्या दिवंगत आई चा हसरा चेहेरा दिसला… आणि आमच्या दोघीत घडलेला एक प्रसंग आठवला.
मी कॉलेज मध्ये असताना एके दिवशी दुपारी मी घरात एकटीच होते, प्रत्येक जण आपापल्या कामासाठी बाहेर होते, आई देखील आजी कडे गेली होती. थोड्या वेळाने मला एकटीला bore व्हायला लागलं. मग मी माझी favourite ऍक्टिव्हिटी सुरू केली… घर आवरण्याची! साधारण एक तासाभरात सगळे घर एकदम झाडून पुसून लक्ख केल्या नंतर माझी नजर बाथरूम समोरच्या पायपुसणी (doormat) वर गेली. त्याच्यातुन ठिकठिकाणी धागे निघाले होते आणि ते माझ्या नजरेला खटकत होतं.Doormat बदलायची गरज होती, पण मला खूप शोधून सुद्धा नवीन doormat काही सापडले नाही. म्हणून मी एक जुन्या टर्किश टॉवेल ला चारही बाजूनी धावदोरा घालून त्याचे पायपुसणं बनवल.
थोड्याच वेळात आई परत आली. सगळे घर एकदम चकाचक बघून खूप खुश झाली. मग मी तिला माझा masterpiece दाखवला.. ते व्यवस्थित शिवलेले doormat बघून तीनी मला एकदम जवळ घेतलं आणि कौतुकानी म्हणाली,” संसार अगदी छान करशील तू’ .
तो सगळा प्रसंग एखाद्या फ्लॅशबॅक सारखा मला आठवला आणि अचानक एक वेगळंच बळ मिळालं…वाटलं.. हीच वेळ आहे, आई ला त्या वेळी माझ्या बद्दल वाटलेला विश्वास खरा करून दाखवायची; आमच्या वडिलांनी आमच्या साठी जे अविरत कष्ट घेतले होते त्यांचे सार्थक करायची ! अचानक मनातली ती हुरहूर जणू कुठेतरी पळून गेली आणि तिच्या जागी स्वतः बद्दल एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. मी मनोमन आई बाबांना नमस्कार केला आणि त्यांच्या आशीर्वादाची, संस्काराची आणि शिकवणीची शिदोरी बरोबर घेऊन नितीन बरोबर लोहितपुर ला जायला निघाले.
क्रमशः